मोरारजी देसाईंना चप्पल मारून कलमाडींनी राजकारणात धडाक्यात एन्ट्री केली होती.

सध्या राजकारणातून विजनवासात गेलेले सुरेश कलमाडी म्हणजे एकेकाळी पुण्याचे धडाकेबाज कारभारी होते. सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी अशी त्यांची ओळख होती.

एक काळ असा होता सुरेश कलमाडी यांचा देशभरात दबदबा होता.

सुरेश कलमाडी यांचा जन्म पुण्यात एका कन्नड भाषिक ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे वडील शामराव कलमाडी हे प्रतिष्ठीत डॉक्टर होते. सेंट व्हिंसेंट स्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय अशा नामांकित शिक्षण संस्थामधून सुरेश कलमाडी यांनी शिक्षण घेतलं.

कलमाडी अभ्यासात हुशार होते. स्पोर्ट्समध्ये देखील त्यांची चांगली प्रगती होती. फर्ग्युसन मध्ये असताना त्यांनी एनडीए ची प्रवेश परीक्षा पास केली.

एनडीए मधून पास आउट झालेले कलमाडी साठच्या दशकात इंडियन एअरफोर्स मध्ये पायलट म्हणून जॉईन झाले.

१९६५ आणि १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात त्यांनी भाग घेतला. मिझोरममध्ये जेव्हा बंडखोरांनी राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केला. मिझो फुटीरतावादी संघटनावर बॉम्बफेकणाऱ्या विमानामध्ये सुरेश कलमाडी यांचा देखील समावेश होता.

कलमाडी यांची ओळख एक जांबाज स्क्वॉड्रन लीडर बनली होती. त्यांना शौर्यासाठी आठ मेडल देखील मिळाले होते.

पुढे त्यांनी हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्या काळी सुरेश कलमाडी यांचं डेक्कनला पुना कॉफी हाऊस नावाच रेस्टॉरंट होतं. अनेकदा ते तिथे गल्ल्यावर बसलेले दिसायचे. समाजवादी नेते निळूभाऊ लिमये यांच्याकडून त्यांनी हे कॉफी हाउस विकत घेतलेलं.

पुण्यात अनेक दिग्गज मंडळीची पुना कॉफी हाउस उठबस करायची जागा होती.

याच काळात सुरेश कलमाडी यांची ओळख मुंबईचे माजी शेरीफ व जायंट इंटरनॅशनल या संस्थेचे संथापक नाना चुडासामा व तेव्हाचे तरुण मंत्री शरद पवार यांच्याशी झाली. पवारांच्या प्रोत्साहनामुळे कलमाडी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकीय कामात सहभागी होऊ लागले. केली.

सुरेश कलमाडी प्रचंड महत्वाकांक्षी होते. काहीच दिवसात त्यांची पुणे युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली.

आणिबाणीनंतरच्या जनता सरकारचा हा काळ.

मोरारजी देसाई तेव्हा पंतप्रधान होते. इंदिरा गांधी व संजय गांधी यांच्याविरुद्ध त्यांनी आघाडी उघडलेली. आणीबाणीच्या काळात व त्या पूर्वी झालेला भ्रष्टाचार, लोकांवर झालेली दडपशाही याची चौकशी सुरु होती. कॉंग्रेसचे म्हणणे होते मोरारजी देसाई बदल्याची भावना मनात ठेवून काम करत आहेत.

जेव्हा मोरारजी देसाई पुण्यात आले तेव्हा सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. मोरारजी देसाई यांचा ताफा टिळकरोड वरून जात असताना टिळक स्मारक येथे कलमाडी यांनी त्यांच्यावर चप्पल फेकुण मारली.

प्रचंड गोंधळ झाला. दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात ही बातमी झळकली होती.

सुरेश कलमाडी यांचा हा पराक्रम संजय गांधी यांच्या पर्यंत जाऊन पोहचला. ज्या काळात सगळे कार्यकर्ते कॉंग्रेस सोडून जात होते तेव्हा रस्त्यावर उतरून जनता पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर आंदोलन करणाऱ्या कलमाडी यांचं त्यांनी बरच कौतुक केलं.

सुरेश कलमाडी यांचा स्टंट कामी आला. त्यांच्याबद्दलची चर्चा दिल्लीपर्यंत पोहचली. संजय गांधी यांच्या खास कार्यकर्त्यांच्या वर्तुळात कलमाडी यांचा देखील समावेश झाला.

पण गंमत म्हणजे पुढे काहीच वर्षात जेव्हा शरद पवारांनी कॉंग्रेस सोडली तेव्हा कलमाडी हे देखील त्यांच्या बरोबर बाहेर गेले. पुढे परत आले. त्यांना खासदारकी मिळाली, मंत्रीपद देखील मिळाल. पवारांची साथ सोडून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.

अॅथलेटिक असोशिएशनच्या माध्यमातून जगभरात एक कुशल क्रीडा संघटक म्हणून नाव कमवल.

पण दुर्दैव म्हणजे दिल्लीत भरलेल्या पहिल्या कॉमनवेल्थ स्पर्धेवेळी त्यांच्या कारभारावर प्रचंड टीका झाली. करोडोंचा घोटाळा असल्याचं समोर आलं. भ्रष्टाचारामध्ये कलमाडींचे हात अडकले आहेत असे आरोप झाले. त्यांना जेल मध्ये देखील जावे लागले.

एक योगायोग असाही

एकेकाळी मोरारजी देसाई यांना चप्पल मारून राजकारणात हिरो बनणाऱ्या कलमाडी यांना २०११ साली दिल्लीत सीबीआय कोर्ट बाहेर बूट फेकण्यात आले. सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी यांचे राजकारण संपले याची ती सुरवात होती. एक वर्तुळ पूर्ण झालं होतं.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. Rahul says

    चुकीच्या पद्धतीने राजकारणात प्रवेश केला आणि गेले ही चूक करून कशाला खरवडतय आत्ता ……..

Leave A Reply

Your email address will not be published.