पहिल्यांदाच एका स्वदेशी खाजगी कंपनीला डिफेन्सचं विमान बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालय.

नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौरा केला. या दरम्यान भारत आणि अमेरिका मिळून  संरक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी करणार असल्याचे समजते. खरं तर, या दोन्ही देशांचा अजेंडा एकचं आहे. मग तो दहशतवाद्यांशी लढणं असो किंवा तालिबानी. त्यात उद्देश जरी वेगळे असले चीन हा दोघांचा शत्रू आहे. अश्या परिस्थितीत भारतानं अमेरिकेकडून लढाऊ ड्रोन मागवले आहेत, ज्यामुळे अमेरिकेनं अनेक बड्या मोहिमा फत्ते केल्यात.

पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण देशात ‘आत्मनिर्भर’ भारत मोहिमेअंतर्गत आधीपासूनचं लढाऊ विमाने  बनवण्याची प्रक्रिया सुरु आहे. आणि महत्वाचं म्हणजे टाटा कंपनी यात उतरणार आहे. 

टाटा ग्रुप आणि स्पेनच्या एअरबस डिफेन्स अँड स्पेस यांच्या संयुक्त उपक्रमात हवाई दलासाठी सी -295 मालवाहू विमान बनवण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच संरक्षण मंत्रालयाने या कराराची घोषणा केली. आता तस पाहिलं तर संरक्षण क्षेत्राशी संबंधित सगळी फायटर जेट, हत्यारं, फायटर बोट, विमानं हे सरकार संस्थांच्या अखत्यारीतचं केली जातात. त्यातली बहुतेक संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) तयार करते.

मात्र, आता ही पहिलीचं वेळ आहे. जेव्हा एखादी खासगी कंपनी लष्करासाठी विमान बनवतेय. ही विमाने हवाई दलासाठी सुमारे २० ते २२ हजार कोटी खर्च करून खरेदी केली जाणार असल्याचे समजतंय. ही विमाने हवाई दलाच्या अॅव्रो -७४८ ची जागा घेतील.

हा प्रकल्प ‘मेक इन इंडिया’चा भाग आहे.

खरं तर, ८ सप्टेंबरलाचं पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने या विमानांच्या खरेदीला मान्यता दिली.  या सी-२९५ विमानांचा आकडा जवळपास ५६ असल्याचे म्हंटले जातेय. ज्यातली १६  नवीन विमाने स्पेनमधून आणली जातील. विमान खरेदीसाठी करारावर स्वाक्षरी झाल्यापासून पुढील ४८ महिन्यांच्या आत १६ विमान स्पेनहून ‘रेडी-टू-फ्लाय’ स्थितीत येतील.

तर बाकीची ४० विमान देशातच तयार केली जातील. ही देशात तयार होणारी ४० विमानं टाटा समूहाच्या टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सद्वारे तयार केले जातील. यामध्ये टाटाला स्पॅनिश कंपनी ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस’ ची मदत मिळणार आहे. येत्या १० वर्षात यासाठी काम केले जाणार आहे. 

आता या प्रोजेक्टमुळे संरक्षण क्षेत्राची तर ताकद वाढणारचं आहे. सोबतच रोजगारही निर्माण होणार आहे. या करारामुळे जवळपास १५,००० उच्च स्तरीय नोकऱ्या निर्माण होणार असल्याचा दावा केलायं. तर १० हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.

टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी या कराराबद्दल एअरबस डिफेन्स, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड आणि संरक्षण मंत्रालयाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी देशातील विमान उद्योग आणि विमानचालन प्रकल्पांसाठी हे एक उत्तम पाऊल असल्याचे म्हटले आहे.

या विमानांची खासियत म्हणजे ही विमाने लहान रनवे वरून सुद्धा उड्डाण करू शकतात आणि लहान रनवे वर उतरू देखील शकतात. सोबतच कमानीच्या म्हणण्यानुसार,  हे विमान फक्त ३२० मीटर अंतरावर सुद्धा उड्डाण करू शकते. त्याच वेळी, लँडिंगसाठी ६७० मीटर लांबी पुरेशी आहे. डोंगराळ भागात मोहिमेदरम्यान विमानाचे ही खासियत खूप महत्वाची आहे.

तसेच, विमान ७,०५० किलो पेलोड वाहू शकते. यात एका वेळी ७१ सैनिक किंवा पाच मालवाहू पॅलेट असू शकतात. यासोबत ते ११ तास उड्डाण करू शकते. क्रू केबिनमध्ये ‘टचस्क्रीन कंट्रोल’ सह ‘स्मार्ट कंट्रोल सिस्टम’ ने सुसज्ज आहे. विमानाला रॅम्प दरवाजा आहे, जो लोडिंग-ड्रॉपिंगसाठी अधिक सोयीस्कर आहे.

हे भारतीय हवाई दलातील अॅव्रो विमानांची जागा घेतील. IAF कडे ५६ Avro ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आहेत, जी १९६० मध्ये खरेदी केली होती. हे त्वरित बदलणे आवश्यक आहे. त्यांची बदली करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती.  यासाठी, मे २०१३ मध्ये कंपन्यांना रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) पाठवण्यात आली. मे २०१५ मध्ये संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) टाटा समूह आणि एअरबसच्या सी -२९५ विमानांच्या निविदा मंजूर केल्या.

संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की,

भारतात मोठ्या प्रमाणात या विमानांचे भाग आणि इतर उपकरणे तयार केली जातील. एकदा या विमानांचा पुरवठा झाल्यावर भारतात सी -२९५  विमानांसाठी दुरुस्ती आणि देखभाल सुविधा उभारण्याची योजना आहे. ही सुविधा सी -२९५ विमानांच्या विविध प्रकारांसाठी प्रादेशिक केंद्र म्हणून काम करेल.

असे मानले जाते की,  हवाई दलात सामील झाल्यानंतर ते समुद्री मार्गांवर देखील तैनात केले जाऊ शकतात, जे या क्षेत्रातील AN-३२ ची जागा घेतील. भारताकडे शंभरहून अधिक एएन -३२ विमाने आहेत. लष्करही त्यांची जागा घेण्याच्या तयारीत आहे. तसेच देशात ४० विमानांची निर्मिती केली जाईल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.