१९४८ मध्ये पटियालाच्या खजिन्यातून अचानक गायब झालेला ‘नेकलेस’ MET GALA मध्ये दिसलाय

दरवर्षी येणारा इंटरनॅशनल फॅशन शो म्हणजेच MET GALA.

फॅशनचा ऑस्कर सोहळा म्हणलं जातं..या कार्यक्रमाला मोठमोठे सेलिब्रिटी हजेरी लावतात. हा सोहळा दरवर्षी चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्यात सेलेब्रेटींचा कॉस्च्युम. चित्र-विचित्र प्रकारचे कपडे घालून सेलिब्रेटी या मेट गाला मध्ये हवा करतात. त्यानंतर सोशल मीडियावर काय लेव्हलचे मिम्स तयार होतात हे आता वेगळं सांगायला नको…

अलीकडेच न्यूयॉर्कमध्ये मेट गाला २०२२ पार पडला. नेहेमीप्रमाणेच याही वर्षी सेलिब्रेटी आपल्या विचित्र ड्रेसमुळे चर्चेत राहिले मात्र यंदा चर्चेचं आणखी एक कारण मिळालं ते म्हणजे ‘पटियाला नेकलेस’.

अमेरिकन सेलिब्रिटी यूट्यूबर एम्मा चेंबरलेन हिने MET GALA 2022 मध्ये पटियाला नेकलेस घातला  ज्याची चर्चा अजूनही सोशल मीडियावर चालूच आहे.

त्यामागचे कारण म्हणजे एम्माने परिधान केलेला डायमंड नेकलेस, जो पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंग यांचा फार फार वर्षांपूर्वी हरवलेला हार असल्याचे सांगण्यात येतंय.

महाराजा भूपिंदर सिंग म्हणजेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांचे ते आजोबा.

“तसेच एम्माने घातलेला पटियाला नेकलेस एक महत्त्वाची ऐतिहासिक वस्तू आहे जी शिखांना परत केली पाहिजे अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत”.

इंडियन एक्स्प्रेसच्या संदर्भानुसार, एम्मा चेंबरलेनने घातलेला हार महाराजा भूपिंदर सिंग यांचा आहे जो १९४८ मध्ये राजकीय खजिन्यातून गायब झाला होता.

आता एम्मा त्याच न्यूयॉर्कच्या कार्टियर ज्वेल्सची ब्रँड अम्बेसेडर आहे ज्या ज्वेलरी कंपनीने महाराजा भूपिंदरचा हार बनवला होता. नेमकी या डायमंड नेकलेसची काय स्टोरी आहे ?

त्या आधी हा मेट गाला सोहळा काय आहे हे माहिती करून घ्या..

Met Gala इव्हेंट म्हणजे कपडे, हेअरस्टाईल, मेकअपचा शो असतो. जो ‘द मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट (न्यूयॉर्क)’ द्वारे आयोजित केला जातो. याची सुरुवात झाली १९४६ पासून झाली. पण याचं  मुख्य उद्दिष्ट हे आहे की, हा फंड रेजिंग इव्हेन्ट आहे. या शोमधून जमा होणारा निधी कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी वापरला जातो. 

दरवर्षी या इव्हेंटसाठी एक थीम ठरवून दिली जाते. त्या थीमनुसारच सेलिब्रिटीज त्यांचे कपडे, मेकअप, हेअरस्टाईल या सगळ्या गोष्टी ठरवतात.  फंड रेजिंगसाठी जास्त संख्येत लोकांनी याकडे आकर्षित होणं गरजेचं आहे आणि म्हणून लोकांना आकर्षित करण्यासाठी अशी आगळीवेगळी वेशभूषा केली जाते.

यंदाची थीम ‘इन अमेरिका : फॅशन अँथोलॉजी, आणि ड्रेस कोड होता ‘गिल्ड्ड ग्लॅमर अँड व्हाइट टाय’.  यातून दाखवण्यात आलं १९ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात जेंव्हा औद्योगिकीकरणामुळे देशातील संपत्तीची दरी झपाट्याने वाढली. 

तर आता विषय येतो तो म्हणजे महाराजा भूपिंदर सिंग यांचा हिऱ्यांचा हार.

पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंग यांची ओळख म्हणजे एक उत्तम रसिक, तितकाच प्रेमळ आणि ऐशोआरामात जीवन व्यतीत करणारा राजा अशी होती. हे महाराजा आपल्या रंगीबेरंगी मूडसाठी खूप प्रसिद्ध होते म्हणे. इतिहासकारांच्या मते, महाराजांकडे एकूण ३६५ राण्या होत्या ज्यातल्या १० अधिकृत राण्या होत्या.. तसे अनेक किस्से त्यांच्या प्रदेशात सांगितले जातात.

