धोनीला संघात घेण्यासाठी किरण मोरे दहा दिवस गांगुलीशी भांडत होते…..

महेंद्रसिंग धोनीचं स्टारडम आज जगभरात किती जबरी आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. दणादण मैदानाबाहेर जाणारे त्याचे हेलिकॉप्टर शॉट असो किंवा विजेच्या वेगाने होणारी त्याची स्टम्पिंग असो पिव्वर ऑलराऊंडर मटेरियल म्हणजे धोनी म्हणता येईल. पण याच धोनीला संघात घेण्यासाठी किरण मोरे यांना गांगुलीसोबत पंगा घ्यावा लागला होता त्याबद्दलचा आजचा किस्सा.

एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात किरण मोरे दाखवले आहेत आणि धोनीला संघात आणण्याचं त्यांचं योगदान किती महत्वाचं आहे हे हि दिसतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये येण्याअगोदर धोनीने स्थानिक क्रिकेटमध्ये बॉलर लोकांचा बाजार उठवला होता, जो दिसल त्याला फोडायची मोहीमच त्याने हाती घेतल्याचं चित्र दिसत होतं. स्थानिक क्रिकेटमध्ये इतकं खतरनाक प्रदर्शन करूनही धोनीला टीममध्ये निवडण्यात येत नव्हतं. 

हा भारतीय क्रिकेटचा तो काळ होता जेव्हा राहुल द्रविडच्या ऐवजी भारतीय संघात एक चांगला विकेटकिपर हवा होता. विकेटकिपिंग तर चांगलीच हवी पण शिवाय तो धडाकेबाज बॅट्समन सुद्धा हवा होता आणि या सगळ्याच कॉम्बिनेशन होतं धोनीमध्ये.

मोरेंची नजर खिळलेली होती धोनीवर आणि काहीही करून त्यांना धोनीला संघात आणायचं होतं. याचं कारण सुद्धा होतं कि धोनीला का भारतीय संघात आणणं गरजेचं होतं.

२००१ ला दीपदास गुप्ता, २००२ ला अजय रात्रा, २००३ ला पार्थिव पटेल आणि २००४ ला दिनेश कार्तिक यांना ऍज ए विकेटकिपर बॅट्समन म्हणून भारतीय संघात संधी देण्यात आली होती. पण यापैकी एकही जण जास्त काळ संघात विकेटकिपर म्हणून जागा राखू शकला नाही. गळती लागल्यासारखे हे सगळे जण टीममधून बाहेर फेकले जात होते. यामुळे राहुल द्रविड हा विकेटकिपर म्हणून जबाबदारी वाहत होता, २००३ चा वर्ल्डकप तर राहुल द्रविड हा विकेटकिपर म्हणुनच खेळला होता.

किरण मोरे यांच्या डोक्यात असा विचार चालू होता की असा खेळाडू पाहिजे जो ६-७ नंबरवर खेळायला येईल आणि शेवटच्या काही ओव्हरमध्ये पावर हीटिंगचं काम करील आणि झटपट ४०-५० धावा करील.

ज्यावेळी द्रविड विकेटकिपिंग करत होता तेव्हा धोनीने दिलीप ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. २००४ साली ईस्ट झोन आणि नॉर्थ झोनमध्ये दिलीप ट्रॉफीची फायनल खेळवण्यात आली होती.

मोरे यांच्या एका मित्राने त्यांना सल्ला दिला होता कि एकदा धोनीची बॅटिंग बघा. किरण मोरे स्वतः धोनीची बॅटिंग पाहायला गेले होते. मोरे सांगतात कि धोनीने त्या मॅचमध्ये १७० पैकी १३० रन बनवले होते. धोनीची बॅटिंग बघून किरण मोरे खुश झाले आणि त्यांनी ठरवलं कि काहीही करून धोनीला संघात घ्यायचं. 

आता धोनीला संघात घेण्यावरून मोठं रान पेटलं होतं. दीपदास गुप्ता आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांच्या नावावरून किरण मोरे आणि सौरव गांगुली यांच्यात शीतयुद्ध सुरु होतं. किरण मोरे या घटनेबद्दल सांगतात कि दीपदास गुप्तता ऐवजी धोनीला संघात जागा मिळवून देण्यासाठी मी सौरव गांगुलीला दहा दिवस समजावत होतो. पण शेवटी गांगुलीने धोनीची एंट्री संघात केली आणि धोनीने गांगुली आणि किरण मोरे यांचा विश्वास सार्थ ठरवला.

आज जागतिक पातळीवर धोनीइतका महान आणि यशस्वी कर्णधार नाही याच सगळं श्रेय किरण  मोरे यांच्या वाट्याला जातं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.