भावाचा हवाई अपघातात मृत्यू झाला पण टाटांनी विमानाचं खूळ काही सोडलं नाही

 जे. आर. डी. हे पहिले भारतीय पायलट आहेत. १० फेब्रुवारी १९२९ रोजी त्यांना हे प्रमाणपत्र मिळाले. त्यावर १ क्रमांक आहे. खासगी लायसेन्स मिळविणारे ते पहिले भारतीय व्यक्ती आहेत. तेव्हापासून १९७८ अखेर एअर इंडियामधून ते निवृत्त होईपर्यंत त्यांचा विमान वाहतुकीच्या उद्योगाशी अगदी जवळून संबंध आला. त्यामुळेच त्यांना भारतातील विमान व्यवसायाचे जनक म्हणतात जात. 

१९३० साली इंग्लंड आणि भारत या दरम्यान आगाखाननी ५०० पौंड बक्षिसाची विमान स्पर्धा लावली होती. त्यात जे. आर. डीं.नी भाग घेतला होता. अॅस्पी इंजिनिअर हे दुसरे स्पर्धक होते. ते लंडनहून निघाले होते नि जे. आर. डी. मुंबईहून दोघांची इजिप्तमधील अलेक्झांड्रा येथे गाठ पडली. इंजिनिअर यांच्या विमानाचे स्पार्क प्लग नादुरुस्त झाल्यामुळे ते अडकून पडले होते. त्यांना जे. आर. डीं.नी आपल्या जवळचे स्पार्क प्लग दिले. या स्पर्धेचे बक्षीस इंजिनिअर यांना मिळाले. कारण ते टाटांपेक्षा अडीच तास लवकर पोचले. 

जे. आर डीं. ना ह्या स्पर्धेत हरल्याबद्दल दुःख झाले नाही. पण अॅस्पी इंजिनिअरना या स्पर्धेत यश मिळाल्याने त्यांना भारतीय हवाई दलात प्रवेश मिळाला, त्याचा त्यांना आनंद झाला. पुढे हे हवाई दलाचे प्रमुख झाले.

जे. आर. डी. ना साहसाचाही वारसा मिळाला आहे. कदाचित त्यांच्या शरीरात फ्रेंच रक्तही खेळत असल्यामुळे त्याला एक वेगळाच उजाळा चढला असावा, आपण वैमानिक व्हावे, ही त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाची हाव. त्यांचे बंधू जमशेट, जिमी, त्यांची बहीण सायला (लेडी पेटिट), दुसरी बहीण रोडाबे (मिसेस सावने) आणि ते स्वतः या सर्वांनी पायलटचे लायसेन्स काढून शिक्षण घेतले आहे.

जिमीची धडाडी ही एक शोककथा आहे. एअर इंडियामध्ये पायलटची जागा त्यांना देऊ केली होती. आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी ते ऑस्ट्रियाला एकट्याने उड्डाण करून गेले पण काय गडबड झाली ते कळलं नाही आणि अपघातात ते ठार झाले. प्रत्यक्ष सख्ख्या भावाचा अपघातात मृत्यू झालेला पाहून, नको तो धोका, म्हणून कोणीही त्यापासून लांब गेलं असत.

परंतु जे. आर. डी. कच्च्या दिलाचे नाहीत. त्यांची विमानाबद्दलची आवड काही कमी झाली नाही. त्यांनी यासाठी अनेक धोकेही पत्करले. आपल्या सुरुवातीच्या काळाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं,

 “लायसेन्स मिळून तीन महिने झाले तोच लंडनला जाऊन मी जिप्सी माँथ हे छोटंसं विमान १३००० रुपयांना घेतलं. त्या वेळी वायुयानाच्या माझ्या अवघ्या २० फेऱ्या झाल्या होत्या; पण स्वतः पायलंटिंगचा पूर्ण अनुभव आहे, असा माझा समज होता. बसलो लगेच विमानात आणि उडालो पॅरिसकडे. लिंबुर्जे विमानतळावर मला उतरायचं होतं. तिकडे इंपिरियल एअरवेजचं बडं विमान होतं, उतरताना माझी धांदल झाली आणि माझ्या छोट्या जिप्सी मॉथनं इंपिरियलच्या हत्तीला धडक मारली. गंमत अशी की जिप्सी मॉथला काहीच झालं नाही, परंतु इंपिरियल पांगळं झालं आणि त्याबद्दल नुकसान भरपाई म्हणून २५ पौंड दंड मला भरावा लागला !”

पण जे. आर. डी. टाटांची विमानाची आवड भारतासाठी मात्र लकी ठरली. म्हणजे झालं काय, भारतात विमान वाहतूक सुरू व्हावी, अशी जे. आर. डी. ची प्रबळ इच्छा होती. टाटा उद्योग समूहाचे त्या वेळचे प्रमुख दोराब टाटा विमान वाहतुकीत टाटांनी पडावे याला काही फारसे अनुकूल नव्हते. जे. आर. डी.नी आपले गुरू व टिस्कोचे एक प्रमुख डायरेक्टर जॉन पीटरसन यांच्याकडून दोराब टाटांचे मन वळविले नि त्यांच्याकडून टाटा एअरलाइन्स ही विमानाने टपालवाहतूक करणारी कंपनी काढण्यास परवानगी मिळविली. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.