त्यांना कायमच उत्कृष्ट पोशाख, दागिने, वस्तूंचा शौक होता. त्यांच्या याच आवडीचा एक भाग म्हणजे ते परिधान करत असलेला पटियाला नेकलेस ज्याची चर्चा आजही होतेय.

काही संदर्भानुसार, १८८८ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका खाणीत जगातील सातवा सर्वात मोठा डी बियर्स’ हा हिरा आढळून आला होता. तो जप्त करण्यात आला आणि १८८९ मध्ये पॅरिस युनिव्हर्सल एक्झिबिशनमध्ये ठेवण्यात आला होता.

याच हिऱ्याची भुरळ महाराजा भूपिंदर सिंग यांना पडली. पॅरिस युनिव्हर्सल एक्झिबिशनमध्ये ठेवलेला हा हिरा १८८९ मध्ये भूपिंदर सिंग खरेदी केला.

असे म्हणतात की महाराजा भूपिंदर सिंग हे जवळपास ३४ वर्षांचे असावेत तेंव्हा त्यांनी डी बियर्स हिऱ्याला एका नेकलेस मध्ये ठेवावं म्हणजे ते परिधान करता येईल असा विचार केला आणि यासाठी त्यांनी दागिने बनवणाऱ्या कार्टियरशी संपर्क साधला.

आणि त्यानंतर १९२८ मध्ये हा हिरा चोकर म्हणजेच नेकलेस तयार झाला आणि भूपिंदर सिंग यांनी त्याचे नाव पटियाला नेकलेस असे ठेवले.

Image

त्यानंतर…..१९४८ मध्ये महाराजा भूपिंदर सिंग यांचा मुलगा महाराजा यादविंद्र सिंग यांनीही हा हार परिधान केला. 

patiala necklace

पण अचानक हा हिऱ्याचा हार पटियाला शाही खजिन्यातून रहस्यमयरीत्या गायब झाला.  

त्यावरून बरेच वाद देखील निर्माण झालेले. तत्कालीन राजांनी याचा बराच शोध घेतला मात्र त्याचा ३२ वर्ष काहीच थांगपत्ता लागला नाही. 

पण अचानक सोथेबी नावाची एक ब्रिटिश-स्थापित अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी पुरातन वस्तू, कपडे, दागिन्यांचा लिलाव करते. या कंपनीने १९८२ मध्ये एका लिलावात हा पटियाला नेकलेसमधील डी बिअर डायमंड लिलावाला ठेवला. पण येथे फक्त हिरा होता, हार नव्हता. 

इंटरेस्टिंग म्हणजे, त्याचवेळी लंडनमधील एका प्राचीन वस्तूंच्या दुकानात पटियाला नेकलेसचा काही भाग दिसला. 

लंडनमधील कार्टियरच्या एरिक नुसबॉम नावाच्या मेम्बरने तो हिरा आणि तो हार परत मिळवला आणि हरवलेल्या नेकलेसमधील बर्मीज रुबीज मौल्यवान दगडांची डिझाईन बदललं, फिनिशिंग केलं आणि आज तो नेकलेस कार्टियरच्या ताब्यात आहेत.

इतिहासातील सर्वात महागड्या दागिन्यांमध्ये पटियालाच्या महाराजांच्या या ‘डायमंड नेकलेस’ची गणना केली जाते. अंदाजानुसार, या संपूर्ण नेकलेसची किंमत आज ३० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच रु. २,३२,००,३५,०००.०० इतकी असू शकते. या नेकलेसमध्ये पाच प्लॅटिनम रॉमध्ये २,९३० हिरे सजवले होते. तसेच बर्मीज रुबीज सारखे मौल्यवान दगड बसविण्यात आले.

तो नेकलेस चोरीला गेला का कुणी परस्पर विकला? नेमकं तो नेकलेस भारताबाहेर गेलाच कसा काय याबद्दल काहीही माहिती हाती लागत नाही.

तुम्ही इंटरनेटवर Maharaja Bhupinder Singh of Patiala असं सर्च केलं तर तुम्हाला भूपिंदर सिंग यांच्या कोणत्याही फोटोत हा अनमोल हिऱ्यांचा हार दिसेलच दिसेल. तोच मौल्यवान हार भारताकडे नाही तर परदेशी कंपन्यांकडे आहे याबद्दलही सोशल मीडियाच्या माध्यमातून खेद व्यक्त केला जातोय.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.