द. कोरियाचा हा प्लेयर भारताकडून क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे.

ब्रिटिशानी शोधलेला खेळ क्रिकेट आपल्या देशात धर्म बनला आहे. बाकी कुठे नाही पण क्रिकेटमध्ये तरी आपण महासत्ता आहे. एक काळ होता या खेळावर फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशाचं वर्चस्व असायचं आणि क्रिकेट खेळणारे देश फक्त आठ दहा असायचे. तेही इंग्रजांनी राज्य केले तेवढेच देश.

गेल्या काही वर्षापासून परिस्थिती बदलली.

रशिया, ब्राझील, अमेरिका, स्पेन, चीन सुद्धा या खेळात आपले हातपाय मारून बघत आहेत. या नव्या देशांना असोसिएट कन्ट्रीज म्हणून ओळखले जाते. त्यांच्यात स्पर्धा खेळवून त्यांना मुख्य स्पर्धेत येण्याचा चान्स दिला जातोय. यातूनच आलेली अफगाणिस्तान सारखी टीम भारतासारख्या बलाढ्य टीमला धडकी बसेल अशी कामगिरी करत आहे.

याच असोसिएट क्रिकेट प्लेयिंग कंट्रीमध्ये एक नाव आहे दक्षिण कोरियाचं.

खरं तर २००१ पासून या देशात प्रोफेशनल क्रिकेट खेळल जात. बरीच वर्षे ते आपली टीम बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. कित्येक सामने खेळले. पुर्व आशियामधली एक उदयोन्मुख टीम म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं.

२०१४ सालच्या एशियन गेम्स मध्ये ट्वेन्टीट्वेन्टी क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यात ते क्वार्टर फायनल पर्यंत सुद्धा पोहचले होते. तेव्हा त्यांची गाठ पडली श्रीलंकेशी. अपेक्षेप्रमाणे यात त्यांचा ११७ धावांनी दारूण पराभव झाला पण अपयशालाही एक सोनेरी किनार असते असं म्हणतात त्याप्रमाणे या मॅचमधून एक चांगली गोष्ट त्यांच्यासाठी घडली.

ताए क्वान पार्क नावाच्या साउथ कोरियन खेळाडूने चार ओव्हर मध्ये सोळा धावा देऊन श्रीलंकेच्या चार विकेट्स पटकवल्या.

या कामगिरीमुळे जगभरातल्या क्रिकेट प्रेमींच ताए क्वान पार्कवर लक्ष गेलं. घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रेक्षक ओरडून ओरडून ताए क्वानच्या नावाचा जयघोष करत होते. दक्षिण कोरियाला आपला क्रिकेटचा हिरो मिळाला होता.

प्रत्येक कोरियन मुलाप्रमाणे शाळेत असताना ताए क्वान पार्कचं ही स्वप्न होतं की आपण एक दिवस बेसबॉल प्लेयर बनायचं. पण याच खेळान त्याला क्रिकेटपाशी आणून सोडलं. या सगळ्या ट्रान्सफोर्मेशन मागे होते ज्युलियन फाऊंटन नावाचे साउथ कोरिया नशनल टीमचे कोच.

ज्युलियन फाऊंटन हे मुळचे इंग्लंडचे बेसबॉल खेळाडू. त्यांनी कधी काळी काउंटीमध्ये क्रिकेटसुद्धा खेळलेल. त्यांना दक्षिण कोरियन टीमच्या आशियन गेम्ससाठीच्या तयारी साठी बोलवून घेण्यात आलं होतं. टीम उभा करण्यापासून त्यांना सुरवात करावी लागली. त्यांचा स्वतःचा विश्वास आहे की क्रिकेट आणि बेसबॉल ही एकाच आईची दोन मुले आहेत. म्हणून त्यांनी साउथ कोरियाच्या बेसबॉल खेळणाऱ्या मुलांच्यामधुन ही टीम बांधली.

यातच होता ताए क्वान पार्क. २०१३ साली त्याने क्रिकेट खेळायला सुरवात केली. काही दिवसातच टीमचा सर्वोत्तम ऑल राऊंडर म्हणून त्याने ख्याती मिळवली.

२०१४ हे वर्ष , ती श्रीलंका विरुद्धची मॅच ताए क्वान पार्क साठी अविस्मरणीय ठरली. क्रिकेट हेच आपल आयुष्य आहे याचा सुद्धा त्याला शोध लागला. पूर्णवेळ हाच खेळ खेळू शकतो हे त्यानं ठरवलं. पण दुर्दैवाने परत एवढ्या मोठ्या लेव्हलचे सामने खेळायला त्याला मिळाले नाहीत.

