नेटफ्लिक्स पाहिलं, दुनियादारी केली पण अभ्यासाबाबत प्रॅक्टिकल राहिलो आणि DySP झालो

दुनियादारी करताना तोल न जावून देता स्वत:च करियर करणाऱ्या भिडू लोकांची एक बिरादरी असते. ही पोरं जिथ जाईल तिथ मनमौजी जगतात एखाद्या गोष्टीसाठी मन मारणं त्यांना जमत नाही. पण ही पोरं स्वत:च्या करियरबाबत देखील तितकीच प्रॅक्टिकल राहतात.

Dy SP झालेला तासगावचा विवेक पाटील अशा गॅंगमध्ये १०० टक्के फिट बसणारा मुलगा. आजकाल मी फोन बंद करून दहा वर्ष अभ्यास केला, मी सोशल मिडीया सोडून दिला. मी माझ्या आयुष्यातील खास लोकांना दूर केलं. एकही पिक्चर बघितला नाही असं सांगणाऱ्यांचा जमाना असताना हा नेटफ्लिक्सवर असायचा. तो जगभरातले उत्तम सिनेमे पहायचा, मित्रांसोबत फिरायला जायचा. थोडक्यात सांगायचं तर दुनियादारी न विसरता तो प्रक्टिकल राहून अभ्यास करायचा.

बोलभिडूसाठी तूच तुझी गोष्ट सांग अशी विनंती आम्ही त्याला केली आणि खूप साचलेलं बोलूनच टाकूया म्हणून तो बोलता झाला. 

डि.वाय.एस.पी. झालेल्या विवेक पाटीलची ही गोष्ट त्याच्याच शब्दात 

राज्यसेवा किंवा केंद्रिय लोकसेवा आयोगाचा निकाल आला की नव्याने अधिकारी झालेल्यांच्या मुलाखती गाजू लागतात. वर्तमानपत्रांपासून ते युट्यूबसारख्या माध्यमांमधून या मुलाखती झळकतात. याचा चांगला फायदा असा झालाय की, बरेचजण MPSC/ UPSC च्या घातक क्षेत्रात उडी घेण्याचं धाडस करू लागले. प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर तुमची शैक्षणिक -सामाजिक पार्श्वभूमी, घरातील आर्थिक परिस्थिती, इतर क्षेत्रांप्रमाणे असणारी वारेमाप फी यांचा इथे तितकासा फरक पडत नाही, सर्वसमावेशकता आहे. त्यामुळेच ग्रामिण पार्श्वभूमी असणाऱ्या मुलांनी धाडसाने या क्षेत्रात आपल यश संपादन करण्यास सुरवात केली. हा फरक निश्चितच भाषणांमुळे पडला. 

पण एक तोटा मात्र खूप मोठ्या प्रमाणात झाला,

तो म्हणजे फक्त भाषणाने, success stories ने किंवा अशा प्रकारची पुस्तके वाचून प्रभावित होवून अनेकजण या क्षेत्रात आले. एखादा सिनेमा पाहिल्यावर त्याचा जोर जसा मनावर काहीकाळ राहतो तसा जोर या भाषणांचा राहिला. काही काळात जोर ओसरला तसा अभ्यास ओसरला. त्यातूनच बेकारीची वेळ देखील आली. मीही अशी भाषणे, मनोगते, पुस्तके वाचली, नाही असे नाही पण कुठं थांबायचं ते उशिरा कळलं आणि त्यावेळी स्पर्धापरीक्षांच्या वास्तवात प्रवेश केला.

स्पष्टच सांगायचं झालं तर २०११ ला अभ्यास सुरु केलेला मी, या क्षेत्राचं खरं रूप थोड्याफार प्रमाणात का होईना समजायला २०१६ उजाडलं….

म्हणूनच UPSC असो वा MPSC  या क्षेत्राकडे प्रॅक्टिकली कसं बघावं यासाठी मी हा लेख लिहतोय. याचा उद्देश कोणाच्या यशअपयशाचा अपमान करण्याचा नक्कीच नाही, प्रत्येकाचा संघर्ष हा मोठा आहे आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हे अनुभव माझे व्यक्तिगत आहेत. अभ्यासाची दिशा माझी व्यक्तिगत आहे, त्यामुळे प्रत्येकाने याच गोष्टी फॉलो करून अभ्यास करावा अस मी ठामपणे सांगणार नाही. 

