अमेरिकेला महामंदीतून बाहेर काढणाऱ्या माणसामुळे भारताच्या स्टेट बँकेची स्थापना झाली.

स्टेट बँक ऑफ इंडिया. नाव काढलं तरी लोक बोटं मोडायला सुरु करतात, तिथली गर्दी, कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळा, चार तास थांबावं लागणे, आता सुरू असलेल्या ४ दिवसांच्या सलग सुट्ट्या वगैरे वगैरे मिमचे विषय बनले आहेत.

पण एक मात्र खरं आपण कितीही चेष्टा केली तरी भारताला स्टेट बँकेशिवाय  पर्याय नाही.

देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा अगदी खेड्यापाड्यात देखील स्टेट बँक असते. मल्ल्यासारखे अतिश्रीमंत माणसं कर्जासाठी स्टेट बँकेकडे जातात (बुडवून पळून सुद्धा जातात हा विषय वेगळा )आणि गरिबातल्या गरीब माणसाचं पेन्शन देखील स्टेट बँकेत जमा होतं. जगातल्या सर्वात मोठ्या बँकांमध्ये स्टेट बँकेचा समावेश होतो. आता त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उत्साही कामानंतरही हि बँक व्यवस्थित चालू आहे जगातलं आठवं आश्चर्य मानलं जातं.

स्टेट बँकेच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सध्या निर्गुंतवणुकीची घोषणा करणारे मोदीजी देखील या बँकेला विकायचं धाडस करू शकणार नाहीत.

तुम्ही म्हणणार एवढा सगळं फाफट पसारा सांगितला तो तर आम्हाला आधीपासून ठाऊक आहे. पण स्टेट बँकेची स्थापना कशी झाली हे कुठे माहित आहे?

तर यासाठी आपल्याला शेकडो वर्ष मागे जावे लागेल. कंपनी सरकारने मराठ्यांना हरवून भारत आपल्या हातात घेतला होता. खरं तर ते भारताला लुटायसाठीच आले होते. शिवाय एवढा मोठा देश चालवायचा तर युद्ध जिंकले पाहिजेत आणि त्यासाठी पैसे पाहिजेत, हे इंग्रजांना ठाऊक होतं. भारतातल्या सावकारांच्या इथल्या पेढ्यांच्या भरवश्यावर फार काळ आपले धंदे चालू शकणार नाहीत याचा त्यांना अंदाज होताच. यातूनच त्यांनी इथे बँका उभारायला सुरवात केली.

पहिली बँक उभारली ती म्हणजे बँक ऑफ बंगाल, वर्ष होतं १८०६. त्याच्या पाठोपाठ बँक उभारली ती म्हणजे बँक ऑफ बॉम्बे १८४० आणि मग बँक ऑफ मद्रास १८४३. या तीन बँका इंग्रजांची सत्ता असणाऱ्या तिन्ही शहरांच्या व्यापारात आणि लढाईमध्ये मुख्य भूमिका बजावायच्या. या सगळ्या बँका खाजगी मालकीच्या होत्या. मात्र कंपनी सरकारचे त्यांच्या कामकाजात वर्चस्व होतं. त्यांना आपापल्या क्षेत्रात करन्सी बनवण्याचे देखील अधिकार होते.

१८५७ साली भारतात शिपायांनी व अनेक राजांनी बंड पुकारले. झाशीची राणी, तात्या टोपेंसारख्या योद्ध्यांनी आपले प्राणार्पण केले. स्वातंत्र्याचा उठाव झाला. ईस्ट इंडिया कंपनीने कसबसं हे युद्ध जिंकलं पण तेव्हा इंग्लंडच्या राणीला जाणवलं कि आता इथली सत्ता कंपनीकडून काढून घेऊन आपल्या  हातात घेतली पाहिजे.

पुढच्याच वर्षी राणीने जाहीरनामा काढला व भारत देशाचा कारभार तिच्या नावाने चालू लागला. हिंदुस्थानची ती साम्राज्ञी बनली.

