तुघलकाला दिलेला शाप खरा ठरला अन् तेंव्हापासून म्हण फेमस झाली…दिल्ली अभी दूर है!

गोष्ट राजकारणातली असो की प्रोफेशनल कामातली; एखादी गोष्ट शक्य नसली किंवा सहजासहजी पूर्ण होणार नसली की टोमणा मारणाऱ्यांसाठी एक वाक्य ठरलेलं असतं.

दिल्ली अभी दूर हैं…!!

ही म्हण आपण फार सहजासहजी बोलत असलो मात्र ती कोणत्या सहज किस्स्यातून आलेली नाहीये. हे म्हण एका सुफी संताने गियासुद्दीन तुघलकाला दिलेल्या शापाच्या किस्स्यातून आलीय. या शापामुळे ही म्हण तर प्रसिद्ध झालीच परंतु तुघलकाबाद हा त्या काळातला अभेद्य किल्ला काही काळातच निर्जन झाला होता.

शाळेत आपल्याला ज्या वेड्या तुघलकाचा इतिहास शिकवण्यात आला होता. त्याच्याच वडिलांच्या आयुष्यातला हा प्रसंग आहे.

याची सुरुवात होते खिल्जीच्या साम्राज्यापासून. संपूर्ण भारतभर आपल्या क्रूरतेमुळे धुमाकूळ घालणाऱ्या अल्लाउद्दुन खिलजीचा १३१६ सालात मृत्यू झाला. त्याच्या मृत्युनंतर दिल्लीत तुघलक घराण्याची सत्ता स्थापन झाली. या तुघलक साम्राज्याचा पहिला सम्राट होता गियासुद्दीन तुघलक.

गियासुद्दीनने स्थापन केलेलं साम्राज्य भारताच्या मोठ्या भागावर पसरलेलं होतं. मात्र त्याची राजधानी असलेल्या दिल्लीवर मात्र वारंवार हल्ले होत होते. हे हल्ले प्रामुख्याने मंगोलांकडून होत होते. या मंगोलांनी अल्लाउद्दीन खिल्जीला सुद्धा नुसतं भांबावून सोडलं होतं. त्याच्या काळात मंगोल दोन वेळ दिल्लीच्या दरवाज्यावर येऊन गेले होते.

मंगोलांपासून संरक्षण मिळवण्यासाठी खिल्जीने सिरी नावाचा परकोट असलेल्या शहराची निर्मिती केली होती. तेव्हा खिल्जीचा सेनापती असलेल्या गियासुद्दीन तुघलकाने खिल्जीला सिरी केल्यापासून ११ किमी दूरवर असलेल्या टेकडीवर नवीन किल्ला बांधून राजधानी बसवण्याचा सल्ला दिला होता.

तेव्हा खिल्जीने तुघलकाची खिल्ली उडवून त्याचा प्रस्ताव केराच्या टोपलीत टाकला आणि उलट त्यालाच सल्ला दिला. 

“जेव्हा तू सुलतान होशील तेव्हा तूच त्या ठिकाणी नवीन किल्ला बांध आणि तुझी राजधानी वसव”

खिल्जीने विनोदात म्हटलेले हे वाक्य अगदी खरे झाले आणि त्याच्या मृत्यूनंतर तुघलक दिल्लीचा सम्राट झाला.

परंतु तुघलक सेनापती असतांना त्याची नेमणूक पाकिस्तानमधल्या मुलतान प्रांतावर केलेली होती. त्यामुळे मंगोलांशी सगळ्यात जास्त काळ लढाया तुघलकानेच लढल्या होत्या. या लढायांमुळे त्याच्या मनात मंगोलांना रोखून धरण्याचा विचार पक्का झाला होता. त्यामुळेच १३२० मध्ये जेव्हा तुघलक सम्राट झाला तेव्हा त्याने सर्वात प्रथम तुघलकाबाद किल्ला बांधण्याचे आदेश दिले. 

किल्ला बांधतांना तुघलकाने अगदी आपल्या मनाप्रमाणे त्या किल्ल्याची रचना केली होती. मुल्तानमध्ये असतांना त्याने ज्या प्रकारचे विटांचे किल्ले पाहिलेले होते अगदी त्याच किल्ल्यांप्रमाणे परंतु दगडी बांधकाम असलेला किल्ला बांधायला सुरुवात करण्यात आली. 

