भारताला पहिला एशिया कप मिळवून देणाऱ्या हिरोनं बक्षीसाचे १० हजार डॉलर्स टीममेट्सला वाटले होते…

यंदाच्या एशिया कपमध्ये भारताची कामगिरी कशी झाली हा विषय सोडून द्या. पण आजही सगळ्यात जास्त एशिया कप जिंकायचा विक्रम भारताच्याच नावावर आहे. एखादी स्पर्धा खराब गेली असली, तरी आशियाच्या क्रिकेट टीम्समध्ये भारतच दादा आहे, यात काय शंका नाही. जेव्हा १९८३ मध्ये एशिया कप ऑर्गनाईझ करणाऱ्या एशियन क्रिकेट कौन्सिलची स्थापन झाली, तेव्हा पुढाकार एनकेपी साळवे, जगमोहन दालमिया या भारतीय माणसांनीच घेतला होता.

त्यांच्याच प्रयत्नातून १९८४ मध्ये पहिला एशिया कप शारजामध्ये आयोजित करण्यात आला.

या स्पर्धेसाठी ना एशियन क्रिकेट कौन्सिलकडे पैसा होता आणि ना बीसीसीआय किंवा पीसीबीकडे. काही महिन्यांआधीच भारतानं १९८३ चा वर्ल्डकप जिंकला होता. या वर्ल्डकप विनर प्लेअर्सला मॅच फी, डेली अलाउन्स असे सगळे मिळून २१०० रुपये मिळायचे. बीसीसीआयला या खेळाडूंना बक्षीस द्यायला लता मंगेशकर यांचा कार्यक्रम घ्यावा लागला होता. यावरुनच आपल्याला अंदाज येतो की, त्याकाळी क्रिकेटमध्ये पैसे किती कमी असतील.

अशावेळी एशिया कपमध्ये विजेत्या संघाला १० हजार यूएस डॉलर्स, प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचला ५ हजार यूएस डॉलर्स मिळणार होते आणि हा सगळा पैसा लावला होता, शारजा स्टेडियम उभं करणाऱ्या अब्दुल रेहमान बुखातिर यांनी.

वढ्या मोठ्या प्राईज मनीमुळं आणि युएईमध्ये मोठ्या संख्येनं असलेल्या भारतीय, पाकिस्तानी लोकांमुळे एशिया कपला खतरनाक गर्दी झाली होती.

पहिला एशिया कप तीन देशांमध्ये खेळवला गेला, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका. जी टीम दोन पैकी जास्त मॅचेस जिंकेल, तिला एशिया कपचा विजेता म्हणून घोषित करण्यात येईल असं ठरलं होतं. पहिल्याच मॅचला श्रीलंकेनं पाकिस्तानला हरवत धक्का दिला, तर दुसऱ्या मॅचमध्ये भारतानं श्रीलंकेला लोळवलं. साहजिकच भारतानं पाकिस्तानला हरवलं असतं, तर भारताचा विजय पक्का होता.

पण भारताचा खरा विषय सुरू झाला होता, तो टीम निवडीपासूनच.

१९८३ च्या वर्ल्डकपचा हिरो होता, भारताचा कॅप्टन कपिल देव. कपिलनं बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये एक नंबर कामगिरी केली होती. पण एशिया कपच्या आधीच कपिलच्या गुडघ्याच्या दुखापतीनं डोकं वर काढलं त्यामुळं तो संघाबाहेर राहणार हे फिक्स होतं. अशावेळी भारताचं नेतृत्व सोपवण्यात आलं, सुनील गावसकरकडे. गावसकर तेव्हाच्या भारतीय टीमचा सगळ्यात सिनिअर प्लेअर. त्यानं टीम निवडीत एक धक्कादायक निर्णय घेतला.

इन फॉर्म सय्यद किरमाणीच्या जागी विकेटकिपर म्हणून सुरिंदर खन्नाची निवड झाली.

हा सुरिंदर खन्ना दिल्लीचा. 

आपल्या रणजी डेब्यू मॅचपासूनच त्याच्या नावाची चर्चा होऊ लागली होती. पण खरी चर्चा झाली, ती १९७८-७९ च्या रणजी फायनलनंतर. कर्नाटकची बलाढ्य टीम समोर असताना खन्नानं पहिल्या इनिंगमध्ये १११ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १२८ रन्स चोपले होते. त्याच्या या फायनलमधल्या दोन इनिंग्समुळे त्याला टीम इंडियाचं तिकीट मिळालं.

