आपल्याच पक्षाच्या विरुद्ध दुसऱ्यांदा बंड केल पण यावेळी कौतुकाची थाप पडली..

सुशीलकुमार शिंदे. काँग्रेसच्या आणि गांधी घराण्याच्या निष्ठावंतांमध्ये येणारं प्रमुख नाव. एकेकाळी सीआयडी इन्स्पेक्टर म्हणून काम केलेले सुशीलकुमार शिंदे हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी प्रेरित होऊन  काँग्रेस मध्ये आले. मधला पवारांच्या सोबतचा पुलोदचा प्रयोग वगळता त्यांनी आपली हयात काँग्रेसमध्ये काढली.

पण एकदा त्यांनी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध बंड पुकारलं होतं आणि राजीव गांधींनी त्यांचं या बद्दल कौतुक देखील केलं होतं.

ते मुख्यमंत्री म्हणजे बाबासाहेब भोसले.

काहीजण असं म्हणतात की इंदिरा गांधींना सातारच्या छत्रपती घराण्यातील नेत्याला मुख्यमंत्री करायचं होतं पण चुकून त्यांनी बाबासाहेब यांना मुख्यमंत्री केलं. आता यात खरं खोट माहित नाही पण योगायोग म्हणा किंवा नशीब, कोणताही जनाधार नसताना बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले.

एक दिलखुलास खुशमिजास व्यक्तिमत्व म्हणून बाबासाहेब ओळखले जायचे. त्यांना विनोदी वक्तृत्वशैलीची देणगी लाभली होती. कित्येकदा ते आपल्या विनोदाने प्रतिस्पर्ध्यांना घायाळ करायचे. पण राजकीय अनुभव कमी असल्यामुळे त्यांच्या हातून चुकाही व्हायच्या, विनोदाच्या नादात चुकीचं बोलूनही जायचे.

बाबासाहेब भोसलेंच्या याच स्वभावामुळे विरोधी पक्षांपेक्षाही स्वतःच्या पक्षातच त्यांनी अनेक शत्रू निर्माण करून ठेवले होते. त्याकाळात वसंतदादा पाटील हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राजकीय वजन असलेले नेते होते. त्यांच्या पाठीशी जनाधार देखील होता, संघटन शक्ती होती, ते अफाट लोकप्रिय होते आणि सहाजिकच मुख्यमंत्री होणे हि त्यांची महत्वाकांक्षा होती. वसंतदादांच्या प्रयत्नातूनच अंतुलेंच मुख्यमंत्रीपद गेलेलं.

त्यामानाने बाबासाहेब इतके राजकारणात मुरलेले नव्हते. सुरवातीला बॅरिस्टर अंतुले यांचा त्यांना पाठिंबा होता. पण बाबासाहेब भोसले पुढे त्यांचंही ऐकेनासे झाले. यामुळे अंतुले देखील त्यांना हटवण्याच्या मोहिमेत सामील झाले. 

पण राजकीय अपरिहार्यता म्हणून इंदिरा गांधी आपल्या पाठीशी राहतील याची बाबासाहेब भोसलेंना खात्री होती.

काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री बाबासाहेब पाटील यांना हटवण्यासाठी सहीमोहीम सुरु झाली. काँग्रेसच्या २३६ आमदारांपैकी १११ आमदारांनी त्यांच्या विरुद्ध सही केली. मात्र इतकं असूनही बाबासाहेब भोसले अविचलित होते. जरी सगळेच्या सगळे आमदार विरुद्ध गेले आणि फक्त इंदिरा गांधी माझ्या पाठीशी उभ्या रहायला तरीही आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला धोका नाही असं ते थेट म्हणायचे.

त्यांच्या विरुद्ध उठलेलं बंड इंदिरा गांधींनी दिल्लीवरून कानपिचक्या दिल्यावर शांत झाले. तेव्हा बाबासाहेब भोसले आपल्या नेहमीच्या अफाट शैलीत म्हणाले,

“बंडोबा थंडोबा झाले.”

