आज नेदरलँड आणि तेव्हा बाऊचरचं चुकलेलं गणित, साऊथ आफ्रिकेचं गंडणं फिक्स आहे…

रविवारची सकाळ क्रिकेट बघणाऱ्यांना धक्का देणारी ठरली. साऊथ आफ्रिका नेदरलँडला हरवून सेमीफायनलला येणार हे फिक्स वाटत होतं, पण झालं उलटंच. अंडरडॉग नेदरलँडनं आफ्रिकेला हरवलं आणि त्यांचं वर्ल्डकप सेमीफायनल गाठण्याचं स्वप्न हुकलं.

पुन्हा एकदा आफ्रिकेवरचा ‘चोकर्स’ हा शिक्का गडद झाला. पण विजयाची संधी असताना हरणं हे आफ्रिकन टीमसाठी काही नवीन नाही. आज नेदरलँडमुळं स्वप्न हुकलं होतं, तर २००३ मध्ये चुकलेल्या गणितामुळं.

२००३ चा वर्ल्डकप भारतीय चाहत्यांना फक्त दोनच कारणांमुळं लक्षात आहे, सचिननं पाकिस्तानची केलेली धुलाई आणि रिकी पॉंटिंगच्या बॅटमध्ये नसलेल्या स्प्रिंगनं हिरावलेलं भारताचं स्वप्न. या वर्ल्डकपमध्ये तसं खळबळजनक काही झालं नाही. ऑस्ट्रेलियानं भारतासकट सगळ्या टीम्सच्या पालापाचोळा केला होता. त्यावर्षी ऑस्ट्रेलियासोबतच वर्ल्डकपचे आणखी तीन दावेदार होते, भारत, श्रीलंका आणि यजमान साऊथ आफ्रिका.

होम ग्राउंडवरची स्पर्धा, कंडिशन आणि पिचेसचा अनुभव आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तगडी टीम, अशा सगळ्या गोष्टींमुळं आफ्रिकन टीम यावेळी तरी वर्ल्डकप नेणार असं फिक्स वाटलं होतं. १९९९ च्या वर्ल्डकपला सेमीफायनलमध्ये एका रनआऊटमुळं त्यांचं स्वप्न चोळामोळा झालेलं. साहजिकच आपल्या मायदेशी वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करायची त्यांना संधी होती.

मध्ये एक अडथळा होता, करो या मरो असलेल्या लीग मॅचचा. तारीख, ३ मार्च २००३, साऊथ आफ्रिका विरुद्ध श्रीलंका.

आता या मॅचमध्ये काय झालं, हे सांगण्याच्या आधी तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत.

साऊथ आफ्रिका आणि वर्ल्डकपची ट्रॉफी यांचं नातं रांझातला कुंदन आणि झोयासारखंय. 

प्रेम आहे का? तर आहे. झोयाला मिळवायचा चान्स आहे का? तर आहे. पण दरवेळी आफ्रिकेचा असा काही बाजार उठतो.. की शेवटी.. ‘अब साला मूड नही.’ हेच डोक्यात येतं.

१९९२ ला त्यांनी सेमीफायनल गाठली होती, त्यादिवशी पावसामुळं डकवर्थ लुईस नियम लागला आणि १ बॉलमध्ये २२ रन्स असं कुणालाच शक्य नसलेलं आव्हान त्यांना मिळालं. आपण कट्टर आफ्रिकन फॅन्स नसलो, तरी त्यादिवशी त्यांच्यासाठी वाईट वाटलं. १९९६ मध्ये त्यांचे स्टार्स पुन्हा विनिंगमध्ये होते, पण क्वार्टर फायनलमध्ये ब्रायन लारा नावाचा एक भिडू त्यांची स्वप्नं बेचिराख करुन गेला. ९९ च्या सेमीफायनलचा किस्सा तर इतका चघळलाय की आता तोंडपाठ झालाय.

सलग तीन वर्ल्डकप स्पर्धा आणि तिन्ही वेळेस आफ्रिकेची एकच अवस्था… अब साला मूड नही.

२००३ मध्ये शॉन पोलॉककडे आफ्रिकन संघाचं नेतृत्व होतं. ऑलराउंडर पोलॉक चमत्कार घडवून आणेल अशी अगदी दाट शक्यता होती. लीग स्टेज मधला अखेरचा सामना, आफ्रिकेला फक्त जिंकायचं होतं… कुंदनला झोया मिळाली असती… डर्बनच्या घाटांवर.

