चीनचे दुश्मन, भारताचे मित्र, कोण आहेत दलाई लामा?

तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी नुकतचं भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना शुभेच्छा दिल्या. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चे चर्चेत येतातचं. हे तेच दलाई लामा ज्यांना चीन स्वतःचा सगळ्यात मोठा शत्रू मानतं आणि बाकी जग त्यांना शांती आणि करुणेने भरलेला संत मानतं, बुद्धांचा अवतार मानतं…

हे दलाई लामा नक्की कोण? भारताशी त्यांचा संबंध काय? या सगळ्या गोष्टी या लेखातून जाणून घेऊ…

१९३७ चं साल होतं. तिबेटमधील ताक्तसेर गावात एका शेतकरी कुटुंबात ह्वामो धोंधूप नावाच्या मुलाचा जन्म झाला. २ वर्षाचं असताना हे लेकरू एक दिवस त्याच्या पिशवीत काही सामान भरू लागलं. आईने कुतूहलाने विचारलं… काय रे? कुठे जायचंय? क्षणात त्या लेकराच्या डोळ्यांत चमक आली आणि त्याने हसत उत्तर दिलं..

“ल्हासाला जातोय, जगातील सर्वोच्च पिठाकडे.”

आईला वाटलं असंच बोलतोय पण तसं नव्हतं. तिबेटच्या नवव्या पंचेम लामा यांना स्वप्नात काही संकेत मिळाले होते, ज्याचा अर्थ लावल्यानंतर ल्हासावरून बौद्ध साधूंचं शोध पथक याच मुलाचा शोधात निघालं होतं. जेव्हा ते ताक्तसेर गावात ह्वामोच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं. त्यांनी मुलाला एका आसनावर बसवलं. त्याच्यासमोर जुना चष्मा, डमरू आणि घंटी ठेवली. 

त्या मुलाने काही क्षण त्याकडे बघितलं आणि म्हणाला “हे माझंय”. मग त्याच्या समोर काही काठ्या ठेवल्या. त्याने एक काठ उचलली आणि दूर फेकली… परत एक काठी उचलली आणि छातीशी लावली… हे बघताच सगळे बौद्ध साधू लगेच गुडघ्यावर बसले आणि डोकं नमवलं.. 

तिबेटमध्ये धर्मगुरूंना शोधण्याची ही पारंपरिक प्रक्रिया होती. त्यानुसार तिबेटला त्या मुलाच्या रूपात १४ वे दलाई लामा मिळाले होते. तो मुलगा म्हणजे १३ व्या दलाई लामांचा पुनर्जन्म होता, असा साधूंना विश्वास पटला होता. 

ह्वामो धोंधूपला ल्हासाला आणलं गेलं आणि त्याचा तेनजीन ग्यात्सो झाला. १९३९ साली ४ वर्षांच्या तेनजीनचा राज्यारोहण समारंभ झाला आणि वयाच्या ६ वर्षी त्याची दीक्षा सुरु झाली. अभयसक्रमात जीवनाच्या तत्वावर आधारित १० विषय आत्मसात करायचे होते आणि शेवटी ४५ साधूंशी शास्त्रात्रांच्या चर्चेची कडक परिक्षा पास करावी लागत होती.

या शिक्षणासोबत दलाई लामा यांना विज्ञानाची गोडी लागली होती. मशिनसोबत खेळणं त्यांना आवडायचं. विज्ञानाच्या बाबतीत जगाचे गुरु दलाई लामा यांनी अमेरिकेचे सायंटिस्ट डेव्हिड बोहम यांना गुरु मानलं होतं.

हा तो काळ होता जेव्हा तिबेट स्वतंत्र देश होता, तो चीनचा हिस्सा नव्हता. एकीकडे दलाई लामा यांचा अभ्यास सुरु होता तर दुसरीकडे चीनमध्ये माओत्से तुंगची कम्युनिस्ट पार्टी चीनवर कब्जा मिळवण्यासाठी षडयंत्र रचत होती. अखेर १ ऑक्टोबर १९४९ ला कम्युनिस्ट नेता माओत्से तुंगच्या नेतृत्वात चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली आणि माओत्से तुंगने चीनला रिपब्लिकन ऑफ चायना घोषित केलं.

त्यानंतर बॉर्डर वाढवायच्या इच्छेने माओत्से तुंगने १९४९ मध्ये तिबेटवर चिनी सेना पाठवली. त्यावेळी दलाई लामा फक्त १४ वर्षाचे होते. त्यांच्याजवळ ना सेना होती, ना युद्धाचा अनुभव. फक्त बुद्धाची करुणा आणि आत्मविश्वास होता. अखेर तिबेटला शरण यावं लागलं. मे १९५१ मध्ये बीजिंगमध्ये तिबेटचे नेते आणि कम्युनिस्ट पक्षामध्ये १७ सूत्री करार झाला.

