श्रीलंकेत विहीर खोदताना जगातला सगळ्यात मोठा नीलम रत्न घावलाय….

आपल्या मानवी मनाला प्रत्येक गोष्टीचं अप्रूप असत. बऱ्याच नवनवीन गोष्टी यातून कळत जातात. उत्खनन करून मोठमोठे शोध घेतले जातात. आता आजचा किस्सा आहे श्रीलंकेतला ज्यात विहीर खोदताना जगातला सगळ्यात मोठा नीलम नावाचा रत्न सापडला आहे. त्याची किंमतही भरघोस आहे. गिनीज बुकमध्ये नोंद घेण्यात आलेले हे रत्न आहे. तर जाणून घेऊया नेमका विषय काय आहे.

श्रीलंकेत विहीर खोदताना सापडला जगातील सर्वात मोठा नीलम तोही 510 किलो वजनाचा, गिनीज बुकमध्ये दाखल जगातील सर्वात मोठा नीलमणी समूह श्रीलंकेत सापडला. हा नीलम क्लस्टर जुलै 2021 मध्ये सापडला होता आणि त्याला सेरेंडिपिटी सॅफायर असे नाव देण्यात आले होते. स्वित्झर्लंडच्या गुबेलिन जेम लॅबने त्याला जगातील सर्वात मोठा स्टार सॅफायर क्लस्टर म्हणून प्रमाणित केले.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, हा नीलम रत्न एका रत्न व्यापाऱ्याच्या घराच्या मागे चुकून सापडला. श्रीलंकेतील रत्नपुरा भागात सापडलेल्या या नीलमणी दगडाचे वजन 510 किलो किंवा 2.5 दशलक्ष कॅरेट असल्याचे सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 100 दशलक्ष डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. रत्न व्यापाऱ्याच्या घरी कामगार विहिरी खोदत होते. कामगारांना अचानक हे अमूल्य रत्न दिसले आणि नंतर त्यांना कळले की खजिना सापडला नाही तर रत्न घावलय. बौद्ध भिक्खूंच्या आशीर्वादानंतर डिसेंबर 2021 मध्ये हा अनमोल दगड जगासमोर ठेवण्यात आला. रत्नपुराला श्रीलंकेची रत्नांची राजधानी देखील म्हटले जाते आणि यापूर्वीही लोकांना शोध न घेता येथे अनेक रत्ने आणि मौल्यवान दगड सापडले आहेत.

जगाला या नीलम रत्न दगडाची माहिती झाली आहे, अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी तो खरेदी करण्यात रस दाखवला आहे. हा रत्न सध्या स्वित्झर्लंडमध्ये ठेवण्यात आला असून तो लिलावासाठी ब्रिटनला नेण्यात येणार आहे. नुकतीच बातमी आली होती की, श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे, तिथं मिरचीसारख्या गोष्टीही 700 रुपये किलोने विकल्या जात आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 22 दशलक्ष लोक इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. या परिस्थितीसाठी मोठ्या देशांकडून घेतलेले कर्ज आणि कोविड-19 जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.