एकीकडे देशभरात नवीन मेट्रोची लाइन लागलेय मात्र त्याचवेळी मुंबईची मोनोरेल का फेल झाली?

मोनोरेल… १ फेब्रुवारी २०१४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोनोरेलला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मोठमोठ्या घोषणा झाल्या, दररोज लाखो लोकांच्या प्रवासाचे अंदाज सांगण्यात आले. मात्र तो गाजावाजा काही दिवसातच शांत झाला आणि मुंबईच्या ट्रॅफिकला कमी करण्यासाठी बनवण्यात आलेली महत्वाकांक्षी मोनो रेल्वे फेल झाली.

पण डिझायनिंग, व्यवस्था, टेक्नोलॉजी, गुंतवणूकदार हे सगळं काही एकदम ओके असतांना मोनोरेल फेल का झाली? 

तर ती केवळ एका चुकीमुळे. एक चुका झाली आणि तब्बल ३ हजार कोटींची गुंतवणूक असलेली मोनोरेल थंडबस्त्यात पडली. ही एक चूक समजून घेण्यासाठी आधी मोनोरेलचा प्लॅन सविस्तर समजून घ्यावं लागेल. मुंबईत गर्दी आणि ट्रॅफिकची काय अवस्था आहे हे सगळ्यांनाच माहितेय. लोकल आणि बेस्टची सेवा आहे मात्र ती अपुरी पडत असल्यामुळे भविष्याचा विचार करून मोनोरेलचा प्रोजेक्ट आणण्यात आला. 

मोनोरेल ही एकप्रकारची रेल्वेच आहे. मात्र ही जमिनीवर बनवलेल्या रुळावर चालत नाही. तर हिची रचना मेट्रोसारखीच असते मात्र पिलरच्या आधारावर बनवण्यात आलेल्या बिमवरून धावते. या प्रोजेक्टसाठी मुंबईतील चेंबूर ते जेकब लाईन इथपर्यंतच्या रस्त्याची लाईन बनवण्याचा प्रस्ताव आला आणि टप्प्या टप्प्यात याचं बांधकाम होणार होतं.  

मात्र राजकीय नेते प्रोजेक्ट सुरु करणार आहेत म्हटल्यावर त्याच्यात राजकारण तर होणारच. 

झालं तसंच, जेकब लाईन ते वडाळा असा तज्ज्ञ लोकांच्या टीमचा सल्ला डावलून यातला चेंबूर ते वडाळा हा मार्ग आधी बनवण्यात आला. त्यात वडाळा, भक्ती पार्क, मैसूर कॉलनी, भारत पेट्रिलियम, फर्टिलायझर टाऊनशिप, व्हिएनपी आणि आरसी मार्ग जंक्शन, चेंबूर असा मार्ग बांधून पूर्ण करण्यात आला. हा ८.९ किमीचा मार्ग वेड्यावाकड्या यु आकाराचा आहे. 

यात स्टार्टींग ते एंडिंग पॉईंट असलेले दोनही ठिकाण हार्बर लाइन्सला कनेक्ट आहेत. एका ठिकाणाहून लोकल ट्रेनने जात येते. तर बाकीचे स्टेशन कोणत्याही गर्दीच्या ठिकाणाशी कनेक्ट नाहीयेत. तर या रेल्वेचं अंतर केवळ ९ किमी असल्यामुळे सामान्यपणे बस किंवा लोकलने ट्रॅव्हल करता येतं. 

या मार्गावर प्रवास करणारे बहुतांश जण कुर्ल्यात रूट चेंज करून आलेले असतात म्हणजेच सेंट्रल किंवा नवी मुंबईमधून त्यांनी ट्रेन चेंज केलेली असते. त्यामुळे त्यांना लोकल स्टेशनवर उतरून बस पकडावी लागेल. त्यानंतर बसने मोनोरेल स्टेशनवर जावं लागेल. नंतर शेवटच्या मोनोरेल स्टेशनवर उतरून पुन्हा तिथून बस किंवा टॅक्सी पकडून आपल्या कामाच्या ठिकाणी जावं लागेल.

यात प्रवाशाला तीन वेळ चढावं आणि उतरावं लागेल. तसेच तीन वेळ भाडं द्यावं लागेल.

हे सगळं केवळ ९ किमीच्या रस्त्यामध्ये करावं लागत होतं. यातून प्रवासाचा वेळ आणि थकवा दोन्ही वाढत होते. तर बेस्ट किंवा लोकलच्या माध्यमातून अगदी थोड्या वेळात या मार्गावर प्रवास करणं सोप्पं होतं. त्यामुळे प्रवाशांनी या मोनोरेलकडे पाठ फिरवली. दररोज ३ लाख प्रवाशांच्या अंदाज असतांना केवळ १९ हजार लोकच यावरून प्रवास करायला लागले आणि कार्यक्रम सपशेल गंडला.

पण त्याजागी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मार्ग निवडला असता तर अशी परिस्थिती झाली नसती.

मार्गाची डिजाईन करणाऱ्या तज्ज्ञांनी संपूर्ण मार्ग एकाच वेळी बांधून पूर्ण करण्याचा प्लॅन बनवला होता. पण काही कारणास्तव मार्गाचं काम दोन टप्प्यात पूर्ण करायचं झाल्यात आधी जेकब सर्कल ते वडाळा हा मार्ग सुरु करावा अशी त्यांची प्लॅनिंग होती.

हा मार्ग पहिल्यांदा सुरु करण्यात आला असता तर यात प्रवाशांची संख्या घटली नसती. कारण यादरम्यान लोवर परळ, दादर ईस्ट, जीटीबी नगर अशी गर्दीची ठिकाण होती. तसेच इथल्या लोकांना प्रवासासाठी व्यवस्था मिळाली असती आणि प्रवासी संख्या अंदाजानुसार लाखोंच्या संख्येत असती. त्यामुळे महसूल मिळाला असता आणि समोरचा मार्ग बांधतांना अडचण आली नसती.

पण चुकीच्या मार्गाला आधी सुरु केल्यामुळे सर्व महसूल बुडाला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या प्रोजेक्टमधून आपले हात मागे घ्यायला सुरुवात केली.

तब्बल ३ हजार कोटी रुपये गुंतवून सुरु झालेल्या या मार्गावर मोजक्याच मोनोरेल उतरवण्यात आल्या. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तिकिटाचे दर कमी करण्यात आले. महसूल मिळाला नाही उलट दररोज लाखो रुपयांचं नुकसानच होत आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मार्गाचं बांधकाम ठप्प झालंय. गुंतवणुकीअभावी दुसरा मार्ग बांधण्याच्या आजवरच्या एकूण १६ डेडलाईन मिस झालेल्या आहेत.

मध्यंतरीच्या काळात प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेकदा प्रयत्न सुरु झाले मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही. भविष्यात या प्रोजेक्टसाठी काय महत्वपूर्ण होतेय ते काळच ठरवेल मात्र चुकीचा मार्ग निवडल्यामुळे  मोनोरेलचा इतका महत्वाचा प्रकल्प फेल झाला.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.