पुर्व आशिया मध्ये जपान, चीन, मलेशिया अशा या सगळ्याच टीम त्यांच्या बरोबरीच्या. तिथे ताए क्वानच्या प्रतिभेला विशेष संधी नव्हती. तरी पण दोन तीन वर्षे त्याने प्रयत्न केले, वय वाढत चाललेलं. अखेर कंटाळून त्याने एक निर्णय घेतला.

क्रिकेटची राजधानी मुंबईला राहायला जाण्याचा.

भारतात राहायला येणे हा निर्णय त्याच्यासाठी खूप अवघड होता. इथल वातावरण, इथली संस्कृती, खानपान सगळच दक्षिण कोरिया पेक्षा खूप वेगळ आहे. त्याला हिंदी, मराठी सोडाचं त्याला इंग्लिशही बोलता येत नाही. कळते ती फक्त क्रिकेटची भाषा.

घरच्यांनी, मित्रांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ताए कोणाच्या ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. त्याला क्रिकेट बोलवत होतं. त्याने आपलं सामान गोळा केलं, क्रिकेट बॅट घेतली आणि तडक मुंबई गाठली. पण आल्या आल्या त्याला वाटलं होतं त्याप्रमाणे क्रिकेट खेळायचा चान्स मिळाला नाही.

मुंबईत असे लाखो लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. ताए क्वान सुद्धा याच गर्दीचा एक भाग झाला होता. खूप दिवस स्ट्रगल केला. बऱ्याच लोकल क्लबमध्ये खेळतो वगैरे विनवणी केली पण कोणी संधी देतचं नव्हते. आधीच एवढी प्रचंड मोठी रांग आहे त्यात या चायनीज दिसणाऱ्या भाषा सुद्धा न कळणाऱ्या मुलाला चान्स कुठे द्या असा हिशोब क्लब वाल्यांनी मांडला.

पण ताए क्वान पार्कने जिद्द हरली नाही. गल्लीतल्या मुलांबरोबर रस्त्यावर क्रिकेट खेळायला सुरवात केली. असच करता करता त्याला एकदिवस क्लब क्रिकेटमध्ये संधी मिळाली. आज तो वेगवेगळ्या टीमकडून खेळतो.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याचे कोच प्रदीप कासलीवाल म्हणाले,

“मी त्याच्या खेळाने प्रभावित आहे, त्याची अॅक्शन परिपूर्ण आहे. जर दक्षिण कोरियामध्ये त्याच्यासारखे आणखीन क्रिकेटपटू असतील तर पुढील पाच वर्षांत त्यांचे भविष्य उज्वल आहे.”

 पण ताए क्वान पार्कचं काय?

त्याच वय आता अठ्ठावीस वर्ष आहे. जितके दिवस जातील तेव्हढे त्याचे प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याचे चान्सेस कमीचं होत आहेत. तो म्हणतो,

” जर मी प्रोफेशनल क्रिकेटर बनू शकलो नाही तर हे माझ्यासाठी खूप धक्कादायक असेल. पण, मी त्याबद्दल सकारात्मक आहे. जर मी ते करू शकलो नाही तर मी दक्षिण कोरियाला परत जाईन आणि क्रिकेटला प्रमोट करेन.”

ताए क्वान पार्कचं भारताच्या टीमकडून खेळण्याच स्वप्न आहे. याधी रॉबिनसिंग सारखा वेस्ट इंडिया मध्ये जन्मलेला खेळाडू भारताकडून खेळला आहेच. शिवाय पीटरसन सारखा आफ्रिकेत जन्मलेला खेळाडू इंग्लंडकडून खेळू शकतो. बरेच खेळाडू इकडे तिकडे खेळत असतात. यामुळे ताए क्वान पार्क भारताच्या संघात दिसणे अशक्य नाही. पण इथे आधीच इतकी कॉम्पिटीशन आहे. इथल्या राष्ट्रीय संघात तर संधी मिळेल की नाही माहित नाही पण कमीत कमी आयपीएलमध्ये तरी संधी मिळेल म्हणून तो मेहनत करत आहे. तेव्हढी त्याच्यात प्रतिभा नक्कीच आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.