माझ नाव विवेक हरिदास पाटील. जन्मसाल ९० म्हणजे आज मी ३० वर्षांचा आहे. इंजिनिरिंग झाल्यानंतर म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी मी UPSC चा अभ्यास सुरू केला. म्हणजे मी या क्षेत्रासाठी साधारण ९ ते १० वर्षांचा वेळ म्हणजेच आक्खी विशी दिली आहे.

सातवीत स्कॉलशीप परिक्षेत नंबर, दहावी बोर्डात, पुढे १२ वी नंतर COEP सारख्या प्रतिष्ठित कॉलेजमधून इंजिनियर झालो. त्यामुळे हुशारीचा शिक्का(धब्बा म्हणलं तरी चालेल) मला पूर्वीच बसलेला. आईवडिल शिक्षक असल्याने शिक्षकांचा हुशार चिरंजीव असा बोनस देखील यात होता. 

यात problem फक्त एवढाच होतो कि, एकदा तुम्हाला हूशार असल्याचा शिक्का बसला तर तो शिक्का तुम्हाला मेन्टेन करावा लागतो. लोकांच्या अपेक्षा वाढतात. ही गोष्ट देखील तुम्हाला वेगळ्या लेव्हलचं डिप्रेशन देवून जाते. म्हणजे तुम्ही हूशार आहात म्हणून चार वर्ष बास झाली. इतका हूशार तरिही UPSC झाला नाही इथपासून लोकांच्या बोलण्याचा मनस्ताप सहन करावा लागतो.

असो तर ही हूशारी घेवून मी UPSC त उतरलो. पण इतक्या वर्षांच्या अभ्यासानंतर सांगू वाटतं की शाळेतील हूशारी तुमचा बेस पक्का करते . त्यामुळे काही गोष्टी समजणं सोप्या जातात. अभ्यास करण्याची सवय असते. इतकाच काय तो फायदा असतो, बाकी काही नाही… 

भारत फोर्ज मध्ये मिळालेली नोकरीची निमंत्रण पत्रिका तशीच ठेवून मी दिल्लीचा रस्ता धरला. आजही UPSC साठी दिल्ली आणि MPSC साठी पुण्याला जाण्याची क्रेझ कायम आहे. मीही अपवाद नव्हतो याबाबत सांगायचं झालं तर दिल्लीत मी गेलो २०११ साली. ४ महिने राहिल्यानंतर मुंबईच्या SIAC साठी माझी निवड झाली आणि पुढील अभ्यास मी मुंबईच्या SIAC मधून केला,पण तिथे माझं जाणे खूपच लवकर होतं असं दिसून आलं नंतर. या काळात लेक्चर अटेंन्ड करण, नोट्स काढणं, group discussions या गोष्टी सुरू होत्या. 

माझ्या मते पहिल्या वर्षा दिड वर्षात तुम्ही जो अभ्यास करता त्यातून तूम्ही MPSC, UPSC सारख्या क्षेत्रात टिकून राहता. तर यानंतर जे परिश्रम घेता त्यातून तुम्ही पोस्ट मिळवू शकता. बरीच मुलं वर्षा दिड वर्षांच्या टप्यानंतर सॅच्युरेट होतात. भूताखेताच्या गोष्टी सांगताना जसा चकव्याच्या गोष्टी सांगितल्या जातात तसाच हा चकवा असतो. वर्षादिडवर्षांच्या अभ्यासानंतर पार पडलो, आत्ता नविन काही नाही, वाचतोय तरी पोस्ट मिळत नाही अशा शंका येतात.

