खिल्जीने बंडखोरांना शिक्षा देण्यासाठी बनवलेल्या चोर मिनारचा इतिहास तुम्ही वाचला नसाल…
खलीबली हो गया हैं दिल दुनिया से मेरा खलीबली हो गया है दिल…
पद्मावती सिनेमातलं हे गाणं आठवलं का? या गाण्यात अल्लाउद्दीन खिल्जीच्या कॅरेक्टरमध्ये रणवीर सिंग एका पायावर नाचत होता. एकदम क्रूर आणि विकृत अल्लाउद्दीन खिल्जीसारखाच.
अल्लाउद्दीन खिल्जी किती क्रूर आणि विकृत होता हे सगळ्यांना माहित आहे. अल्लाउद्दीन खिल्जी जिथे आक्रमण करायचा तिथे नुसतं स्मशान बनवायचा. परंतु तरीसुद्धा काही लोक असे होते जे त्याच्यासुद्धा विरोधात जायचे.
काही जण अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैनिकांवर आक्रमण करायचे, काही त्याच्या विरोधात बंडखोरी करायचे अन बरेच जण मालदार पार्टी पाहून चोऱ्या माऱ्या करत होते.
या सगळ्या गोष्टींची खिल्जीला मुळात चीड होती. तरीही या गोष्टी थांबत नव्हत्या त्यामुळे खिल्जीचा पारा आणखीनच चढला.
खिल्जी हा मुळातच डेंजर माणूस अन कोणी त्याच्या विरोधात जात असेल तर आणखीनच डेंजर माणूस. त्यामुळे राज्यात कोणी चोऱ्या माऱ्या करत असेल, बंडखोरी करत असेल तर मग त्याला चांगलीच कठोर शिक्षा व्हायची.
त्यापैकीच आणखी एक भयानक शिक्षा देण्यासाठी अल्लाउद्दीन खिल्जीनं चक्क एक मिनार बनवली होती.
त्या मिनारीचं नाव आहे चोर मिनार.
आता अनेकांना प्रश्न पडेल की, कुतुबमिनार ऐकलीय, चारमिनार ऐकलीय, चांद मिनार ऐकलीय ही चोर मिनार काय आहे? अनेकांना माहित नसलेली ही चोर मिनार दिल्लीमध्ये खास चोरांना शिक्षा देण्यासाठी बांधण्यात आली होती.
१३ व्या शतकात अल्लाउद्दीन खिल्जी अफगाणिस्थानमधून भारतात आला. त्यांनतर १२९६ ते १३१६ या २० वर्षाच्या काळात त्यानं दिल्लीवर राज्य केलं. दिल्लीवर राज्य करत असताना दिल्ली आणि आजूबाजूच्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये मोठ्या चोऱ्या व्हायच्या. सैनिक चोरांना पकडायचे आणि शिक्षा करायचे मात्र चोर काही सुधारत नव्हते.
तेव्हा या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी खिल्जीने चक्क एक मिनारच बांधली. त्या मिनारच्या दुसऱ्या मजल्यावर एकूण २२५ छिद्र ठेवण्यात आले.
जो व्यक्ती राज्यात चोरी करतांना घावला त्याला पकडून त्याचं मुंडकं कापलं जायचं. त्यांनतर त्या मुंडक्याला मिनारीवरील छिद्रावर अडकवलं जायचं. अल्लाउद्दीन खिल्जीच्या या शिक्षेमुळे अट्टल चोर सुद्धा चोरी करतांना दहावेळा विचार करायचे.
खिल्जी चोरांपेक्षा सगळ्यात भयानक शिक्षा बंडखोरांना द्यायचा.
खिल्जी ज्या ठिकाणी जायचा भयंकर उपद्रव करायचाच मात्र त्याच्या राज्यातील, त्याच्या मंत्रिमंडळातील किंवा त्याच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीने जर त्याच्या विरोधात बंड केलं. तर त्याचं मुंडकं कापून याच चोर मिनारीवर अडकवलं जायचं.
मुंडकं कापून मिनारीवर अडकवण्याची शिक्षा इतकी भयानक होती की शिक्षेच्या भीतीमुळे अनेक जण खिल्जीचा विरोध करायला किंवा चोरी करायला घाबरायचे.
