बाजीरावच्या सासऱ्याच्या गावात लोकांना आजही खरेखुरे हिरे सापडतात

एक गाव असतंय, तिथं एक गरीब शेतकरी असतोय. जगात आंदोलनं, महायुद्ध, मारामारी, निवडणुका काय काय चाललेल्या असत्यात पण ह्यो गप गुमान आपल्या शेतात राबत असतोय. एकदा जमिनीत नांगर मारताना त्याला एक दगड सापडतोय. दगड लई चमकत होता.

गड्याने एका शहाण्या माणसाला दाखवला. तर त्यो साधासुधा नाही तर चक्क हिरा होता. ते पण साठ लाख रुपयांचा.

तुम्ही म्हणाल छान छान गोष्टी मधली कथा आहे. तर नाही ओ, हे खरोखर घडलंय, ते पण आत्ता. मध्यप्रदेशच्या पन्नामध्ये एका लखन यादव नावाच्या शेतकऱ्याला शेतात हा हिरा गावला आणि त्याने त्यो हिरा साठ लाखाला विकून पण टाकला.

स्टोरी वाचून कप्पाळात गेल्या असतील पण या शेतात हिरा सापडणाऱ्या गावाची आणि तिथल्या राजाची गोष्ट याच्या पेक्षाही भन्नाट आहे.

बुंदेलखंड. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशच्या दरम्यान पसरलेला भला मोठा जंगली भाग. तसं बघायला गेल इथं ढिगानं हिऱ्याच्या खाणी आहेत पण तरी हा प्रदेश अतिमागास आणि गरीब समजला जातो. पण इथला इतिहास मात्र प्रचंड संपन्न आहे. खजुराहो ची सुप्रसिद्ध मंदिरे याची साक्ष आहेत.

एकेकाळी चंडेल राजपूत या भागावर राज्य करायचे. पुढे मुघल भारतात आले आणि या बुंदेले राजांची स्वातंत्र्याची लढाई सुरु झाली. अकबराच्या काळात या राजांची मुघलांशी तह झाले होते. राज्यकारभारात मुघल मोठा हस्तक्षेप करणार नाहीत या अटीवर त्यांनी अकबराचं मांडलिकत्व स्विकारलं होतं

पुढे जहांगीर मेल्यावर सर्व बुंदेले राजे एकत्र आले आणि त्यांनी चंपतराय या राजाच्या नेतृत्वाखाली मुघल सत्तेच्या विरुद्ध बंड पुकारले. या सर्वानी मिळून दिल्लीच्या फौजांचा अनेकदां पराजय केला होता. शेवटी शहाजहानानें त्यांच्याशीं मित्रत्वाचा तह करून त्याचें स्वातंत्र्य मान्य केलें.

एवढंच काय तर औरंगजेबानें आपल्या तक्तारोहणाच्या प्रयत्‍नांत चंपतरायाची मदत घेतली होती; परंतु गादीवर आल्यावर त्यानें चंपतचा अपमान केला; तेव्हां चंपतने औरंगजेबच्या विरूद्ध युद्ध उपस्थित केलें. औरंगजेबानें त्याच्यावर स्वतः स्वारी केली व कपटानें एका लढाईत त्याला ठार मारले.

या चंपतरायचा मुलगा म्हणजे छत्रसाल.

अगदी कमी वयात त्याच्यावर मोठी जबाबदारी पडली. वडिलांच्या मृत्यूनंतर बुंदेल्यांचें स्वातंत्र्य कायम ठेवण्याचें जबाबदारी त्याने उचललली. याच सुमारास दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेचा प्रयत्‍न चालवला होता. छत्रसाल महाराजांच्या भेटीला आला व मला आपल्या सैन्यात सामील करून घ्या म्हणून विनंती केली.

पण शिवरायांनी याला नकार दिला उलट तू देखील एक राजा आहेस, स्वतःचे राज्य स्थापन कर आणि ते मोठे करण्याचा प्रयत्न कर असे प्रोत्साहन दिले.

भीमेच्या काठी त्यांची ही भेट झाली होती महाराजांनी छत्रसालला आपली एक तलवार भेट दिल्याचाही उल्लेख कवी भूषण याने वर्णन करून ठेवला आहे.

मराठ्यांच्या स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन छत्रसाल परत बुंदेलखंडांत गेला आणि मुघल बादशाह औरंगझेबाशी युद्ध पुकारले. चवताळलेल्या औरंगझेबाने छत्रसालावर फिदाईखान याच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले. पण त्याचा बुंदेल्यांनी मोठा पराभव केला.

छत्रसालचा हा पराक्रम पाहून मुघलांचे मांडलिक झालेले इतर बुंदेले राजे पुन्हा एकत्र आले. सबंध बुंदेलखंड त्यांच्या अधिपत्याखाली आला. फक्त हिंदुराजेच नाही तर आसपासचे मुसलमान सरदारहि त्यांचे मांडलिक बनले.

औरंगजेबाला त्यांची प्रचंड भीती बसली होती. त्याने वेळोवेळी आपले अनेक सेनापती छत्रसालावर धाडले पण या साऱ्यांचा त्याने पराभव केला. एका सेनापतीला तर दंड भरून स्वतःची  सुटका करून घ्यावी लागली.

 तेव्हां नाइलाजानें औरंगजेबानें छत्रसाल महाराजांशी मैत्रीचा तह केला.