तेव्हा यातून बाहेर पडून पुढे जाणं देखील तितकच महत्वाचं आहे, हेही आवर्जून लक्षात घ्यावं… 

२०१२ ते २०१७ या वर्षात मी माझे UPSC चे सर्व अटेम्प्ट दिले. २०१६ साली मी UPSC ची मुलाखत दिली. दरम्यानच्या काळात सिक्युरिटी म्हणून हातात काहीतरी असावं म्हणून UIIC insurance AO झालो. ही नोकरी १० महिने केल्यानंतर MPSC चा पहिला निकाल लागला. यावेळी मी २०१४ साली नायब तहसिलदार झालो. त्यानंतरही UPSC /MPSC असा खेळ सुरूच होता आणि आत्ता 2020 ला  DySP पोस्ट मिळाली… 

आत्ता या सर्व प्रवासात दिल्ली/पुणे  महत्वाचं ठरत का हा प्रश्न ? 

तर मी UPSC क्लिअर करु शकलो नाही म्हणून मी १०० टक्के याबाबत सांगेन त्यात तथ्य असेल का ते माहित नाही पण जे यशस्वी झाले त्यावरून असं सांगता येईल कि, २०१५-१६ च्या पूर्वी दिल्लीतले क्लास दिल्लीसाठीच मर्यादित होते. निश्चितच नवीन शिकायला मिळत होतं. मी UPSC पास झालो नाही पण एक मुलाखत आणि चार मुख्य परिक्षा देवू शकलो. यावरून मात्र एक गोष्ट निश्चितच सांगेल क्लास, स्टडी मटेरियल आणि व एकंदरित वातावरणाचा तुम्हाला चांगला फायदा होवू शकतो.

पण २०१५-१६ नंतरच्या काळात बऱ्याच क्लासेसनी तसेच online platforms नी आपले स्टडी मटेरियल इंटरनेट वर  आणले आहे. Online च्या सिस्टिममुळे दिल्लीला जावेच अस आता उरलेलं नाही. 

तरिही वेळ, वय आणि आर्थिक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असे मी म्हणेल. जायचे ठरल्यास, दिल्लीला गेल्यानंतर किमान एक अटेंम्प्ट व्यवस्थित द्यावा. दिड ते दोन वर्षांपर्यन्तचा वेळ द्यावा असं मी म्हणेल. १७५० मार्कांचे पेपर लिहण्यासाठी एक प्रोफेशनल अप्रोच लागतो त्याची तयारी इथे होवून जाते. 

MPSC आणि पुणे देखील असेच नाते आहे. पुणे चांगलंच पण ठराविक वेळ झाल्यावर एकटेपने अभ्यास देखील फायदेशीर ठरतो. मी या attempt ला घरीच राहिलेलो. 

दूसरा महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्रित कराव्यात का ? 

२०१३-१४-१६-१७ हे चार वर्ष UPSC मेन्स आणि २०१२-१३–२०१४-१८-१९ हे पाच वर्ष MPSC मेन्स. मी दोन्हीकडे स्वीच होत राहिलो आणि त्याचं व्यक्तिगत नुकसानच झालं असं मी म्हणेल. त्याचसोबत एक पोस्ट हातात घेवून पुढचा अभ्यास करु शकेल ही गोष्ट सुद्धा रिस्की ठरू शकते अस मी म्हणेल.

माझ्या स्वत:च्या बाबतीत सांगायचं झालं तर क्लास टू असणाऱ्या नायब तहसिलदार पदावरून क्लास वन पोस्ट मिळवण्यासाठी मला ५ वर्षांचा कालावधी लागला. साधारणतः १० टक्केच पद असणारे अधिकारी याप्रकारे पुढे जाऊ शकलेत, अशी आकडेवारी सांगते. त्यामुळे व्यक्तिगत रिस्क घेण्याची तयारी असेल तर एकच गोष्ट ठरवून एका वेळी करावी अस मी म्हणेल. 

बाकी विषय तो म्हणजे या काळात तुम्ही सोशल नसाल तर ? 

विचार करा मी २०११ पासून ते आजतागायत म्हणजे २०२० पर्यन्त सोशल मिडीयाचा वापर केला नसता, जगभरातले सिनेमे पाहिले नसते, नेटफ्लिक्स वरती वेगवेगळे सिनेमे पाहिले नसते. पर्सनल आयुष्यात प्रेमप्रकरणं केलं नसतं, मित्रांशी बोललो नसतो, बाहेर फिरायला गेलो नसतो तर आज पोस्ट मिळवून देखील त्या पोस्टला मी न्याय देवू शकलो असतो का? मी किती गोष्टी मीस केल्या असत्या आणि त्याहून अधिक मला जग समजूनच घेता आले नसते. 