आता येऊ डर्बनच्या स्टँड्समध्ये…

श्रीलंकेनं टॉस जिंकून बॅटिंग घेतली. मर्वान अट्टापटू ड्रेसिंग रूममध्येच काही बॉल्स खेळून आल्यासारखा तुटून पडला. पण त्याला समोरच्या बाजूनं काय म्हणावी तशी साथ मिळेना. खुंखार जयसूर्याला रनआऊट केल्यानंतर आफ्रिकन टीम जल्लोषात होती. त्या पहिल्या विकेटनंतर लंकेची घसरगुंडी होऊ लागली. ती सावरली आणखी एका बादशहानं तो म्हणजे अरविंदा डी सिल्व्हा. अट्टापटू आणि डी सिल्व्हानं चौथ्या विकेटसाठी १५२ रन्सची पार्टनरशिप केली.

मात्र दोन बॉल्सच्या अंतरानं दोघही आऊट झाले. साऊथ आफ्रिकेत जरा आनंद पसरला. पुढं लंकेचा डाव कोसळला आणि २६८ वर त्यांच्या इनिंगला फुलस्टॉप बसला.

मग सुरू झाली आफ्रिकेची इनिंग. त्यांची सुरुवात भक्कम झाली, स्मिथनी ३५ आणि शुद्धीत असलेल्या गिब्सनं फिफ्टी मारत टीमचे विजयाचे चान्सेस वाढवले होते. स्कोअर १४९ वर असताना गिब्स ७३ रन्स करुन आऊट झाला. पण पुढं शॉन पोलॉक आणि मार्क बाऊचरनं बाप बॅटिंग करत डाव सावरला. जयसूर्याला रनआऊट करुन आफ्रिकेला मॅचमध्ये ठेवणारा पोलॉक स्वतःही रनआऊट झाला. पण बाऊचरनं मात्र लय विषय बॅटिंग केली.

पोलॉक आऊट झाला आणि मैदानात पावसाची एंट्री झाली, पाऊस इतका सणकून आला होता, की अंपायर भावांनी कोट-बिट घातले, स्टॅन्डमधली लोकं पण रेनकोट घालून बसली.

शेवटच्या सहा ओव्हर्समध्ये आफ्रिकेला ५३ रन्स हवे होते. ती ओव्हर टाकायला आला, लंकेचा सगळ्यात हुकमी एक्का… मुथय्या मुरलीधरन.

पावसाचा जोर वाढला होता, क्रीझवर बाऊचरच्या जोडीला लान्स क्लूझनर म्हणजेच झुलू होता. आफ्रिकेचा स्कोअर होता २१६, पाऊस आलाय म्हणल्यावर डकवर्थ लुईस लागणार हे फिक्स होतं. गणितानुसार आफ्रिकेला आपला रनरेट चांगला ठेवण्यासाठी २२९ च्या पुढं स्कोअर न्यायचा होता.

थोडक्यात १४ रन्स हवे होते, पहिल्या बॉलला एक रन. पुढचे दोन बॉल्स मुरलीनं काय टाकले, हे झुलूला झेपलं नाही. चौथ्या बॉलवर मुरली आणि संगकारा दोघंही गंडले आणि वाईड गेलेला बॉल बाउंड्रीच्या पलीकडं गेला. पुन्हा चौथा बॉल आणि आता एक सिंगल. स्कोअर २२३.

पाचव्या बॉलवर बाऊचरनं लय बाप सिक्स मारला आणि बाऊचरसकट सगळं ग्राउंड आनंदात उसळलं.  सगळ्यांना वाटत होतं ‘जिंकले’, पण टोनी भाऊ ग्रेग कमेंटरी बॉक्समध्ये सांगत होते की आता लास्ट बॉलला एक रन घ्यायला हवा आणि मगच आफ्रिका जिंकेल.

पण शेवटच्या बॉलवर बाऊचर पळालाच नाही, त्यानं रनच घेतला नाही. यामागचं कारण होतं, की त्याला वाटलं २२९ झाले म्हणजे आपण जिंकलो. त्यानं केलेलं गणित चुकलेलं, त्याचा अंदाज आफ्रिकेला लई महागात पडला होता.

ज्यामुळं पोलॉकची कॅप्टनशिप गेली, मायदेशात झालेल्या वर्ल्डकपमध्येच आफ्रिकन संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला.

कुंदनपासून झोया पुन्हा एकदा लांब गेली… सिक्स मारुन हिरो ठरलेला बाऊचर, पुढच्याच बॉलवर झिरो ठरला… त्या रात्री आणि आज पुन्हा एकदा आफ्रिकन चाहते पुन्हा एकदा म्हणाले असतील…

अब साला मूड नही. आखे मुंद लेने मे हि सुख है, सो जाने मे ही भलाई है.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.