जुगाड केला नसता ‘मेरे सपनो की रानी कब आएगी तू’ गाणं पाहायला मिळाला नसतं

सिनेमाच्या पडद्यावर आपण जी दृष्ये बघतो, जी गाणी बघतो त्याच्या मेकींगच्या कथा फार मजेदार असतात.आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीने जो प्रचंड मोठा व्हिज्युयल इफेक्ट देता येतो त्याचा प्रत्यय आपण हॉलीवूडच्या मूव्हीज मधून घेत असतो. 

काही वर्षा पूर्वी प्रदर्शित झालेल्या ’बाहुबली’त याचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला. आता तंत्रज्ञान आपल्या मदतीला आहे पण पूर्वी तंत्रज्ञान इतकं विकसित झालं नव्हतं त्या मुळे काहीतरी जुगाड करावा लागायचा! असे प्रयोग पूर्वीपासून व्हायचे त्याची परीणामकारकता जबरदस्त असूनही फारसे चर्चिले जात नव्हते. याचीच एक सुरीली आठवण.

१९६९ सालच्या शक्ती सामंत यांच्या ’आराधना’ने सिनेमाच्या यशाची गणितं बदलवून टाकली. 

हा किस्सा सांगण्यापूर्वी ‘आराधना’ या चित्रपटाबद्दल आणि त्यातील काही महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल सांगायलाच हवे. या चित्रपटाने अभिनेता राजेश खन्ना आणि गायक किशोर कुमार या दोघांचं भाग्यच बदलून टाकलं. दोघेही या चित्रपटानंतर ‘सुपरस्टार’ बनले. ‘आराधना’ हा चित्रपट भारताच्या पूर्वोत्तर भागात तसेच दक्षिणात्य भागात सलग 100 दिवस अनेक ठिकाणी चालला.

दिवसाला चार शो असं त्या काळातले गणित होतं. त्या काळात हिंदी सिनेमा दक्षिणात्य आणि पूर्वोत्तर भागात फारसे चालत नव्हते. पण ‘आराधना’ने यशाची सगळी गणितेच बदलून टाकली. 

चित्रपटातील शर्मिला टागोर ची भूमिका आधी अपर्णा सेन आणि आशा पारेख यांना देखील ऑफर झाली होती. पण दोघींनीही सिनेमाच्या उत्तरार्धात राजेश खन्नाच्या आईची भूमिका करावी लागेल म्हणून नकार दिला. शर्मिला मात्र खरोखरच ग्रेट अभिनेत्री म्हणावी लागेल कारण तिने ही ‘रिस्क’ माहित असताना देखील चित्रपट स्वीकारला.

या चित्रपटाच्या वेळी शर्मिला प्रेग्नंट होती. तरी देखील तिने सिनेमा वेळेत पूर्ण केला. या चित्रपटात राजेश खन्नाच्या मित्राची भूमिका आजच्या काळातील शो मन सुभाष घई यांनी केली होती. या सिनेमापूर्वी राजेश खन्नाचे बहुतेक सर्व चित्रपट अपयशी ठरल्यामुळे ‘आराधना’च्या दिल्लीमधील प्रीमियर ला राजेश खन्ना ला कुणीही नोटीस केले नाही पण चित्रपट संपल्यानंतर प्रत्येक जण राजेश खन्नाला शोधत होता. अवघ्या तीन तासात एका सुपरस्टारचा जन्म झाला असं राजेश खन्ना याने मागे एकदा ट्विट केलं होतं.

 ‘मेरे सपनो की रानी कब आएगी तू’ हे गाणं दार्जिलिंगच्या ज्या ट्रेनमध्ये चित्रित केलं होतं तीच ट्रेन तब्बल ३५ वर्षानंतर ‘परिणीता’ या चित्रपटात देखील दाखवली होती. योगायोगाची गोष्ट म्हणजे ‘परिणीता’ चित्रपटात शर्मिला टागोर चा मुलगा सैफ अली खान नायक म्हणून होता.

आता येवू यात मूळ किस्स्या कडे. यातील ’मेरे सपनोकी रानी कब आयेगी तू’ या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळचा हा किस्सा आहे. हे गाणं निसर्गरम्य दार्जिलींगला शूट होणार होतं. सारं युनिट राजेश खन्ना, सुजित कुमार सह लोकेशन वर पोचलं. पण नायिका शर्मिला टागोरचा पत्ताच नव्हता. नेमकी त्याच वेळी ती सत्यजित रे यांच्या ’अरण्येर दिन रात्रि’ या सिनेमाकरीता कलकत्याला शूट करीत होती.

इकडे नायिका नसल्याने शक्ती सामंताची अडचण झाली.

काय करणार? त्यांना एक कल्पना सुचली. छायाचित्रकार आलोक दासगुप्ताशी चर्चा करून त्यांनी जीपमधील राजेश खन्ना आणि सुजीतकुमार यांचे शूट उरकून टाकले. नायकाची जीप आणि तिथली मिनी ट्रेन यांची समांतर जातानाची दृष्ये देखील घेतली. नंतर त्यांनी दार्जिलींगच्या निसर्गाची काही धावती दृष्ये चित्रीत करून घेतली.

चार दिवसांच्या चित्रीकरणानंतर ते मुंबईत आले. मुंबईत नटराज स्टुडिओत त्यांनी त्या ट्रेन बोगी सारखी एक बोगी बनवून त्यात शर्मिलाला बसवले. बॅक ड्रॉपला दार्जिलींगला शूट केलेला निसर्ग व प्रोजेक्शन ठेवून चित्रीकरण केले. 

तुम्ही बारकाईने बघा या गाण्यात एकाही फ्रेम मध्ये राजेश व शर्मिला एकत्र दिसत नाहीत. हे सारे ’सिम्युलेशन ’ आणि ’ सिंक्रोनायझेशन’ इतले अचूक जमून आले होते की त्या मागचा हा ‘जुगाड’ कुणाच्या लक्षात आला नाही. म्हणजे या गाण्याच्या दार्जिलींगच्या शूटच्या वेळी शर्मिला नव्हती तर मुंबईतील शूटच्या वेळी राजेश खन्ना नव्हता! हा एक ग्रेट जुगाड होता.

शक्तीदांना खरं तर या सिनेमात शर्मिलाच्या जागी सुचित्रा सेनला घ्यायचे होते. पण ती बंगाली सिनेमात व्यस्त असल्याने तिने नकार दिला. नवोदित राजेश सोबत काम करायला शर्मिला पण उत्सुक नव्हतीच पण शक्तीदा तिचे हिंदीतील गॉड फादर होते. कश्मीर की कली हा तिचा पहिला सिनेमा शक्तीदांचाच होता. या सिनेमाच्या वेळी शक्ती सामंत त्यांच्या ’जाने अंजाने’ या बिग बजेट सिनेमाच्या निर्मितीत होते.

शम्मी कपूर, विनोद खन्ना, लीना चंदावरकर अशी तगडी कास्ट होती. पण काही कारणाने चित्रीकरण लांबत होते म्हणून शक्तीदांनी ’आराधना’ या लो बजेट सिनेमाचे चित्रीकरण सुरू केले. गंमत पहा ’आराधना’ ७ नोव्हेंबर १९६९ ला मुंबईच्या रॉक्सीला प्रदर्शित होवून सुपर डुपर हिट ठरला आणि रडत रखडत ’जाने अंजाने’ कसाबसा पूर्ण होवून तब्बल दोन वर्षांनी १९७१ साली पडद्यावर आला आणि सुपरफ्लॉप ठरला.

-भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.