नुपूर शर्मा काय बोलल्या ज्यामुळे अरब देश नाराज झालेत; असं आहे संपुर्ण प्रकरण

राजकीय नेत्याचं एक बेताल वक्तव्य – त्याचे उमटणारे पडसाद अन माफीनामा हे सत्र राजकारणात नवं नाहीये. मात्र यावेळेस असं काही प्रकरण घडलंय की, त्याचे पडसाद अगदी अंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले आहेत. 

भाजप नेत्या नुपूर शर्मा प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल असं काही अपमानास्पद बोलल्या कि, भाजप पक्षालाच नव्हे तर संपूर्ण देशालाच त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. अनेक आखाती देशांनी भारतावर विशेषकरून भाजपवर टिका करायला सुरूवात केली आहे. 

तसेच भारतात देखील याचे परिणाम पाहायला मिळाले, राष्ट्रपती आणि पंतप्रधान कानपूर दौऱ्यावर गेले असताना यादरम्यान कानपूरमध्ये भीषण हिंसाचार झाला होता आणि याला नुपूर शर्मा यांचं ते वादग्रस्त वक्तव्य कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतंय. भारतातच नव्हे तर कतार, कुवैत, इराण सारख्या आखाती देशांनी भारताविरोधात संताप व्यक्त केलाय. 

 हे संपूर्ण प्रकरण काय आहे ? आणि या नुपूर शर्मा कोण आहेत हे जाणून घेऊया..

नुपूर शर्मा या विध्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या, दिल्ली भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या सदस्य आहेत. त्या २०१५ मध्ये सर्वप्रथम चर्चेत आल्या होत्या आणि त्याला कारण होतं २०१५ ची विधानसभा निवडणूक. 

या निवडणुकीत त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. बऱ्याच मोठ्या फरकाने त्यांची हार झाली मात्र त्या कायमच चर्चेत येत असतात.   

आत्ता त्या चर्चेत येण्याचं कारण ठरलंय ते म्हणजे त्यांचं वादग्रस्त वक्तव्य. 

या प्रकरणाची सुरुवात २७ मे रोजी झाली. 

या दरम्यान भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टाइम्स नाऊ  टीव्ही चॅनलवरील डिबेटमध्ये इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं. त्याच दरम्यान दिल्ली भाजपचे मीडियाप्रमुख नवीन जिंदल यांनीदेखील असंच काहीसं वादग्रस्त ट्विट केलं. साहजिकच आहे त्याचे परिणाम उमटायला सुरुवात केली. 

१ जून रोजी महाराष्ट्रात त्यांच्याविरुद्ध पहिली FIR दाखल झाली. २ जून रोजी मुंबई, हैदराबाद आणि पुण्यात देखील FIR दाखल झाली.  

३ जून रोजी संघ प्रमुख मोहन भागवत यांनी मंदिर-मशीदीच्या वादावर एक वक्तव्य केलं. 

ते म्हणाले होते कि, “रोज मंदिराचा मुद्दा काढणं योग्य नाही. ज्ञानवापीचा इतिहास आपण बदलू शकत नाही. हिंदू हे मुस्लिमांच्या विरोधात नाहीत. काही मुस्लिम आक्रमनकारी आले आणि त्यांनी मंदिरं तोडली. यामुळेच काही हिंदू लोकांना वाटते की, मंदिर व्हायला पाहिजे. आपापसात भांडण होऊ नये. याबाबत कायदेशीर लढाई चालू आहे मात्र आम्ही ज्ञानवापीसाठी रस्त्यावर उतरणार नाही”, असं म्हणत मोहन भागवत यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. 

यानंतर नूपुर शर्मा यांनी दिलगिरी व्यक्त करत आपले वक्तव्य बिनशर्त मागे घेतलं. मात्र तरीही भाजपने पक्षीय कारवाई करत ५ जून रोजी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांची पक्षातून हकालपट्टी केली.

इतकंच नाही तर या प्रकरणाची पाकिस्तानमध्ये देखील चर्चा होतेय.  

#ArrestNupurSharma हा हॅशटॅग पाकिस्तानात सलग २ दिवस टॉप ट्रेंड मध्ये होता.  “नुपूर शर्मा या इस्लामोफोबिक आहेत. त्यांनी आमच्या पैगंबराचा अपमान केला आहे त्यांना अटक करावी आणि सर्व मुस्लिम देशांनी भारतावर बहिष्कार टाकावा” असा ट्रेंड पाकिस्तानात चालू आहे. 

खरं तर या विरोधाची सुरुवात भारतातून झाली आहे. 

२७ मे ला नुपूर शर्मानी वक्तव्य केलं आणि २८ मे ला रझा अकादमी या संघटनेने ट्विट करून #ArrestNupurSharma हा हॅशटॅग चालवून त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. रझा अकादमीच्या मागणी नंतर नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध मुंबईत आयपीसीच्या कलम १५३ अ, २९५ अ, ५०५ (२) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

मात्र या कारवाईला सर्वात मोठं कारण ठरलं ते म्हणजे आखाती देशांची भारताच्या विरोधातील प्रतिक्रिया. 