आता चोर आणि बंडखोर तर वेगळेच त्याच्यावर आक्रमण करणाऱ्या मंगोलांच्या मुंडक्यांचा तर खिल्जीने ढीग बनवला होता.
अल्लाउद्दीन खिल्जीचं साम्राज्य अफगाणिस्थान, पाकिस्तान ते थेट महाराष्ट्रात देवगिरी पर्यंत पसरलं होतं. तर अल्लाउद्दीन खिल्जीची राजधानी दिल्लीला होती. तेव्हा उत्तेरकडील मंगोलियाचे सैनिक खिल्जीच्या अफगाणिस्थान-पाकिस्तानमधील सीमेवर आक्रमण करायचे. खिल्जीला आपल्या उत्तर ते दक्षिण सीमा लढवतांना चांगलीच दमछाक व्हायची.
याचाच फायदा घेत मंगोल खिल्जीच्या सैनिकांवर वारंवार आक्रमण करायचे. सैनिक छावण्या आणि सीमावर्ती भागात चांगलीच नासधूस करायचे. मंगोलांच्या या आक्रमणामुळे खिल्जी चांगलाच वैतागला होता.
अल्लाउद्दीन खिल्जी अनेकदा मंगोल सैनिकांना आवरण्याचा प्रयत्न करायचा परंतु त्याला यश येत नव्हतं. त्यामुळे मंगोल सैनिक चांगलेच चेकाळले होते. त्या चेकाळलेल्या मंगोलांनी थेट दिल्लीवर आक्रमण करायचा बेत आखला आणि आक्रमण करत दिल्लीकडे यायला लागले. दिल्लीकडे येतांना ते सिरी किल्ल्यापर्यंत पोहोचले.
खिल्जीला चांगलीच संधी मिळाली. त्याने सिरी किल्ल्यावर आक्रमण केलं आणि आसपासच्या बेग, तारघी, तर्कार या शहरांवर छापेमारी केली. या छापेमारीत जवळपास ८ हजार मंगोल सैनिक त्याच्या तावडीत घावले. खिल्जीने त्या सगळ्या मंगोलांचे मुंडके कापले आणि आपल्यासोबत दिल्लीला घेऊन आला. त्यांनतर ते सगळे मुंडके त्याने या चोर मिनारीवर अडकवले होते.
परंतु हे सगळे मुंडके मिनारीवर अडकवतांना एक समस्या होती. कारण त्याने ८ हजार मंगोलांचे मुंडके सोबत आणलेले होते आणि मिनारीवर केवळ २२५ छिद्र होते .
छिद्र कमी असल्यामुळे मिनारीवर जितके मुंडके लावण्याची जागा आहे त्या ठिकाणी महत्वपूर्ण मंगोलांचे मुंडके लावले गेले आणि बाकीच्या मुंडक्यांचा मिनारीच्या समोर ढीग करून ठेवण्यात आला होता. चोरांच्या आणि बंडखोरांच्या बाबतीत सुद्धा अशीच पद्धत वापरली जायची. महत्वपूर्ण लोकांचे मुंडके मिनारीवर अडकवले जायचे तर कमी महत्वाच्या लोकांचे मुंडके मिनारीसमोर ढीग करून ठेवले जायचे.
या चोर मिनारीच्या माध्यमातून अल्लाउद्दीन खिल्जीने चोरांना, बंडखोरांना आणि आक्रमण करणाऱ्यांना अतिशय क्रूर शिक्षा दिली होती. आज अनेक जणांना त्याच्या क्रूरतेबद्दल माहित आहे परंतु त्याने शिक्षा देण्यासाठी बांधलेली ही चोर मिनार आज अनेकांना माहित नाही.
हे ही वाच भिडू
- बॅटल ऑफ जालौरच्या प्रसिद्ध लढाईत कान्हडदेव राजाने खिलजीला अक्षरशः पळवून लावलं होतं…
- ८०० वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या जगप्रसिध्द नालंदा विद्यापीठाला डॉ. कलाम यांनी पुन्हा सुरु केले.
- कुतुबमिनार, चारमिनार, इंडिया गेट सगळीकडे तिरंगी रोषणाई आहे, मग ताजमहालला का नाही ?