जपानी लोकांचे तंबाखूचे वांदे झाले होते आणि यातूनच कॅसिओ उभा राहिला…

युद्धात अनेक देश बरबाद होतात. मात्र हे ही तितकंच खरं आहे की राखेतून फिनिक्स पक्षासारखी उभारी घेणारे देशही या भूतलावर आहेत. जपान आणि जर्मनी ही अशीच दोन उदाहरणं. अमेरिकेनं टाकलेल्या अणुबॉम्बनं जपान बेचिराख झाला होता. मात्र जपाननं यातून उभारी घेतलीच. दुसऱ्या महायुध्दामुळं जपानपुढं उभं राहिलेल्या अनेक संकटातून मार्ग काढण्यासाठी जपानी नागरिक ज्या युक्त्या काढत होते त्यातूनच नवीन उद्योग जन्मला येत होते. अश्याच एका शोधातून कॅसिओचा जन्म झाला.

दुसऱ्या महायुद्धांनंतर जपानची अर्थव्यवस्था पूर्णपणे  ढासळली होती, एवढी की जपानी लोकांचे खरंच तंबाखूचे वांदे झाले होते. 

एक एक सिगरेट लोकं वाचवून वापरत होते. आणि यातूनच मग भन्नाट आयडीया बाहेर आली. ताड़ो काशियो यांनी एक होल्डर बनवला ज्यानं फिल्टरलेस सिगारेट अगदी लास्ट तुटक्यापर्यंत ओढता येत होती. जपानमध्ये सिगरेट एवढी महागली होती सिगरेटचा शेवटचा तुकडा वापरण्यासाठी हे होल्डर विकत घ्यायला लागले. काशिओ यांची ही आयडिया एवढी चालली की ताड़ो, काझुओ आणि इतर दोन भावांनी आपल्या फादरला कंपनीचं अध्यक्ष बनवून जोरात विक्री सुरू केली. 

पुढे पाश्चिमात्य देशांना म्हणायला इझी जाईल यासाठी कंपनीचं नामकरण कॅसिओ असं करण्यात आलं. 

पण चिकाटी रक्तातच असणारे जपानी एवढ्यावर खुश होणारे नव्हते. त्यांनी या धंद्यातून येणारे पैसे रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये लावले. 

याआधी ह्या भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केले होते, त्याचा त्यांना बिझनेस वाढवण्यात फायदा झाला. ताडो आणि काझाओ यांनी युद्धसामुग्री तयार करणाऱ्या फॅक्टरीमध्ये काम केले होते. १९५० च्या सुरुवातीस त्यांचा चौथा भाऊ, युकिओ, एक इंजिनिअर फर्ममध्ये सामील झाला. 

१९५७ त्यांनी एक नाविन्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक (इलेक्ट्रोमेकॅनिकल ऐवजी) कॅल्क्युलेटर तयार केले होते जे केवळ बेरीज आणि वजाबाकी करू शकत नव्हते तर गुणाकार देखील करू शकत होते.

 क्वालिटी आणि इन्व्हेन्शन यावर भर देणाऱ्या कॅसिओचं हे प्रॉडक्ट पण मार्केटमध्ये धुमाकूळ घालू लागलं. पण तरीही काशिओ भावांनी आपला रिसर्च सूरूच ठेवला. १९६५ पर्यंत, कॅसिओ डेस्कटॉप कॅल्क्युलेटर तयार करत होते. १९७२मध्ये, कंपनीने Casio Mini सादर केले, जे जगातील पहिले वैयक्तिक कॅल्क्युलेटर म्हणून ओळखले जाते. आणि त्यानंतर जगभरात जे कॅसिओचे कॅल्क्युलेटर फेमस झाले ते आजतागायत. 

दुकानातले साधे कॅल्क्युलेटर असू दे की इंजिनेरींगच्या पोरांचे सायंटिफिक आज कॅसिओचाच दबदबा आहे.

युरोपियन कारागीर इलेक्ट्रॉनिक घड्याळ्यांच्या मागे असताना, कॅसिओने क्वार्ट्ज आणि डिजिटल मॉडेल्सनची  “Time is continuous process ” या टॅग लाइनखाली  घड्याळं विकली.

पण कंपनीचा खरा दबदबा निर्माण केला जी-शॉक मॉडेलच्या घड्याळ्यांनी. 

जी-शॉक केवळ टिकाऊपणाच नव्हे तर सगळ्यात जास्त बॅटरी लाइफ असलेलं घड्याळ म्हणून आज पण दबदबा राखून आहेत. “मेन इन ब्लॅक” आणि “मिशन इम्पॉसिबल” सारख्या चित्रपटांमध्ये मार्केटिंग केल्यानंतर यांची पॉप्युलॅरिटीनं पार शिखर गाठलंय.

कॅसिओ आज एक इलेक्ट्रॉनिक पियानो , डिजिटल कॅमेरा आणि पॉकेट टेलिव्हिजन, वर्ड प्रोसेसर, कार नेव्हिगेशन सिस्टम, रक्तदाब सेन्सर यांसारख्या अनेक उत्पादनात आघाडीचं नाव आहे. गरज ही शोधाची जननी असते, तर जिद्द हा त्याचा बाप हे काशिओ ब्रदर्सनी कॅसिओ कंपनीच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.