अशा प्रकारे पुण्याचा शंतनू रतन टाटांचा जिगरी दोस्त झाला. 

फोटो बघितल्यानंतर तुमच्या डोक्याच्या फ्युजा टाईट झाल्या असतील. रतन टाटांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढणारा हा बालक नेमका कोण आहे असा प्रश्न पडला असेल. अस काय केलय या पोराने म्हणून विचारचक्रात असाल. इतकच काय तर इतक्या कमी वयात इतकी मोठ्ठी झेप कशी घेतली असाही प्रश्न असेल. लाखों, हजारों प्रश्न तर आपल्याला रोजच पडतात पण अस काय दिसलं की एकीकडे भारी पण वाटतं आणि एकीकडे जीव पण तुटतो. आपण १० ते ५ जीवतोडून काम करतोय पण आपला मालक आपल्याला केबीनमध्ये पण बोलवत नाही,

अन् या कार्यकर्त्याला थेट खांद्यावर हात ठेवून देतो. तो पण रतन टाटांसारखा मालक. 

काही गोष्टी अशाच असतात भिडू. मालक पण रतन टाटांसारखा असला आणि कार्यकर्ता शंतनू सारखा असला तर जिगरी दोस्ती व्हायला वेळ लागत नाही. 

तर आत्ता मुळ मुद्याला हात घालतो. शंतनू हा पुण्याचा.

त्याच्या चार पिढ्या टाटामध्ये काम करणाऱ्या पण या चार पिढ्या कनिष्ठ कामगार. त्याचे वडिल,आजोबा आणि इतर नातेवाईकांना साधं रतन टाटांना पाहण्याच भाग्य देखील मिळालं नाही.  शंतनू देखील टाटा कंपनीत काम करायचा. रोज पुण्यातलं ट्रॅफिक चुकवत ऑफिसला जायचा आणि दमून भागून घरी यायचा. २०१४ साली तो टाटा कंपनीत ऑटोमोबाईल डिझायन इंजिनियर म्हणून जॉबला लागला होता. या दरम्यान तो विमाननगरच्या हायवेवरून घरी यायचा. अनेकदा ऑफिसवरून घरी यायला रात्रीचे १२ वाजायचे. 

आत्ता या रात्री हायवेवर त्याला काय दिसायचं तर मरून पडलेली कुत्री. रोज कुठल्यातरी गाडीने कुठल्यातरी कुत्र्याला उडवलेलं असायचंच. बरं हे इतक्यावर थांबण्यासारखं नव्हतं तर अनेकदा कुत्र्यांना चुकवण्याच्या नादात अॅक्सिंडेट देखील झालेले असायचे. आत्ता यावर काहीतरी जालीम उपाय शोधायचा निर्धार शंतनूने केला. 

त्याने काय केलं तर ज्या लोकांच्या गाडीखाली कुत्री आले होते, ज्यांचा अॅक्सिडेंट कुत्र्यांमुळे झाला होता अशा लोकांना त्यांने भेटायला सुरवात केली. त्यांच्या मुलाखती ड्राफ्ट करुन ठेवू लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की माणसं काय हौस म्हणून कुत्र्यांचा अंगावर गाडी घालत नाही. प्रत्येकाच एकच म्हणणं होतं की अचानक गाडीच्या आडवं कुत्र आलं. समोर कुत्र होतं ते दिसलच नाही. 

आत्ता यावर काय करता येईल म्हणून शंतनू विचार करु लागला तेव्हा खास कुत्र्यांसाठी रेडियमची कॉलर बनवता येईल हे उत्तर मिळालं. 