इंग्लंडप्रमाणे भारतात प्रशासकीय व्यवस्था लागू झाली. भारतीयांना देखील या राज्यकारभारात हळूहळू सहभागी करून घेण्यास देखील सुरवात झाली. इंग्लंडमधून परीक्षा पास झालेले मोठमोठे अधिकारी या प्रशासकीय व्यवस्थेत काम करण्यासाठी भारतात येऊ लागले.

यातच एक होता जॉन मेनार्ड केन्स

त्याचा जन्म लंडन येथे ५ जून १८८३ रोजी झाला. तो लहानपणापासून प्रचंड हुशार होता. वडील केंब्रिज विद्यापीठात शिक्षक होते. याने देखील याच विद्यापीठातून गणिताची पदवी संपादन केली. कॉलेजमध्ये असतानाच त्याने अनेक शिष्यवृत्त्या पटकावला होत्या, कित्येक मानाचे पुरस्कार मिळवले होते. त्याकाळातच त्याच्या बुद्धिमत्तेच्या चर्चा लंडनमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या.

माल्कम नावाच्या प्रतिथयश अर्थतज्ञाने त्याच्या वडिलांना पत्र लिहिले,

“Your son is doing excellent work in economics. I have told him that I should be greatly delighted if he should decide on the career of a professional economist.

पण केन्सच्या वडिलांचं मत त्याने स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बनाव असं होतं. वडिलांच्या इच्छेखातर केन्सने सिव्हिल एक्झामची तयारी केली.

१९०६ साली त्याने स्पर्धा परीक्षा दिली, सहाजिकच पहिल्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. त्याचा या परीक्षेत पहिला नंबर अगदी काही मार्कांनी हुकला पण त्याच त्याला अनेक दिवस राहून राहून वाईट वाटत राहिलं. त्याची पहिली पोस्टिंग लंडनमधल्या इंडिया ऑफिस मध्य झाली. तिथे टपाल खात्याच काम तो पाहत असे. गंमतीने तो सांगायचा

मला मिळालेली पहिली असाइनमेंट म्हणजे इंग्लंडमधून दहा बैल मुंबईला पाठवणे.

जॉन केन्स सारख्या प्रचंड हुशार अर्थतज्ञाच्या दृष्टीने  इथलं काम काही आव्हानात्मक नव्हतं. पुढच्याच वर्षी त्याची नेमणूक रेव्हेन्यू स्टॅटेस्टिक्स व कॉमर्स डिपार्टमेंट मध्ये झाली. या काळात त्याने भारतीय अर्थव्यवस्थेचा त्याच्या पुढील आव्हानाचा प्रचंड अभ्यास केला. भारतातल्या अफूच्या व्यापारापासून ते ज्यूट व्यापारापर्यंत अनेक गोष्टींमध्ये रेग्युलेशन आणण्यासाठी त्याने काम केलं.

याच काळात त्याचा केंब्रिज विद्यापीठात आर्थर पिगूच्या मार्गदर्शनाखाली प्रोबॅबलिटी थियरीवर रिसर्च चालू होता. १९०९ साली त्याने जागतिक मंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम या विषयावर रिसर्च पेपर प्रसिद्ध केला. त्याच वर्षी मार्शलच्या आग्रहामुळे त्याने आपली इंडियन पोस्ट मधील नोकरी सोडली व शिक्षकाची नोकरी पत्करली.

केन्स आता पूर्णवेळ अर्थशास्त्रज्ञ बनला होता. १९१३ साली त्याच पहिलं पुस्तक पब्लिश झालं ते होतं

Indian Currency and Finance

भारतीय चलन व अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारे हे महत्वाचे पुस्तक मानले गेले. इंग्लंडच्या आर्थिक वर्तुळात हे पुस्तक चांगलेच गाजले. यातच त्यांनी बँक ऑफ बंगाल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास यांचे विलीनीकरण करून एका सेंट्रल बँकेची स्थापना करावी असा सल्ला दिला.

