ठाकरेंच्या झुणका भाकर केंद्र , शिवभोजन थाळीची सुरवात ११० वर्षांपूर्वीच्या या घटनेत आहे ..

गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकातली. ठाकरेंचे पूर्वज शिवरायांच्या धोडप किल्ल्याचे किल्लेदार, म्हणून त्यांना धोडपकर म्हटल जायचं. मुळचे भोर संस्थानच्या पाली गावचे. प्रबोधनकार ठाकरेंचे आजोबा आपली सगळी इस्टेट आपल्या भावांना दान देऊन पनवेलला आले होते.

केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार पनवेललाच जन्मले. त्यांच्यावेळी ठाकरे कुटुंबियांची परिस्थिती बेताची होती.

पण प्रबोधनकारांच्या आईच्या माहेरची परिस्थिती मात्र उत्तम होती.

त्यांचे वडील वामनराव जिवाजी पत्की हे पनवेलचे सुप्रसिद्ध वकील होते. फौजदारी खटल्यांसाठी अख्ख्या कुलाबा जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव दुमदुमत असायचं. त्यांच्याकडे पनवेल गावच पुढारीपण सुद्धा होतं. प्रबोधनकार ठाकरे आपल्या आठवणीमध्ये सांगतात की आजोबांच्या उजव्या हातातील तीन बोटांमध्ये सोन्याची जोडवी असायाची. त्यांनीच गावात खांदेश्वराच मन्दिर उभारलं होतं.

साधारण १८९२ साली मुंबईमध्ये प्लेगच्या साथीचे आगमन झाले होते. कित्येकजणांना यात प्राण गमवावा लागला. पाठोपाठ हिंदूमुस्लीम दंगलीचाही शहराला मोठा फटका बसला. त्याच्या पुढच्या वर्षी दुष्काळाचा फेरा आला. पेपरमध्ये बातम्या छापून यायच्या की काठेवाडमध्ये लोक खायला प्यायला काही नसल्यामुळे आपल्या पोराबाळांना विकत आहेत अशी भीषण परिस्थती आली आहे.

काही अडाणी लोक दुष्काळाचे खापर टिळकांवर टाकायचे, त्यांनी देवघरातल्या गणपतीला सार्वजनिक केलं म्हणून देवाचा कोप झाला आणि एवढी संकटे आली.

त्यामानाने पनवेल शांत होते. मुंबईच्या अलीकडे असलेल्या या गावात कोणतीही धावपळ, गर्दी नसायची. लोक आपापल्या परसातच भाजीपाला पिकवायचे. गावात अगदी दुधदुभत्याची सुबत्ता होती. त्यांना दुष्काळाची झळ लागणे शक्य नव्हते. फक्त वर्तमानपत्रातील बातम्या वाचून हळहळ व्यक्त करणे एवढीच पनवेलकरांची मजल होती.

पण एकदिवस पनवेललाही या काठेवाडी दुष्काळाचा फटका बसला.

चातुर्मासाचे दिवस होते. प्रत्येक घरातील अंगणात भाजीपाला फुलून डवरत होता.पण एका पहाटे जाग आल्यावर गावकर्यांना दिसले की आपल्या अंगणातली पालेभाजी, फळभाजी सगळे खल्लास झाले आहे. भाज्यांच्या मंडपाच्या जागी फक्त काठ्या दिसत आहेत. 

कोणालाच काही कळेना. डोळे चोळून पाहतात तोवर गावात हुकडे तिकडे काठेवाडी दुष्काळी पुरुष,स्त्रिया आणि मुलांच्या झुन्डीची लेंढरे अन्नासाठी गयावया करत फिरत होती. सारा गावच्या गाव या लोकांनी एका रात्रीत फडशा पाडून ठेवला होता.

या काठेवाडवाल्या बायका पनवेलमध्येही चार चार आन्याला आपल्या पोरांना विकायला काढत होत्या. काही काही जनी स्वतःला विकत घ्या म्हणत होत्या. पण तिथे कोणी दाद लागू दिली नाही.

अखेर पोलीस आले. इंग्रज सरकारने काठेवाडी हेड्याला (टोळीला) गावाबाहेर हुसकावून लावण्याचे आदेश दिले होते. अखेर पनवेलमधील काही प्रतिष्ठीत व्यक्तींनी एकत्र येऊन सरकारच्या या निर्णयाला विरोध केला. उलट गावाबाहेर त्यांना एक दुष्काळी छावणी उभा करून दिली.

प्रबोधनकार ठाकरेंच्या आजोबांनी म्हणजेच वामनराव पत्कींनी सर्वप्रथम त्या छावणीमध्ये झुणका भाकरचा भटारखाना उघडला. 

जवळपास पंधरा दिवस त्या काठेवाडच्या लोकांच पालनपोषण पनवेलच्या गावकऱ्यांनी केलं. वामनरावांच झुणका भाकरीची चूल पंधरा दिवस धगधगत होती. दूर गुजरातहून आलेल्या या गरीब कुटुंबाला दुष्काळात जगवण्याच काम त्यांनी केलं.

अखंड आयुष्यभर वामनरावांची वकिलीतून कमावलेली बहुतेक कमाई दानधर्मात आणि कलावतांच्या उत्तेजनार्थ खर्ची पडली. दरसाल त्यांच्या घरासमोरील पटांगणात संपूर्ण जिल्ह्यातून शेकडो भिकारी जमायचे. मोठा पोलीस बंदोबस्त असायचा. झुणकाभाकर आणि धोतर लुगडी यांचं दान व्हायच.

पहिल्या पाच दानानंतर उरलेले दान पत्कींच्या मुलाच्या आणि जावयाच्या म्हणजेच प्रबोधनकार ठाकरेंच्या वडिलांच्या हस्ते व्हायचं.

पत्की आणि ठाकरे कुटुंबाचं हे झुणकाभाकर दान तेव्हा अख्ख्या मुंबईत फेमस झालं. त्यांचं बघून अनेकांनी झुणका भाकर गरिबांना देण्यास सुरवात केली.

प्रबोधनकार ठाकरे लिहितात,

“या गोष्टीचा माझ्या चरित्र व चारित्र्यावर फार मोठा परिणाम झालेला आहे.”

आपल्या आजोबांच्या पावलावर पाउल ठेवून प्रबोधनकार समाजकारणात आले. पुढे त्यांचा वारसा बाळासाहेबांनी चालवला. आपल्या पणजोबांच्या आठवणीतूनच प्रेरणा घेत त्यांनी युती शासनाच्यावेळी राज्यभर झुणका भाकर केंद्रे उघडली.

आणि सध्याच्या उद्धव ठाकरे सरकारची शिवभोजनथाळी योजना देखील याच पंरपरेचा भाग आहे.

ही आठवण स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या जुन्या आठवणी या पुस्तकात सांगितली आहे. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.