१९७९ मध्ये तो भारताकडून वर्ल्डकप खेळला, पण त्याला संधी मिळालेल्या तिन्ही मॅचेसमध्ये अपयश आलं. त्यानंतर त्याची संघातली जागा गेली, पण तो डोमेस्टिक क्रिकेटमध्ये रन्स करत राहिला, ज्याच्या आधारे त्याला १९८४ च्या एशिया कपमध्ये बोलावणं आलं.

यामागचं कारण होतं, खन्नाची आक्रमक शैली.

सुरुवातीला मिडल ऑर्डरमध्ये खेळणाऱ्या खन्नानं आपल्या बॅटिंगच्या जोरावर ओपनिंग बॅट्समन होण्यापर्यंत मजल मारली होती. तो सेट व्हायला फार वेळ न घेता, हाणामारी करु शकायचा. याच एका गुणाच्या जोरावर गावसकरनं किरमाणीला डावलून खन्नाला टीममध्ये घेतलं.

पण ज्या सय्यद किरमाणीच्या जागी खन्ना टीममध्ये आला, त्याच्यासोबत खन्नाचं एक खास कनेक्शन होतं

आपल्या पहिल्याच रणजी सिझनवेळी, सुरिंदर खन्नाची कॅप्टन बिशनसिंग बेदीनं सय्यद किरमाणीशी भेट घालून दिली होती. किरमाणीला जेव्हा खन्ना विकेटकिपींग करतो हे समजलं, तेव्हा त्यानं आपल्याकडचे किपींग ग्लोव्ह्ज त्याला भेट म्हणून दिले होते. 

खन्ना आपल्या करिअरमध्ये अनेक वर्ष हेच ग्लोव्ह्ज वापरत होता. या भेटीमुळे आणि किरमाणीकडून वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळं खन्ना त्याला लई मानायचा.

आता याच किरमाणीच्या जागी खेळत खन्नाला एशिया कप गाजवायचा होता…

श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारताच्या बॉलर्सनं खतरनाक कामगिरी केली होती. त्यांनी लंकेचा ९६ रन्समध्ये खुर्दा उडवला होता. त्यानंतर खन्ना थेट ओपनिंगलाच उतरला आणि ६९ बॉलमध्ये नॉटआऊट ५१ रन्स चोपत त्यानं भारताला १० विकेट्सनं मॅच मारुन दिली. या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅच ठरला.

पाकिस्तान विरुद्धची मॅच जिंकली की भारताचा एशिया कप विजय फिक्स होता. पण या मॅचमध्ये नेमकं हिरवंगार पिच आलं. त्यामुळं भारताचं टेन्शन वाढलं होतं. पण पाकिस्तानच्या पेस बॉलिंगचा कडकमध्ये सामना करत खन्नानं ७२ बॉलमध्ये ५६ रन्स केले. भारतानं १८८ रन्स केले आणि पाकिस्तानचा १३४ वरच ऑलआऊट काढला. ५४ रन्सनं मॅच जिंकत भारतानं पाहिला एशिया कप जिंकला, या मॅचमध्येही मॅन ऑफ द मॅच सुरिंदर खन्नाच होता.

किरमाणीसारख्या कसलेल्या विकेटकिपरच्या जागी येत त्यानं सर्वाधिक १०७ रन्स तर केलेच, पण सोबतच एक कॅच आणि दोन स्टंपिंगही आपल्या नावावर केले. 

या दोन्ही मॅचेसचा मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या खन्नाला बक्षीस म्हणून त्याकाळातले १० हजार यूएस डॉलर्स मिळाले होते. आता एखाद्या प्लेअरनं एवढे पैसे मिळालेत म्हणल्यावर चैनी केल्या असत्या, गाड्या-बिड्या घुमवल्या असत्या. 

मात्र खन्नानं हे पैसे माझ्या एकट्याचे नाहीत तर टीमचे आहेत असं म्हणत, १० हजार यूएस डॉलर्स सगळ्या टीमला वाटून टाकले.

एशिया कपमध्ये तो बॅटिंगमुळं मैदानातलाही हिरो ठरला आणि वागणुकीमुळं मैदानाबाहेरचाही.

पुढं त्यानं भारतासाठी आणखी काही मॅचेस खेळल्या, मात्र फॉर्म गंडल्यावर त्याला संघातली जागा गमवावी लागली. रिटायरमेंटनंतर तो काही काळ डोमेस्टिक क्रिकेट खेळला, तर आता कोच म्हणून नव्या दमाच्या प्लेअर्सला घडवतोय.

पण आजही खन्ना लक्षात आहे, तो पहिल्या एशिया कपमध्ये त्यानं केलेली कामगिरी आणि मैदानाबाहेर दाखवलेल्या टीम स्पिरीटमुळेच!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.