पुन्हा त्यांच्या या वाक्यावरून वादंग निर्माण झाले. कधी नव्हे ते अंतुले समर्थक आणि वसंतदादा पाटील समर्थक नेते एकत्र आले. आपले वाद नंतर आधी  काहीही करून बाबासाहेब भोसलेंना पदावरून काढले पाहिजे यावर सगळ्यांचं एक मत झालं. वसंतदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने सांगलीला जमलेल्या सगळ्या नेत्यांनी मोर्चेबांधणी केली.

नागपूर अधिवेशनात तर वेगळाच गोंधळ बघायला मिळाला. स्वपक्षीय विरोधकांवर बेफाम चिडलेल्या बाबासाहेब भोसले यांनी विधानसभेत बोलताना आपले फेमस उद्गार काढले,

“आमच्या आमदारांची भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची आणि कृती षंढाची आहे.”

मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच आमदारांचं केलेलं हे “व्यक्तीपरीक्षण” सर्वसामान्यांसाठी कमालीचं मजेदार आणि काँग्रेस आमदारांसाठी संतापजनक ठरलं. ‘षंढ’ असल्याचा बाबासाहेबांनी लावलेला शोध काँग्रेस आमदारांसाठी जास्त दुखावणारा ठरला.

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी काँग्रेस पक्षाने आपल्याच मुख्यमंत्र्याविरुद्ध हक्कभंगाचा ठराव आणला. खुद्द सुशिलकुमार शिंदे हे यात आघाडीवर होते. 

त्या दिवशी संध्याकाळी विधिमंडळातच काँग्रेस आमदारांची बैठक बोलवण्यात आली. तिथे बरीच खडाजंगी झाली. मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना तोंडावर अपशब्द वापरले गेले. मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ होत आहे, धक्काबुक्की होत आहे हे दृश्य पहिल्यांदाच पाहायला मिळत होतं.

आमदारांच्या धक्काबुकीतून सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले व मुख्यमंत्री निवासस्थानी सुरक्षितपणे पोहचवले. मुखमंत्र्यांवर केलेल्या हल्ल्याची शिक्षा म्हणून भाऊराव पाटील, सूर्यकांता पाटील, सतीश चतुर्वेदी,अशोक पाटील, प्रेमानंद आवळे, राम पेंडागळे या सहा आमदारांना बडतर्फ करण्यात आलं.

दिल्लीपर्यंत याचे पडसाद उमटणे साहजिक होते. पक्षात असा आक्रमकपणा यापूर्वी कधी पाहिला नव्हता. विधानसभेत आपल्याच मुख्यमंत्र्यांविरुद्ध हक्कभंगाची नोटीस वाचून दखवणाऱ्या सुशील कुमार शिंदेंना दिल्लीला बोलावून घेण्यात आले. 

त्यावेळी राजीव गांधी हे नुकतेच राजकारणात आले होते. त्यांना पक्षाचा सरचिटणीस बनवण्यात आलं होतं. शिंदे यांची भेट त्यांच्याशी झाली. 

सुशील कुमार म्हणतात,

राजीव गांधी आधी जरा रागवले पण नंतर पाठीवर थोपटत ठीक है देखता हूं असं म्हणाले.

आक्रमकपणा दाखवल्या बद्दल राजीव गांधींनी त्यांचं कौतुकच केलं. सुशीलकुमार शिंदे यांचं हे बंड शांत झालं मात्र मुख्यमंत्र्यांचं आपल्याच पक्षातील नेत्यांवर वर्चस्व नाही हा संदेश काँग्रेस हायकमांड पर्यंत पोहचला. पुढच्या काही दिवसातच बाबासाहेब भोसले यांची गच्छंती करण्यात आली. 

लोकनेते वसंतदादा पाटील यांच्याकडे महाराष्ट्राची सूत्रे सोपवण्यात आली. एकेकाळी वसंतदादा पाटलांचं सरकार सुशील कुमार शिंदे नी पाठीत खंजीर खुपसून पाडलं होतं पण याच सुशील कुमार शिंदेंमुळे वसंतदादा पुन्हा मुख्यमंत्री बनले. दादांनी मोठ्या मनाने माफ करत सुशील कुमार यांना अर्थ मंत्री बनवलं.

 हे ही वाच भिडू.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.