बाळासाहेब देसाई म्हणाले, राज्य गहाण पडले तरी चालेल पण राज्यातील पोरं शिकली पाहीजेत

आज शाळेची फी लाखोंच्या घरात आहे. खाजगी शाळांचा प्रस्थ खेड्यापाड्यात रुजलं आहे. आपल्या पोराला शाळेत घेवून जाण्यासाठी स्कूलबस येथे इथपासून ते आपला मुलगा पोपटाला पॅरोट म्हणतो याचं कौतुक वाटणारी आईबापांची नवी पिढी खाजगी शाळांनी गावखेड्यात जन्माला घातली आहे. 

तर दूसरीकडे सरकारी शाळांमध्ये मात्र एक E.B.C. फॉर्म भरला की काम होतं. कुठलीच फि नसते. अगदी पन्नास वर्ष होवून गेली तरी एका नेत्याने घेतलेला हा क्रांन्तीकारी निर्णय कायम आहे.

कित्येक पोरं त्या एका फॉर्ममुळ शिकू शकली. 

शिक्षणविषयक गोष्टीत गेल्या सत्तर वर्षात आमुलाग्र बदल करण्यात आले. पण त्यांनी महाराष्ट्रात जो निर्णय घेण्याची धमक दाखवली क्रांन्तीकारी होती. इतकी क्रांन्तीकारी की आजही कोणताही पक्ष सत्तेत येवूदे त्यांना EBC सवलत रद्द करण्याच धाडस होत नाही. 

राज्यात शिक्षणासाठी E.B.C सवलत चालू करणाऱ्या त्या नेत्याचं नाव होतं बाळासाहेब देसाई.. 

राज्याच्या उभारणीत मोलाच योगदान देणारे नेते महाराष्ट्रात होवून गेले. बाळासाहेब देसाई यांच नाव या यादीत अग्रक्रमाने घेत जातं. १९४१ साली ब्रिटीश राजवटीच्या विरोधात सातारा जिल्हा लोकल बोर्ड अध्यक्षपदावरून त्यांनी आपल्या राजकीय कार्याला सुरवात केली होती. 

१९४१ ते १९५२ दरम्यान ब्रिटीश धार्जिणी लोकांचा पराभव करून सामान्य जनतेच नेतृत्व प्रस्थापित होत गेलं. सलग ११ वर्ष ते सातारा जिल्हा बोर्डाचे अध्यक्ष होते. 

१९५२ साली ते सातारा जिल्ह्यातल्या पाटण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. पुढे १९५७ आणि ६२ साली देखील ते विधानसभेच्या निवडणिुकांमध्ये विजयी झाले. १९५७ सालीच म्हणजे आमदारकीच्या दूसऱ्या टर्ममध्ये त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला होता. 

१९६७ साली ते बिनविरोध निवडून गेले… 

त्यांच्या या विजयात देखील एक रेकॉर्ड आहे. तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा बिनविरोध निवडून गेलेल आमदार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. १९५७ ते १९७० दरम्यान बांधकाम, शिक्षण, कृषी, महसूल, गृह मंत्रालयाचा कारभार पहात होते. 

विविध मंत्रालयात केलेल्या कामांमध्ये त्यांचा विशेष उल्लेख केला जातो तो विद्यार्थांचे शिक्षण मोफत करण्याबाबत. शेतकऱ्यांची पोरं शिकली पाहीजे हे त्यांच ठाम मत होतं. अशा वेळी त्यांनी १२५० पर्यन्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना मोफत शिक्षण असावे म्हणून E.B.C सवलतीची संकल्पना मांडली. ठरल्याप्रमाणे या योजनेला विरोध देखील करण्यात आला. विरोधाच मुख्य कारण होतं की इतक्या मोठ्या प्रमाणात सवलत दिल्यास राज्य गहाण टाकण्याची वेळ सरकारवर येईल. राज्यावर कर्जाचा बोजा वाढेल.

त्यावेळी त्यांनी क्रांन्तीकारी घोषणा केली ती म्हणजे, 

प्रसंगी राज्य गहाण पडलं तरी चालेल पण पोरं शिकली पाहीजे…! 

त्यांच्या ठाम भूमिकेमुळे E.B.C सवलतीचा निर्णय मान्य करावा लागला. राज्यभरात १२५० पर्यन्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलांना शिक्षण मोफक झालं. ज्या प्रमाणे कर्मवीरांनी गरिबांच्या पोरांना शिकवण्याच शिवधनुष्य पेललं तसच काम सातारच्या पुत्राने करून दाखवलं. कर्मवीरांच्या कर्मभूमीत जन्मलेल्या या माणसामुळे महाराष्ट्रातील गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा पोरगा शिकू शकला. 

त्यांच्या या निर्णयाच कौतुक पुढे तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील केलं. 

इतकच काय तर सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर मधील पोरांना उच्चशिक्षण मिळावं म्हणून त्यांच्याच काळात कोल्हापूर इथे शिवाजी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्रातल्या गडकिल्लांना रस्तेमार्गाने जोडण्याच काम केलं तर गेट वे ऑफ इंडिया तसेच दादरच्या शिवाजी पार्कवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात त्यांच योगदान राहिलं. 

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. vighnesh says

    maza bhau ebc mule tyacha engineering karu shakala tyat balasaheb desai hyanche yogday khup mothe aahet

Leave A Reply

Your email address will not be published.