आपले स्टारडम बाजूला ठेऊन कमल हसन राजेश खन्नाचा बॉडीगार्ड झाला होता

लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही नक्कीच गोंधळात पडला असाल! हो नं ?  पण असं घडलं होतं. बॉलीवूड मधील अशा काही अन टोल्ड स्टोरी वाचताना किंवा ऐकताना खूप गंमत वाटते. कारण या स्टोरी मधून तुम्हाला असे अनपेक्षित आणि वेगळेच असे ऐकायला मिळते.

राजेश खन्ना आणि कमल हसन. 

दोघेही सुपरस्टार. एक हिंदी सिनेमाचा तर दुसरा दाक्षिणात्य सिनेमाचा. या दोघांचा एकही चित्रपट नाही. मग हे कसं घडलं? त्याचाच हा मनोरंजक किस्सा.

कमल हसन १९८१  साली आलेल्या ‘ एक दुजे के लिये’ या चित्रपटापासून हिंदी प्रेक्षकांना परिचित झाले. त्या पूर्वीदेखील ते एका हिंदी सिनेमा आले होते कां ? याचं उत्तर हो असे आहे पण या सिनेमात त्यांची अतिशय छोटी भूमिका होती आणि हा सिनेमा फ्लॉप झाल्याने  प्रेक्षकांच्या लक्षात आले नाही.

कमल हसन साऊथ कडील चित्रपटांचे सुपरस्टार होते. आजही आहेत.  त्यांच्या नावाचा मोठा बोलबाला तिकडच्या चित्रपटात आहे. हिंदी सिनेमाच्या मध्ये मात्र त्यांना फारसं यश मिळालं नाही. राजेश खन्ना सत्तरच्या दशकातील सुपरस्टार. अमिताभ  बच्चन यांच्या आगमनानंतर त्यांच्या आसनाला  सुरुंग लागला तरी राजेश खन्नाची लोकप्रियता देशभर कायम होती. त्याचाच  हा किस्सा आहे. 

१९७८  साली राजेश खन्ना साऊथ कडील निर्मात्याच्या एका चित्रपटात काम करीत होते. हा चित्रपट तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. या हिंदी चित्रपटाचे नाव होते ‘आईना’. १९७३ साली आलेल्या ‘आरंगेतरम’ या तमिळ सिनेमाचा हा रिमेक होता. के बालचंदर यांचे या सिनेमाला दिग्दर्शन होते.

‘आईना’ सिनेमाची आणखी एक आठवण म्हणजे राजेश-मुमताज चा हा शेवटचा चित्रपट होता. 

मुमताज या चित्रपटानंतर मयूर वाधवानी सोबत लग्न करून  लंडन ला निघून गेली.तिचा हा शेवटचा सिनेमा. तसेच या सिनेमाला संगीतकार नौशाद यांचे संगीत होते. राजेश खन्ना च्या या एकमेव सिनेमाला त्यांचे संगीत आहे.

या चित्रपटाचे सबंध शूटिंग त्या काळच्या चेन्नई मध्ये झाले. त्यामुळे राजेश खन्नाचा मुक्काम मद्रासला अनेक दिवस असायचा या काळात त्यांची मैत्री झाली कमल हसन यांच्याशी. कमल हसन के बालचंदर यांचे आवडते अभिनेते असल्यामुळे त्यांनी या ‘आईना’ चित्रपटात एक छोटी भूमिका देखील केली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या काळात घडलेली हि घटना आहे.

राजेश खन्ना आणि कमल हसन यांची चांगली मैत्री या काळात झाली. ते दोघेही चित्रपटाच्या शूटिंग नंतर बराच वेळ गप्पा मारत. कधीकधी ते दोघे शॉपिंगला जात. तर कधी मूव्ही पाहायला जात असेल. एकदा ही दोघे हॉलीवूडचा एक चित्रपट पाहायला थेटर मध्ये गेले. चित्रपट होता The Storm.

राजेश खन्नाला हा चित्रपट भलताच आवडला होता. या दोघांची एक सवय होती. हि दोघे  थिएटरमध्ये चित्रपट सुरू झाल्यानंतर प्रवेश करायचे आणि चित्रपट संपत आला की लगेच बाहेर पडायचे. कारण राजेश खन्नाला ओळखणारे मद्रास मध्ये भरपूर लोक होते. या गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून या दोघांनी ही आयडीया केली होती.

हा चित्रपट पाहताना मात्र राजेश खन्ना त्या चित्रपटात इतके मश्गुल घेऊन झाले की शेवटचे टायटल क्रेडिट्स देखील ते पहात बसले. हे क्रेडिट टायटल सुरू झाल्यानंतर कमल हसन ने त्यांना आपण पटकन बाहेर जाऊ असे सांगितले. पण राजेश खन्ना मात्र संपूर्ण टायटल्स पहात राहिले. 

शेवटी थिएटर मधील दिवे लागले आणि राजेश खन्ना व कमस हसन प्रेक्षकांच्या नजरेस पडले.

 कॉरिडॉरमध्ये एकच गोंधळ सुरू झाला. प्रत्येक जण राजेश खन्ना ला भेटण्यासाठी त्यांच्या जवळ येवू लागला. प्रचंड मोठी गर्दी त्यांच्या भोवती जमा झाली. लोक राजेश खन्ना ला पाहण्यासाठी, त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी उतावळे झाले होते. एकमेकांच्या अंगावर पडत राजेश खन्ना कडेच झेपावत होते. 

त्यावेळी कमल हसनने राजेश खन्ना च्या भोवती स्वतःला उभे करून संरक्षक भिंती सारखे त्यांना लोकांपासून दूर ठेवले. लोक कमल हसनच्या अंगावर तुटून पडू लागले. यात त्याचा संपूर्ण शर्ट देखील फाटला गेला. पण त्याने धीराने परिस्थितीला तोंड दिले. 

त्याने  राजेश खन्नाच्या जवळ लोकांना येऊ दिलेच  नाही. शेवटी  सिक्युरिटी आली पोलीस आले  आणि त्यांनी राजेश खन्ना ला सुखरूप पणे थिएटर च्या बाहेर काढले. राजेश खन्नाने कमल हसन चे मनापासून खूप आभार मानले. त्या रात्री तिथे जर कमल हसन नसता तर त्या दिवशी राजेश खन्ना वर मोठे संकट कोसळले असते. एक बॉडीगार्ड बनून  कमल हसन ने  राजेश खन्नाचे प्राण त्यादिवशी वाचवले!

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.