या पुस्तकाचा शेवटचा लेख लिहीत असताना त्यांची भारतीय चलन व वित्तव्यवस्थेच्या अभ्यासासाठी नेमलेल्या रॉयल कमिशन वर नेमणूक झाली. या काळात आपल्या पुस्तकात मांडलेली मते त्यांना प्रत्यक्षात आणता आली. भारतीय अर्थव्यवस्थेतील फॉरेन एक्स्चेंज, गोल्ड एक्स्चेंज वगैरे बाबींवर त्यांनी आवर्जून लक्ष दिले.

त्यावेळी त्याने भारतात सेंट्रल बँक असावी हे म्हणणे रेटून धरले. या बँकेचे मुख्य काम सरकारची बँक व बँकांची बँक म्हणून असणार होते. भारतीय बँकिंग क्षेत्रावर नियमन करण्यासाठी हि बँक अस्तित्वात यावी असं केन्सच मत होतं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या तिन्ही बँकांचे विलीनीकरण करून इम्पेरियल बँकेची स्थापना करण्यात आली.

२७ जानेवारी १९२१ साली अस्तित्वात आलेल्या या बँकेला आपण आज स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून ओळखतो.

पहिले महायुद्ध संपल्यावर इंग्लंडचे पंतप्रधान लॉइड जॉर्जचे आर्थिक सल्लागार म्हणून व्हर्सायच्या तहाच्या वाटाघाटीसाठी पॅरिसला गेला. तथापि, तेथे जर्मनीवर लादणाऱ्या मानहानिकारक अटींमुळे त्यांची निराशा झाली. ‘द इकॉनॉमिक क्वान्सिकेन्सेस ऑफ द पीस’ या आपल्या पुस्तकातून व्हर्सायच्या तहावर त्यांनी टीका केली.

१९२९ साली अमेरिकेवर आलेल्या आर्थिक मंदीची लाट जगभर पसरली. तथापि इंग्लंड या मंदीतून सहिसलामत बाहेर पडले. याला कारण केन्स यांनी सुचविलेल्या उपाययोजना. ‘द जनरल थेअरी ऑफ एम्लॉयमेंट’ ‘इंटरेस्ट अँड मनी’ हे ग्रंथ १९३६ साली लिहिले. त्यांनी लिहिलेले हे ग्रंथ खूपच गाजले. यातून बेकारी, महामंदीची कारणे, परिणाम, उपाययोजना यांची चर्चा केली आहे. अमेरिकेला महामंदीतून बाहेर काढण्यासाठी तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांनी खास केन्सला इंग्लंड वरून बोलावून घेतलं.

ऍडम स्मिथ, कार्ल मार्क्सनंतर जगाचं चित्र बदलणारा अर्थ तज्ज्ञ म्हणून जॉन मेनार्ड केन्स याला ओळखलं जातं.

भारतात त्यांच्या तोडीस तोड एक अर्थतज्ज्ञ होऊन गेला तो म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर. राजकीय व सामाजिक कार्यामुळे त्यांना आपल्या अर्थशास्त्रीय अभ्यासाला वेळ देता आला नाही मात्र त्यांचे व केन्सचे अर्थ विषयक विचार बऱ्याच अंशी जुळत होते. त्यांनीच लिहिलेल्या पुस्तकावरून ब्रिटिश शासनाने भारताला एका पूर्ण वेळ रिझर्व्ह बँकेची आवश्यकता आहे हे ओळखलं व १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन झाली.

यानंतर इम्पेरियल बँकेवरील इतर कामांचा भार कमी झाला. देशाच्या कानाकोपऱ्यात जाणारी सरकारी बँक म्हणून तेव्हा पासूनच तिची ओळख बनली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५५ साली नेहरूंनी साम्राज्यवादी वाटणारे तिचे नाव बदलून स्टेट बँक असे नाव दिले.

तेव्हापासून आजपर्यंत ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.