कतार, कुवैत, बहारीन, इराण आणि ओमानसह इतर आखाती देशांनी भारताविरोधात संताप व्यक्त केलाय. जो भारताला परवडणारा नाहीये. का ? 

तर हे आखाती देश भारतासाठी महत्वाचे आहेत. या देशांसोबत भारताचे कायमच चांगले संबंध राहिलेत.

गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलच्या म्हणजेच GCC च्या सदस्यांमध्ये  कुवेत, ओमान, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि बहारीन या देशांचा समावेश आहे. 

या देशांमध्ये लाखो भारतीय काम करत असतात. इथल्या एकूण स्थलांतरित कामगारांपैकी जवळपास ३० टक्के कामगार हे भारतीय असल्याची माहिती मिळतेय. बरं आखाती देशात भारतीय आहेत म्हणूनच हे महत्वाचे आहेत असं नाही तर, याच आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमुळे त्या त्या देशातल्या अर्थव्यवस्थेला हातभार तर लागतोच लागतो सोबतच भारताच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठा फायदा होतो. त्यांच्या मार्फत देशात परकीय चलनदेखील मोठ्या प्रमाणावर मिळते.

याच शिवाय या देशांसोबत भारताचे व्यापारी संबंध चांगले आहेत. तसेच या आखाती देशांचे भौगोलिक स्थान भारतासाठी खूप महत्वाचे आहे कारण ओमानमध्ये वैगेरे भारताचे नौदल आणि हवाई तळ आहेत.

सर्वात महत्वाचं म्हणजे, आंतरराष्ट्रीय राजकारणात सातत्याने भारताची बाजू घेणारे म्हणजे आखाती देश. आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानने काश्मीरच्या मुद्यावर जेंव्हा जेंव्हा भारताविरोधात भूमिका घेतली तेंव्हा तेंव्हा याच आखाती देशांनी भारताची बाजू लावून धरली.

…..आणि आजच्या दिवसात हेच आखाती देश भारतावर संताप व्यक्त करतायेत.

कतारने काय भूमिका घेतली ? 

तर भारतीय दूतावाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या राजदूतांमध्ये एक बैठक झाली ज्यामध्ये कतार देशाने भारतासारखा देश जो सर्व धर्मांना सर्वोच्च आदर करतो त्याच देशात अशा प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य होणं चिंताजनक असल्याचं म्हंटलंय. तसेच अशा प्रकारच्या संधीचा फायदा घेत काही गट लोकांना भडकावण्यासाठी याचा वापरत करतील आणि भारत-कतार संबंध कमकुवत करतील अशी चिंता व्यक्त केली आहे.

याच दरम्यान, नुपूर शर्मा प्रकरणाबाबत कुवैतच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही ५ जून रोजी भारतीय राजदूताला बोलावून अधिकृतपणे आपला विरोध व्यक्त केला. 

भारतानेही कुवेतच्या नाराजीवर प्रतिक्रिया देत नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केल्याचा निर्णय त्यांना कळवला.

या प्रकरणावर सौदीतुन देखील प्रचंड विरोध झाला. कतार, ओमान, सौदी अरेबिया आणि इजिप्त या मध्य पूर्व देशांमध्ये ही घटना सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

या अरब देशांमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्या विरोधात जे निदर्शने सुरु झालीत त्याला ओमानचे मुफ्ती शेख अहमद बिन हमाद अल खलीली हे कारणीभूत ठरले. 

त्यांनी ट्विट केले होते की, भारताच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याने इस्लामच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केलीय आणि  याप्रकरणी सर्व मुस्लिम देशांनी एकत्र उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. आणि त्यानंतरच अरब देशांमध्ये भारताविरोधात निदर्शने सुरू झाली होती

हे सगळं सुरु असतांनाच ५ जून रोजी भाजपने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. 

“भाजप सर्व धर्मांचा आदर करीत असून कोणत्याही धार्मिक महापुरुषाचा अपमान हा निषेधार्ह आहे आणि आम्ही त्या विरोधात आहोत”, असं भाजपने म्हटलं आहे. 

शिवाय एएनआयने दिलेल्या बातमीनुसार भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

भाजपने केलेल्या या कारवाई नंतर तरी हे प्रकरण शांत होईल का? कि भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणात याचे परिणाम भोगावे लागतील का ? हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे 

 

हे ही वाच भिडू :

 

 

 

1 Comment
  1. Shubham Patil says

    It’s funny that you did not mention exact words said by her and the Muslim fellow, she said whatever is already there in islamic history books, why shy away to say it out loud when their lord married to a child and was a pedophile.

Leave A Reply

Your email address will not be published.