अभिनेत्रीला सापासमोर नाचायला सांगणारा दिग्दर्शक सापाला बघून शूट सोडून पळाला होता

आर के नारायण यांच्या सुप्रसिद्ध आणि साहित्य अकादमी विजेत्या कादंबरीवर म्हणजेच ‘गाईड’ या साहित्यकृतीवर देव आनंद यांनी चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांना हा विषय प्रचंड आवडल्याने हा सिनेमा दोन भाषांमध्ये करायचे त्यांनी ठरवले. हिंदी आणि इंग्रजीमध्ये.

हिंदी चित्रपटाला दिग्दर्शन विजय आनंद तथा गोल्डी यांचे होते तर इंग्रजी गाईडला दिग्दर्शन यांचे टॅड डॅनिलेव्हस्की होते.

आधी इंग्रजी ‘गाईड’ चे चित्रीकरण सुरू झाले. या चित्रपटात एक सपेरा नृत्य आहे. चित्रपटाच्या कथानकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा हा प्रसंग आहे. कारण याच प्रसंगातून चित्रपटाची नायिका रोझी ही आपलं पूर्वायुष्य बाजूला करून नवीन आयुष्य जगायला तयार होते. आपल्या जीवनातील सर्व दुःख, अपयश, वेदना रोझी हे नृत्य करून त्यात विसरून जाते.

अतिशय देहभान विसरून तिला हे नृत्य करायचे असते. त्यामुळे चित्रपटात या डान्स सीन ला अनन्यसाधारण असे महत्त्व होते. हा सिनेमाचा टर्निंग पॉईंट असतो. इंग्रजी गाईडचे दिग्दर्शक टॅड यांनी वहिदाला हे दृश्य समजावून सांगितले. त्याचे चित्रपटातील महत्त्व देखील समजावून सांगितले आणि हा शॉट घेताना नेमकं काय करायचं आहे हे ही सांगितले.

“ हे नृत्य करताना सापासोबत तुम्ही इतके मग्न होऊन नृत्य करा की तो साप सुद्धा तुमच्याकडे पाहून आसक्त होईल आणि या नृत्याचा शेवट म्हणजे तुम्ही त्या सापाच्या जवळ तुमचे ओठ नेवून ‘किस’ करा!”

हे ऐकून वहिदा म्हणाली “ हा काय आचरट प्रकार आहे ? मी असं कधीच केलं नाही आणि करणारही नाही!” त्यावर दिग्दर्शक म्हणाले ,” का करणार नाही? मी ऐकलंय की इथे भारतात लोक सापासोबत राहतात. त्यांचा दंश आपल्या जिभेवर करून घेतात!” ( तोवर खरोखरच भारताची प्रतिमा विदेशात अशीच होती. India is country of sadhus, snakes and sapera…!)

त्यावर वहिदा रहमान म्हणाली,“असं माझ्या तरी पाहण्यात नाही पण जे कोणी करत असेल ते यातले एक्सपर्ट असतील आणि माफ करा मी काही एक्सपर्ट नाही आणि मी हा असला प्रकार करणार नाही!” दिग्दर्शक मात्र या शॉर्ट घेण्यावर ठाम होते. ते जोर जोरात आपला मुद्दा वहिदाला समजावून सांगत होते. 

”सापाला घाबरण्याच्या काहीच कारण नाही. तुम्ही या शॉट व्यवस्थित देऊ शकता.” वहिदा मात्र ”मी सापासोबत नृत्य करेल पण त्याला ‘किस’ करण्याचा प्रकार मी अजिबात करणार नाही” असे ठामपणे सांगत होती. अशी वादावादी चालू होती.

स्टुडिओमध्ये त्या वेळी जास्त वॅटचे दिवे असल्याने सर्वत्र गरमी, उष्णता वाढली होती.

त्यामुळे शूटिंगसाठी टोपलीतून ठेवलेला एक साप गरमी मुळे बाहेर पडला आणि वळवळ करत ते समोर आला. तो भला मोठा साप पाहताच दिग्दर्शक टॅड डॅनिलेव्हस्की यांची अक्षरशः बोबडी वळाली आणि त्याने धूम ठोकून स्टुडिओच्या बाहेर पळ काढला!

साप टोपलीतून बाहेर आला म्हणून स्टुडिओमध्ये एकच गोंधळ उडाला पण तिथे त्या सापाचा मालक (सपेरा) असल्यामुळे त्याने लगेच सापाला पकडून पुन्हा टोपलीमध्ये कैद केले! थोड्या वेळाने चित्रपटातील दिग्दर्शक टॅड डॅनिलेव्हस्की पुन्हा आत आले.

त्यावेळी वहिदा त्यांना म्हणाली,” काही वेळापूर्वी मला तुम्ही मला सापाला तुला घाबरण्याचे कारण नाही असे सांगत होता पण आता साप दिसताच तुमची घाबरगुंडी का उडाली आणि तुम्ही का पळून गेलात?” तर हसत हसत दिग्दर्शक म्हणाले “अहो मी कुठे इंडियन आहे? मी सापाला घाबरतोच!” त्या दिवशीचे शूटिंग पॅकअप केले आणि दुसऱ्या दिवशी वहिदा ने सापा सोबत नृत्य केले!

या इंग्रजी गाईड साठी पर्ल बक ने डॉयलॉग लिहिले होते. या इंग्रजी व्हर्शन ला अजिबात यश मिळाले नाही. भारतात तर हा सिनेमा फार कमी ठिकाणी प्रदर्शित झाला. अलीकडेच यु ट्यूब वर इंग्रजी गाईड उपलब्ध झाला आहे!

– भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.