छत्रपती शिवाजी महाराजानी पेरलेले हे बीज तरारून आले होते. छत्रसालाने पन्ना येथे आपली राजधानी स्थापन केली. गेली अनेक वर्षे लढाईच्या धामधुमीत बुंदेलखंडाचे प्रचंड नुकसान झाले होते. आता इथल्या लोकांचे जीवन सुरळीत करण्याची जबाबदारी देखील छत्रसाला यांची होती.

पण खजिना खाली होता. पैशांच्या जुळवाजुळवीचा प्रश्न खूप मोठा होता.

अशावेळी छत्रसालाचे प्राणनाथ प्रभु नांवाचे गुरु मदतीला आले. त्यांनी राजाला हिऱ्याच्या खाणी खोदण्याचा सल्ला दिला. त्यांनी आशीर्वाद दिला होता की,

छत्ता तेरे राज में, धक-धक धरती होय |

जित-जित घोड़ा पग धरे तित-तित हीरा होय 

छत्रसालाच्या गुरुंचे शब्द खरे ठरले. बुंदेलखंडच्या खोऱ्यात हिऱ्याच्या खाणी सापडल्या. छत्रसाल राजाचे साम्राज्य संपन्न बनले. मुघलांनी त्याचे स्वतंत्र राज्य मान्य केले.

पण कितीही मोठा झाला तरी छत्रसाल राजाने छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार कधीही विसरले नाही. 

पुढे जेव्हा छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मराठ्यांनी नर्मदा ओलांडून उत्तरेत स्वारी केली तेव्हा अनेक राजपूत राजे देखील मराठ्यांच्या सोबत येण्यास नकार देत होते. तेव्हा छत्रसाल हा पहिला राजा होता ज्याने मुघलांची वक्रदृष्टी असूनही मराठ्यांना मदत केली.  माळवा, इंदौर या भागात पसरले. दिल्लीला दहशत निर्माण करू लागले.  

त्यामुळे चिडलेल्या मुघल बादशहा महंमदशहाने छत्रसालावर वचक ठेवण्यासाठी महंमदखान बंगश याची नेमणूक केली. त्याला बुंदेलखंडच्या लगतच जहागीर दिली. या बंगशचा छत्रसालांना कायमचा उपसर्ग सुरु झाला.

या महंमद बंगशच्या दोन मुलांचा छत्रसालाच्या सेनेने पराभव केला. एका ठार केले तर दुसऱ्याला पळवून लावले. अखेर स्वतः महंमद बंगश बादशहाचे भलेमोठे सैन्य घेऊन बुंदेलखंडात घुसला. जैतपूर येथे घणाघाती लढाई झाली. वृद्ध झालेल्या छत्रसाल महाराजांनी मोठा पराक्रम केला मात्र बंगशने त्याचा पराभव केला. या युद्धात छत्रसाल महाराज जबर जखमी झाले.

त्यावेळी त्यांना मराठ्यांची आठवण झाली. मराठी सत्तेचा कारभार तेव्हाच तरुण व पराक्रमी पेशवा पहिला बाजीराव सांभाळत होता. छत्रसाल महाराजांनी त्याला मोठ्या विनवणीचे पत्र पाठवले.

”जो गति ग्राहगजेंद्रकी सो गति भई है आज । बाजी जात है बुंदेलकी राखो बाजी लाज ॥”

हे पत्र मिळताच पेशवा बाजीराव ताबडतोब निघून धामोरा येथे छत्रसालास भेटला नंतर उभयंताचे सैन्य  बंगषवर जाऊन तुटून पडले. त्यांनीं त्याचा जैतपूर येथेच पुरा धुव्वा उडवला.

या लढाईत तीन हजार घोडे व तेरा हजार हत्ती पाडाव झाले. बाजीरावाच्या पराक्रमाबद्दल, त्याच्या युद्धनीतीवर महाराजा छत्रसाल प्रचंड खुश झाले. त्यांनी त्याला आपला तिसरा मुलगा मानलं. आपल्या साम्राज्याचा एक तृतीयांश भाग भेट म्हणून दिला. यात झांशीचा समावेश होता. 

याच्या पलीकडे जाऊन त्याच्याशी नातेसंबंध जोडायचे म्हणून आपली लाडकी मुलगी मस्तानी दिली.

मस्तानीला पन्नाच्या खाणीतील सर्वात सुंदर हिरा म्हणून ओळखले जायचे. ती छत्रसाल महाराजांच्या एका मुसलमानी नाटकशाळेची मुलगी होती. बाजीराव मस्तानीला पुण्याला घेऊन आला. तिथे तिला एक मोठा महाल बांधून दिला, तिच्याशी लग्न केलं.

मस्तानीच्या सौंदर्याच्या अनेक खऱ्या खोट्या आख्यायिका फेमस झाल्या. तिचा त्यावरून प्रचंड दुस्वास देखील करण्यात आला. पण बाजीरावाने तिला कधी अंतर दिले नाही. पुढे तिच्या मृत्यूनंतर बुंदेलखण्डाची जहागिरी मस्तानीच्या वंशजांना देण्यात आली. 

महाराजा छत्रसाल यांनी  बहाल केलेल्या जहागिरीने शेवट्पर्यंत मराठा साम्राज्याची साथ दिली. बुंदेल्यांचा अभिमान असलेली राणी लक्ष्मी बाई उर्फ झाशीची राणी ही देखील याच भागातील रत्नांपैकी एक.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.