तुघलकाचा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे त्याला किल्ला लवकरात लवकर बांधून पूर्ण करायचा होता. त्यामुळे सगळी कामं अगदी झटझट केली जात होती. 

परंतु त्याचदरम्यान दिल्लीतील प्रसिद्ध सुफी संत निजामुद्दीन औलिया यांनी आपल्या खानगाहा जवळ एका मोठ्या विहिरीचं बांधकाम करायला सुरुवात केली होती असं सांगितलं जातं.

संत निजामुद्दीन औलिया हे त्या काळातले सगळ्यात प्रसिद्ध संत होते. औलिया आणि तुघलक या दोघांमध्ये काहीच पटत नव्हतं. तुघलक हा नेहमी औलीया यांच्यावर पळत ठेऊन असायचा. त्यामुळे त्याने मजुरांना सक्त ताकीद दिली की औलिया यांच्या विहिरीच्या कामावर कोणीही जायचं नाही.

परंतु निजामुद्दीन औलिया यांचा सन्मान सगळीकडे केला जात होता त्यामुळे किल्ल्याचं काम करणारे मजूर रात्रीच्या वेळेस औलिया यांच्या विहिरीच्या बांधकामावर हजार व्हायचे. ही गोष्ट जेव्हा मोहिमेवर असलेल्या तुघलकला माहित झाली तेव्हा त्याने रात्री कामावर जाणाऱ्या मजुरांवर अत्याचार करण्याचे आदेश दिले. त्याच्या आदेशामुळे मजुरांवर अत्याचार करायला सुरुवात झाली. पण काही काळानंतर ही गोष्ट निजामुद्दीन औलिया यांना कळली. 

तेव्हा औलिया यांनी तुघलकाच्या किल्ल्याला श्राप दिला की “हा किल्ला पूर्णपणे निर्जन होईल किंवा यात निव्वळ मेंढपाळ राहतील.” 

औलिया यांनी किल्ल्याला श्राप दिलाय याची माहिती मोहिमेवर असलेल्या तुघलकाला मिळाली तेव्हा त्याने मोहीम संपल्यावर औलिया यांचा बंदोबस्त करण्याची योजना बनवली. तुअघलकाच्या या योजनेची माहिती औलिया यांच्या अनुयायांना कळली तेव्हा ते घाबरले. त्यांनी औलिया यांना दिल्ली सोडून दुसरीकडे जाण्याचा आग्रह केला. मात्र त्यांनी दिल्ली सोडून जायला नकार दिला.

ते फक्त एवढंच बोलले की, “दिल्ली अभी दूर हैं.”  

औलिया हे दिल्लीतच होते आणि तिकडे तुघलकाची मोहीम सुद्धा पूर्ण झाली होती. तुघलक औलियाचा बदल घेण्यासाठी दिल्लीकडे येत होता. येतांना विश्रामासाठी मार्गात त्याचा तंबू टाकण्यात आला होता. पण तेव्हा त्याचा मुलगा मुहम्मद बिन तुघलकाने आपल्या बापाला मारण्याचा कट आखला होता. त्याच कटातून तुघलकाचा तंबू पाडण्यात आला आणि तंबूच्या खाली गुदमरून तुघलकाचा मृत्यू झाला.

तसेच तुघलकाने बांधलेल्या किल्ल्यातील विहिरी आणि तलावांमध्ये असलेलं पाणी कमी पडायला लागलं त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण व्हायला लागली. त्यामुळे या किल्ल्यात ज्या धनदांडग्या लोकांनी आपल्या हवेल्या बांधल्या होत्या त्यांनी ती घरं सोडली आणि दुसरीकडे स्थायिक झाले. तर त्याच्या मुलाने म्हणजेच मुहम्मद बिन तुघलकाने राजधानी दिल्लीवरून देवगिरीला हलवण्याचे प्रयत्न केले त्यामुळे तुघलकाबाद किल्ला पूर्णपणे ओस झाला.

योगायोगाने निजामुद्दीन औलिया यांची भविष्यवाणी खरी झाली. तेव्हापासून दिल्ली अभी दूर हैं. ही म्हण प्रचलित झाली असे सांगण्यात येते. ही म्हण इतकी प्रसिद्ध झाली की आज सगळे राजकीय विश्लेषक या म्हणीचा वापर आपल्या विश्लेषणात करतात. तसेच सामान्य बोलाचालीत सुद्धा या म्हणीचा वापर केला जातो.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.