भारताच्या दादाला एकदा लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं होतं

सौरव गांगुली म्हणजे भारतीय क्रिकेटचा दादा. लॉर्ड्सच्या गॅलरीत टीशर्ट काढण्याचा, स्टीव्ह वॉला टॉससाठी थांबवण्याचा, ग्रेग चॅपेलला थेट नडण्याचा दम कुणात होता, तर दादामध्ये. भारतीय क्रिकेट किती आक्रमक होऊ शकतं हे दादाच्या टीमनं सगळ्या देशाला दाखवून दिलं. आता हा आक्रमकपणा फक्त दादाच्या वागण्यातच नव्हता तर खेळण्यातही होता.

समोरच्या टीमला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची सवय भारतीय क्रिकेटला कुणी लावली असेल, तर ती दादानंच. त्यामुळं दादाची इमेजच ‘बॅड बॉय’ अशी बनली होती. पण याच दादामध्ये एक हळवा माणूसही दडलाय. सांगून खोटं वाटेल, पण आपल्या दादाला ‘लव्ह ॲट फर्स्ट साईट’ झालं होतं. तेही टीम इंडियाच्या सगळ्यात वाढीव टेस्ट मॅचेसपैकी एका मॅच दरम्यान.

विषय आहे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कोलकाता टेस्टचा. साल होतं २००१. सलग १५ टेस्ट मॅचेस जिंकून ऑस्ट्रेलियन संघ भारतात आला होता. सिरीजमधल्या पहिल्याच टेस्टमध्ये त्यांनी भारताला लोळवलं. दुसरी टेस्ट झाली कोलकात्यात. पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियानं ४४५ रन्स फोडले, भारताला करता आले फक्त १७१. त्यामुळं भारतावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली.

भारत हरतोय की काय, असं वाटायला लागलं. त्यामुळं दादाच्या नेतृत्वावर आणि आक्रमकतेवर मजबूत टीका होऊ लागली. लोकं म्हणायला लागली दादाची टीम फक्त कागदावर वाघ आहे, मैदानावर नाही.

दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र चमत्कार घडला. ज्याचे शिल्पकार होते राहुल द्रविड आणि व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण. दोघांच्या बॅटिंगनं मॅचची कुंडलीच बदलून टाकली. प्रेशरमध्ये येण्याची वेळ आता ऑस्ट्रेलियाची होती.

कांगारुंची टीम आता पण वस्ताद आहे, त्यात तेव्हा तर नादच नव्हता. टेस्ट जिंकायला भारताला अजूनही १० विकेट्स घ्यायच्या होत्या. कुठल्या तरी बॉलरला द्रविड नायतर लक्ष्मणसारखा चमत्कार करणं लय गरजेचं होतं.

अनिल कुंबळेला दुखापत झाल्यानं दादाचं मेन फिरकी अस्त्र होतं हरभजन सिंग. पहिल्या इनिंगमध्ये भज्जीनं हॅटट्रिकसह सात विकेट्स काढल्या होत्या. त्यामुळं या युद्धात दादाचा अर्जुन होता २१ वर्षांचा नवखा भज्जी. त्याच्या धनुष्यातून धमाका झाला असता, तरच भारताची नौका पार लागली असती.

भज्जीनं जाळं विणलं आणि मायकेल स्लेटरला आऊट करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. नंतर लँगर आणि चिवट स्टीव्ह वॉच्या विकेट पण भज्जीनंच खोलल्या. मग पॉन्टिंगची मेन विकेट काढत त्यानं ऑस्ट्रेलियाला संकटात ढकललं. तेंडुलकरनं मधल्या विकेट्स काढल्या आणि गिलेस्पी-मॅकग्राचे अडसर भज्जीनं दूर करत शेपूट गुंडाळली.

ऑस्ट्रेलियाचा २१२ रन्सवर ऑलआऊट उडाला आणि भारतानं अशक्य वाटणारी मॅच मारून दाखवली. भज्जीनं पहिल्या इनिंगमध्ये ७ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ६ अशा एकूण १३ विकेट्स काढल्या.

या मॅचबद्दल बोलताना दादानं एक किस्सा सांगितला होता, लव्ह ॲट फर्स्ट साईट वाला. 

इंडिया टुडेनं आयोजित केलेल्या एका शोमध्ये दादा म्हणाला, ”असं म्हणतात की लव्ह ॲट फर्स्ट साईट नावाची एक गोष्ट असते. मी जेव्हा तरुण हरभजन सिंगला ईडन गार्डन्सवर बॉलिंग करताना पाहिलं, तेव्हा ते माझ्यासाठी लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं. त्यानं १३ विकेट्स घेतल्या आणि माझा विश्वास सार्थ केला.”

“मला खात्री होती की भज्जी भारतीय क्रिकेटमध्ये बदल घडवून आणेल. अनिल कुंबळेला दुखापत झाल्यानं मी तीन टेस्ट मॅचेसमध्ये तीन वेगळे स्पिनर्स वापरले. पण माझा विकेटटेकिंग बॉलर भज्जीच होता. फक्त तीच मॅच नाही, तर पुढं जवळपास ८०० विकेट्स घेत भज्जीनं स्वतःला सिद्ध केलं.”

दादाची ती लव्ह ॲट फर्स्ट साईट रोमँटिक नसली तरी भारी होती हे नक्की. कारण भज्जीनं ईडन्सवर जे केलं त्यानं ऑस्ट्रेलियाचं तर कंबरडं मोडलंच, पण दादाची कॉलर ताठ राहिली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.