तिबेटची स्वायत्तता, नेत्यांचे जुने पद तसेच राहतील, तिबेटी संस्कृती आणि मठांना काहीच होणार नाही फक्त तिबेटला चीनच्या सरकारअंतर्गत काम करावं लागेल, असं सांगितलं गेलं. बंदुकीच्या जोरावर करार मंजूर करून घेतला गेला आणि नंतर धोकाच मिळाला असं दलाई लामा सांगतात. तिबेटी लोकांना मारलं जाऊ लागलं, हवं तसं नाचवलं जाऊ लागलं, स्वातंत्र्य नावाचा प्रकारचं राहिला नाही. 

तेव्हा १९५४ साली दलाई लामा माओला विनंती करायला गेले. आमच्या संस्कृतीला काहीच होऊ नये, फक्त इतकी मागणी आहे असं म्हणाले मात्र माओने सिगरेटचा धुवा बाहेर फेकत उत्तर दिलं…

“दलाई लामा, धर्म अफीम आहे,  हे लोकांत विष भरतं.  या धर्माला मी तिबेटमधून साफ करेल.”

त्यानंतर १९५६ ला दलाई लामा बुद्धांच्या २५०० व्या जयंतीनिमित्त पहिल्यांदा भारतात आले. तेव्हा त्यांनी भारताकडे मदत मागितली. मात्र चीन आणि भारतात १९५४ मध्ये करार झाला होता ज्यानुसार दोन्ही देश एकमेकांच्या आंतरिक गोष्टींत हस्तक्षेप करणार नाही असं ठरलं होतं. म्हणून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी मदत करायला नकार दिला. 

तिबेटची अवस्था अजून बेकार होत होती. दरम्यान १९५८ दलाई लामांची शेवटची परीक्षा झाली आणि ४५ विद्वानांत ते अव्वल आले. औपचारिक परीक्षा पास झाले मात्र राजकीय परीक्षा बाकी होती. १९५९ मध्ये एकदिवस ल्हासाच्या त्यांच्या पॅलेसजवळ शेकडो लोक गोळा झाले. त्यांची मागणी होती की, चीनच्या आर्मी कॅम्पमध्ये  आयोजित कार्यक्रमात दलाई लामांना एकटं  बोलावलं होतं तिथे त्यांनी जाऊ नये. 

दलाई लामा लोकांच्या प्रेमासमोर झुकले आणि गेले नाही. मात्र दुसऱ्याच दिवशी चीनच्या सेनेने राग काढायला सुरुवात केली. 

लोकांना मारत ते दलाई लामांच्या पॅलेसजवळ आले तेव्हा त्यांच्या मार्गदर्शकांनी त्यांना पलायन करायला सांगितलं… १७ मार्च १९५९ ला दलाई लामांनी रेड आर्मीपासून लपत प्रवास सुरु केला. रात्री कोणताही उजेड न करता दारी खोऱ्यातून ते प्रवास करायचे, दिवसा गुहेत लपायचे. अखेर ३१ मार्च ते भारतात पोहोचले.

बुद्धाच्या जमिनीवर त्यांना आश्रयाची अपेक्षा होता, ती खरी ठरली आणि  नेहरू यांनी दलाई लामांची शरणार्थी म्हणून घोषणा केली. त्यांना हिमाचल प्रदेशात धर्मशाळेची जागा देण्यात आली.  

दलाई लामांनी जागा कशी आहे हे तपासायला एका शिष्याला पाठवलं. त्याने परत येऊन सांगितलं… “त्या जागेतील पाणी दुधापेक्षा शुद्ध आणि गोड आहे.” दलाई लामा लागलीच एप्रिल १९६० ला ८० हजार शरणार्थींसोबत  हिमाचलला पोहोचले आणि तिथून तिबेटचं शासन चालवायला सुरुवात केली, जे आजही सुरु आहे.

दलाई लामा यांनी तिबेट सोडलं तेव्हा रेड आर्मीने तिबेटच्या रस्त्यावर इतके मृतदेह पाडले होते की जेव्हा त्यांना जाळलं गेलं तेव्हा अक्खा एक दिवस तिबेटचं आकाश काळ्या धुक्याने भरलं होतं, असं सांगितलं जातं. आपलं सगळं हिरावून घेतलेल्या चीनबद्दल आजही दलाई लामा म्हणतात…

“मी त्यांच्यावर नाराज नाहीये. त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळतील, मला त्यांच्याशी सहानुभूती आहे.”

इतक्या वर्षांपासून भारतात राहणाऱ्या दलाई लामा आणि तिबेटी लोकांनी कधीच भारताची मर्यादा ओलांडली नाही आणि स्वतःची संस्कृती देखील जपली. काही होवो हा व्यक्ती हसून प्रत्येकाला माफ करतो.

“परिवर्तन हेच सत्य आहे” असं त्यांचं म्हणणंय आणि करुणा हाच त्यांच्या जगण्याचा मार्ग. म्हणूनच लोकांना त्यांच्यात बुद्ध दिसतो. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.