कर्नाटक उच्च न्यायालयाचे जज म्हणतायेत संविधान हेच माझ्यासाठी भगवद् गीता

कर्नाटकातील हिजाबवरून चालू झालेला वाद थांबायचं नाव घेत नाहीए. मुस्लिम विद्यार्थिनींना शाळेत हिजाब घालून येण्यास शाळा प्रशासनाने विरोध केल्यानंतर हा वाद सुरु झाला होता. याला विरोध म्हणून काही हिंदू मुलं मुली शाळेत येताना भगवी वस्त्रे गळ्यात घालून शाळेत आली. त्यानंतर वाद अजूनच चिघळला.

त्यातही आज जो एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यावरून हा वाद खूप खालच्या पातळीला गेल्याचं बोललं जातंय. त्या व्हिडिओमध्ये  एक मुस्लिम मुलगी कॉलेजमध्ये बुरखा घालून एंट्री करते आणि त्यांनतर तिथं उभी असलेली मुलं जय श्रीरामाच्या घोषणा देतात आणि त्यांना काउंटर करायला ती मुलगी अल्लाहू अकबर हा नारा देते. या वादात कोणी बरोबर कोणी चुकीचं याच्यापेक्षा भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात कॉलेजच्या कॅम्पसमध्ये अशा घटना घडण खरंच दुर्दैवी आहे हे तुम्ही पण मान्य कराल.

 

याच्याही पुढे जाऊन एका कॉलेजमध्ये तर पोरांनी ध्वजस्तंभावर चढून भगवा ध्वज फडकवला. आज दिवसभर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडियात कर्नाटकातील हाच विषय चर्चला जातोय.

आता हा वाद कर्नाटक उच्च न्यालयात गेला आहे. 

उडुपी जिल्ह्यातील सरकारी महिला प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजच्या अनेक विद्यार्थिनींनी हायकोर्टात याचिका दाखल करून कॉलेजमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागितली आहे. मंगळवारच्या सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्यांपैकी उपस्थित असलेले वकील मोहम्मद ताहिर यांनी  सांगितले की शैक्षणिक वर्ष संपण्यास फक्त दोन महिने शिल्लक आहेत आणि विनंती केली की विद्यार्थ्यांना किमान त्या कालावधीसाठी हिजाब घालण्याची परवानगी द्यावी.

मात्र सरकारी पक्षानं या मागणीला होकार दिला नाही.त्यानंतर न्यायालयाने सांगितले की मेरीटनुसार या प्रकरणाची सुनावणी होईल, कारण राज्य सरकारने शैक्षणिक सत्राच्या उर्वरित दोन महिन्यांत विद्यार्थ्यांना हिजाब घालू देण्याच्या याचिकाकर्त्यांच्या सूचनेला सहमती दर्शविली नाही.

याच सुनावणी दरम्यान हि केस ऐकणाऱ्या न्यायाधीशांनी नोंदवलेली निरिक्षणे चर्चेचा विषय ठरली आहेत.याचिकाकर्त्यासाठी बाजू मांडताना वकील अभिषेक जनार्दनन की विद्यार्थ्यांना हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश मिळावा अशी प्रार्थना आहे. यावर न्यायाधीश दीक्षित म्हणतात

“आम्ही तर्काने, कायद्याने जाऊ, उत्कटतेने किंवा भावनांनी नाही. राज्यघटना जे सांगते त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत. माझ्यासाठी संविधान ही भगवद्गीता आहे. मी संविधानाचे पालन करण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळं भावना बाजूला ठेवूया.”

या केसची सुनावणी अजून चालू आहे. या वादावर कायदा काय म्हणतो हे कोर्ट सांगेलही मात्र कोर्टाच्या बाहेर वाद मात्र थांबायचं नाव घेत नाहीये.  हिजाब वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी राज्यातील भाजप सरकारला सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्याची आणि ऑनलाइन वर्ग आयोजित करण्याची विनंती केली.

तर मात्र, भाजपने हा षडयंत्र असल्याचा  आरोप केला आहे. इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी हिजाबच्या वादामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी पुढील तीन दिवस सर्व माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आता तुमच्या यावर काही प्रतिक्रिया असतील तर खाली कंमेंट करून जरूर सांगा.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.