RSS च्या या सरसंघचालकांनी खुद्द वाजपेयींना ‘आता रिटायर व्हा’ अशी धमकी दिली होती

कुप्पाहाली सीतारमय्या सुदर्शन उर्फ के.एस. सुदर्शन यांचा जन्म छत्तीसगड इथल्या एका कानडी ब्राम्हण कुटूंबात झाला. त्यांनी जबलपूर मधून टेलिकम्युनिकेशन या विषयात इंजिनिअरिंग केलेलं होतं.

वयाच्या नवव्या वर्षी संघाच्या शाखेत जाण्यास सुरवात केली. वयाच्या तेविसाव्या वर्षी संघप्रचारक बनले. त्यांची कामाची धडक बघून पुढच्या दहा वर्षातच मध्यभारताचे प्रांतप्रचारक म्हणून नेमणूक झाली.

अगदी कमी वयात संघात ते महत्वाच्या पायऱ्या चढत गेले.

के सुदर्शन यांची आरएसएस च्या खास वर्तुळात समावेश झाला. हिंदुत्वाचा व स्वदेशीचा पुरस्कार आक्रमकतेने करणारा संघ कार्यकर्ता म्हणून त्यांची देशभरात ओळख निर्माण झाली होती. ते प्रखर राष्ट्रवादी होते.

त्यांच्याप्रमाणेच मध्यप्रदेश मधून आलेल्या एका संघ स्वयंसेवक नेत्याशी मात्र त्यांचं कधीच पटलं नाही.

ते म्हणजे अटलबिहारी वाजपेयी.

वाजपेयी ग्वाल्हेरचे. त्यांनी देखील अगदी लहानवयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. प्रचारक बनले. त्यांचे वक्तृत्व, संघटन कौशल्य पाहून संघाने त्यांची रवानगी आपल्या राजकीय पक्षात म्हणजेच जनसंघ मध्ये केली.

कमी वयात वाजपेयी खासदार बनले, आपल्या भाषणांनी संसद गाजवलं. नेहरूंनी देखील त्यांचं कौतुक केलं.

वाजपेयींचा स्वभाव मवाळ होता. ते हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते मात्र त्यांची भूमिका सर्वसमावेशक होती. प्रत्येक पक्षात त्यांचे मित्र होते, विरोधकांनाही जिंकण्याची त्यांची हातोटी होती.

त्यांनी व लालकृष्ण अडवाणी या दोघांनी भारतीय जनता पक्ष उभा केला. त्याची पाळेमुळे देशभरात पोहचवली.

लालकृष्ण अडवाणी यांनी रामजन्मभूमी आंदोलन छेडून आक्रमक धोरण स्वीकारले, त्यांच्या रामरथयात्रेने भाजपला केंद्रात सत्तेपर्यंत पोहचवलं.

पण जेव्हा सत्ता स्थापनेची वेळ आली तेव्हा विरोधी विचारसरणीच्या पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला.

आणि सर्वसमावेशक सर्वमान्य अटलजी भाजपचे पहिले पंतप्रधान बनले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था. भाजपचे नेते संघाच्या मुशीतून घडून आलेले असल्यामुळे सरसंघचालकांचा भाजपच्या राजकीय कार्यक्रमावर त्यांची बऱ्यापैकी पकड असतो.

वाजपयो पंतप्रधान बनले तेव्हा सरसंघचालक होते डॉ. राजेन्द्रसिंह उर्फ रज्जूभैया. रज्जू भैया यांचे वाजपेयींशी चांगले संबंध होते. दोघांचे विचार जुळायचे यामुळे कधी सरकार व संघ यामध्ये वादाचे प्रसंग कधी आले नाहीत.

पण रज्जू भैया यांची तब्येत बिघडली तसे त्यांनी संघाच्या कामातून लक्ष कमी केले. त्यांचा वारसदार असणाऱ्या के सुदर्शन यांच्या हातात कारभार आला.

सुदर्शन भावी सरसंघचालक होणार यावरून वाजपेयींनी नाराजी देखील व्यक्त केली होती. तेव्हाच संघात व केंद्र सरकारमध्ये ठिणगी पडणार याची चुणूक दिसली होती.

१० मार्च २००० साली सुदर्शन सरसंघचालक बनले. त्यांनी वाजपेयी यांनी आपल्या विरुद्ध मत व्यक्त केले होते ही गोष्ट कधीही विसरली नाही. गुजरात दंगल असो किंवा भाजप प्रणित एनडीएचे इतर निर्णय असो सुदर्शनजी खुलेआम टीका करताना दिसत होते.

अटलजी जेव्हा मोदींना राजीनामा द्यायला लावणार होते तेव्हा संघ मोदींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. वाजपेयींना एक पाऊल मागे घ्यावे लागले.

वाजपेयी-सुदर्शन हा संघर्ष इतका तीव्र होता की, नागपूरमधील कार्यकारिणीकरिता पंतप्रधान वाजपेयी नागपूरमध्ये आले असताना सुदर्शन हे अनुपस्थित राहिले व त्यांनी दोन सामान्य स्वयंसेवकांना त्यांचे स्वागत करण्यास धाडले होते.

पुढे २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा अनपेक्षित पराभव झाला.

वाजपेयींना पायउतार होऊन काँग्रेस सत्तेवर आली. मग मात्र सुदर्शन यांनी त्यांच्यावर तलवार उपसली.पंतप्रधान कार्यालयात अमेरिकी हस्तकांचा सुळसुळाट होता वगैरे विधानांनी खळबळ उडवून दिली.

भाजपचे सरकार जाण्यामागे वाजपेयी यांचे गुळमुळीत धोरण कारणीभूत आहे असं जाहीर मत त्यांनी व्यक्त केलं आणि भावी पंतप्रधान बनायचं म्हणून अडवाणी देखील पुरोगामीत्व ओढून पांघरत आहेत अशी चर्चा सुरू केली.

रेशीमबाग मैदानावर २००५ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सरसंघचालक सुदर्शन यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर सडकून टीका केली .

वाजपेयी यांच्यापेक्षा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी मोठ्या राजकीय नेत्या होत्या, असे वक्तव्य त्यांनी केले. वाजपेयींवर टीका करणाऱ्या सुदर्शन यांनी पी. व्ही. नरसिंहराव यांचेही गुणगान गायले होते.

अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांनी आता राजीनामा देऊन तरुण नेत्यांना संधी द्यावी

असं वादग्रस्त मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्याकाळचे विरोधी पक्ष करणार नाहीत एवढी टीका सरसंघचालकानी वाजपेयींच्या विरोधात केली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.