अभ्यासाबाबत प्रॅक्टिकल राहून तुम्ही सर्व गोष्टी कराव्यात अस मला वाटतं. मग त्या सोशल असोत की तुमचं व्यक्तिगत आयुष्य असो. पर्सनल लाईफ आणि करियर मिक्स करायचं नसतं. सुरवातीला मी देखील याला अपवाद नव्हतो. पहिला चुका केल्या नंतर त्या सुधारल्या. याचा अर्थ एकलकोंडा नाही झालो तर प्रत्येक गोष्टीसाठी टाईम ठरवला.

मी मुख्य परिक्षेच्या काळातच सोशल मिडीयापासून दूर रहायचो. परिक्षेच्या कालावधीतच गेम ऑफ थ्रोन्सचा सिझन रिलीज झाला होता, क्रिकेट वर्ल्ड कप सुरु होता, seriously अवघड जात या गोष्टींपासून दूर राहणं, तेव्हा टायमिंगचे नियोजन करावेच लागले. तुमच्या आवडीच्या गोष्टी टाळून तुम्ही अभ्यास करत असाल तर तो प्रकार एखाद्या शिक्षेसारखा असतो म्हणून मी परिक्षेबाबत प्रॅक्टिकल राहून अभ्यासाचे नियोजन करा असेच सांगेल.

साध्या भाषेत सांगायचं तर जग भारी आहे, MPSC/ UPSC च्या बागुलबुव्वापायी ते मीस करु नका. तस केलं तर उद्या नोकरी करताना तुम्हाला समोरच्या व्यक्तिची मानसिकता देखील समजून घेता येणार नाही, त्याचं ऐकून घेता येणार नाही… 

थोडक्यात सांगायचं तर MPSC असो की UPSC वेळ देवून प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून अभ्यास करायला हवा. फस्ट्रेशन का येत याचा विचार करावा. स्वत:च्या स्वभावामुळे, परिक्षेच स्वरुप न समजल्यामुळे, स्पर्धा केल्यामुळे, कमी वेळात यशाची अपेक्षा ठेवल्याने फस्ट्रेशन येत याचा परिणाम घर, कुटूंब आणि अभ्यासावर होता. त्यामुळे मोकळेपणाने रहाणारे लोक लवकर यशस्वी होतात.

जाता जाता सांगण्यासारखा मुद्दा म्हणजे,

Success ratio 0. 0001 आहे. जे विद्यार्थी अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत त्या बाजूने देखील एकदा विचार करा. स्पर्धा परिक्षांना समाजाने खूप “ग्लोरिफिकेशन” केलं आहे.

त्यामुळे वयाची संपुर्ण विशी घालवणं कितपण योग्य आहे याचा विचार करावा. आर्थिक बाजू पहावी. एवढी वर्ष घालवून मनासारखी पोस्ट मिळाली नाही तर ऑफिसर म्हणून कामात १०० टक्के देवू शकत नाही. त्यामुळे सारासार विचार करून कायम प्लॅन B तयार ठेवावा. 

MPSC हारायला शिकवते, त्यातूनपण नियती आणि वेळ यांवर विश्वास ठेवला तर जमतं मग. प्रेशर टाळता यायला हवं. हसून दुर्लक्ष केलं की कधीकधी सोप्प जातं. कोरोनामुळे बरेच परीक्षार्थी घरी असतील, टोमणे बसत असतील, तर घरच्यांचे, शेजाऱ्यांचे हसून स्वागत करा, reply देत नका बसू, शांतपणे ऐकून घ्या फक्त कारण त्यात अडकले तर इकडे एखादा मुद्दा मिस होऊ शकतो,

So, enjoy the process… All the Best…

जास्त शहाणपणा दाखवला असेल तर कृपा करून समजून घ्या मित्रानो, 9-10 वर्षांचं भरून काढलंय असं समजा.

विवेक हरिदास पाटील (तासगाव) 

संपर्क : vivekpatil708042@gmail.com

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.