त्याने आपल्या मित्रांना एकत्र केलं व मोटोपॉज नावाने असे कॉलर तयार करुन भटक्या कुत्र्यांना लावण्यास सुरवात केली. त्याने त्याच्या या कामाबद्दल रतन टाटांना पत्र लिहून कळवावं अस त्याच्या वडिलांना वाटलं. पोराने पण लगेच पत्र लिहलं. आपण करत असणारं काम आणि या कॉलरची आयड्या त्याने पत्र लिहून रतन टाटांना कळवली. त्यावेळी या कार्यकर्त्याच वय होतं २३ वर्ष.  

आत्ता रतन टाटांचा उत्तर येणं अपेक्षित होतं. पण तस झालं नाही. हा पण न थांबता कामाला लागला होता. आपल्या जॉबमधून वेळ काढून कार्यकर्ता कॉलरचं काम पुढे घेवून जात होता. अशातच एक दिवस रतन टाटांचा फोन आला. टाटांनी त्याला मुंबईला भेटायला बोलवलं. 

टाटांच्या पहिल्या भेटीत काय झालं. 

टाटांनी त्याला विचारलं तूझी आयडीया खूपच चांगली आहे. तुमच्या स्टार्टअप मध्ये मी काही मदत करु शकतो का. तेव्हा हा म्हणाला आम्ही विद्यार्थीच आहोत. एका NGO प्रमाणे सर्व गोष्टी करतोय. तेव्हा टाटांनी त्यांच्या स्टार्टअपसाठी काही ठरावीक रक्कम दिली. 

रतन टाटांनी मोटोपॉजसाठी पैशे लावल्यानंतर ही कंपनी भारताबरोबर वेगवेगळ्या ११ देशांमध्ये काम करू लागली. मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांसोबत, गायी आणि वासरांना रेडियमच्या कॉलर लावण्याच काम हाती घेण्यात आलं. 

आत्ता हे संबध इतक्यावरच थांबले नाहीत. शंतनू आणि रतन टाटा यांच्यातला संवाद थांबला नाही. रतन टाटा शंतनूला फोन करत आणि त्याच्याकडून माहिती घेत असत. फोनवर वारंवार बोलणं होतं गेलं आणि शंतनूने एक दिवस आपण कार्नेलमधून MBA करणार असल्याचं टाटांना सांगितलं. 

शंतनू कार्नेलमध्ये MBA करण्यासाठी गेला. तिथून MBA झाल्यानंतर टाटा ट्रस्टमध्ये काम करण्याचा त्याचा प्लॅन होता. त्यासाठी स्टार्टअप व त्यातील गुंतवणूक, सामाजिक काम याबद्दल तो माहिती घेत गेला. 

२०१८ साली शंतनू MBA करुन परतला. तेव्हा त्याला टाटा पेट प्रोजेक्ट नावाने जनावरांसंबधीत काम करणार असल्याची माहिती मिळाली. त्याने ठरवलेलं की टाटा पेट प्रोजेक्टमध्ये इंटर्नशीप करायची. 

पण झालं वेगळच… 

तो परतल्यानंतर त्याला रतन टाटांच्या ऑफिसमधून फोन आला आणि त्याला थेट रतन टाटांच ऑफिस जॉईन करण्यास सांगण्यात आलं. रतन टाटांना स्टार्टअपमध्ये मदत करण्यासाठी एक्झिक्युटिव्ह असिस्टंट म्हणून व्यक्ती हवी होती. या क्षेत्रातला दिर्घकालीन अनुभव असणाऱ्या व्यक्तिला रतन टाटांनी इथे प्राधान्य द्यायला हवं होतं पण सारासार विचार करुन रतन टाटांनी या पदावर २८ वर्षांच्या शंतनूला संधी दिली. त्यानंतर शंतनूने देखील मागे वळून पाहिलं नाही. रतन टाटांबरोबर स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तो मदत करतो आणि टाटा आपले दोस्त असल्याचं अभिमानाने सांगतो. 

हे ही वाच भिडू. 

 

1 Comment
  1. Mahadev shahaji Kapase says

    ७४९८४३४४९८

Leave A Reply

Your email address will not be published.