पुण्याच्या मेट्रोत ढोल वाजवले पण हा फक्त चेष्टेचा नाही, तर मोठ्या अपयशाचा विषय आहे

पुण्यात कायम काहीतरी खळबळ होत असते, आता पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रो स्टेशनवर आणि चालत्या मेट्रोत ढोल वादनाचा कार्यक्रम झाला. सगळ्या पुण्यातच गणेशोत्सवामुळं ढोल ताशा वादनाचा उत्साह आहे, पण हा उत्साह थेट मेट्रोत दिसला, म्हणजे विषय खोल ए. पोरा-पोरींनी मेट्रोत ढोल वाजवला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यावरनं नॉन पुणेकर भिडूंनी पुणेकर भिडूची मापं काढली. त्यांचं म्हणणं होतं मेट्रो लोकांना प्रवास करण्यासाठी बनवलेली असताना तिथं ढोल कशाला वाजवायचा ?

आता पुणे मेट्रोत असा कार्यक्रम काही पहिल्यांदाच होत नाहीये, याआधी मेट्रोमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळा झाला होता. स्वतः मेट्रो प्रशासनानंच मेहंदी स्पर्धा घेतली होती, एकतर आधीच पुण्यात मेट्रो सुरू झाली, तेव्हा लोकांनी ट्रीपला गेल्यासारखा मेट्रो प्रवास केला होता. त्यामुळं पुण्याची मेट्रो हा तिकडच्या मिसळीसारखा कायम चर्चेचा विषय ठरलाय.

पण मस्करीचा विषय सोडला तर, मेट्रोत असे कार्यक्रम का घ्यावे लागतात..?

पुण्यात मेट्रो सुरू झाली, ती ६ मार्च २०२२ ला. त्याची चर्चा तशी २००६ पासूनच सुरू होती. पण प्रत्यक्ष काम २०१६ मध्ये सुरू झालं आणि पाच वर्षात मेट्रो दोन मार्गांवर का होईना, पण धावायला लागली. त्यानंतर सुरुवातीचे काही महिने गेले आणि जून २०२२ मध्ये पुणे मेट्रोनं सेलिब्रेशन ऑन व्हील्स या नावाची एक स्कीम आणली.

ही ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ स्कीम नेमकी काय आहे..?

आता समजा तुम्हाला कायतर हटके सेलिब्रेशन करायचंय आणि मेट्रोत करावं वाटलं, तर तशी संधी मेट्रोनं उपलब्ध करुन दिली. तुम्ही मेट्रोचे जास्तीत जास्त ३ कोच बुक करु शकता आणि त्यात लग्न पण करु शकता. यात जास्तीत जास्त २०० पाहुण्यांना इन्व्हाईट करता येतं आणि खर्च ५००० ते १०००० येतो. याच स्कीममुळं पुण्याच्या मेट्रोमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होतात. मग ते बर्थडे असतील किंवा पुस्तक प्रकाशन.

पुण्यात ही स्कीम का आणावी लागली..?

या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी उत्पन्नाची आकडेवारी पाहावी लागेल. पुणे मेट्रोचे फक्त २ टप्पे (वनाझ ते गरवारे कॉलेज आणि पिंपरी ते फुगेवाडी) सुरू झाले आहेत. मार्च २०२२ मध्ये मेट्रो धावायला लागली आणि पहिल्याच महिन्यात ५ लाख १९ हजार पुणेकरांनी मेट्रोनं प्रवास केला. यामुळं मेट्रोला ७६ लाख ४३ हजार ५०० रुपयांचं भरघोस उत्पन्न मिळालं होतं.

त्यानंतर मात्र हा आकडा घसरला…

एप्रिल महिन्यात २ लाख २३ हजार प्रवाशांनी मेट्रोनं प्रवास केला, तर मे महिन्यात १ लाख ८८ हजार आणि जूनच्या पहिल्या तीन आठवड्यात ८७ हजार प्रवाशांनी प्रवासासाठी मेट्रोचा वापर केला. पहिल्या महिन्यात ५ लाखाहून अधिक प्रवासी असणाऱ्या मेट्रोला पुढचे ५ लाख प्रवासी मिळवण्यासाठी ३ महिने लागले होते. या आकडेवारीवरुनच आपल्याला लक्षात येतं की, ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ सारख्या उपक्रमांची गरज का आहे ते.

आता दुसरा मुद्दा, म्हणजे हे असे कार्यक्रम फक्त पुण्यातच होतात का? तर नाही.

राजस्थान मेट्रोनं एका कोचचं ५ हजार भाडं या हिशोबानं ४ कोच समारंभांसाठी भाड्यानं द्यायची स्कीम फार आधीच आणली आहे. गजबजलेल्या नोयडा मेट्रोमध्येही फेब्रुवारी २०२० पासूनच ही स्कीम सुरु आहे. तिकडे चालत्या मेट्रोत एक कोच घेतला तरी तासाला ८ हजार रुपये आणि डेकोरेशन हवं असलं, तर वरती २ हजार.

फक्त महाराष्ट्राबाहेरच नाही तर, २०२० मध्ये नागपूर मेट्रोनंही तासाला ३ हजार या दरानं मेट्रोचे कोच समारंभासाठी भाड्यानं द्यायला सुरुवात केली होती.

मोठ्या शहरांमधल्या मेट्रोला समारंभासाठी मेट्रो भाड्यानं देण्याची योजना का आणावी लागत असेल..?

तर याचं कारण सापडतं, मेट्रोच्या उत्पन्नात. मेट्रो बांधण्यासाठी भारतभरात मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. २०२२-२३ या अर्थिक वर्षासाठी १९ हजार १३० कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारनं बजेटमध्ये केली आहे. राज्य सरकारच्या भागीदारीमुळं या प्रकल्पांना याहीपेक्षा जास्त खर्च येतो.

जर २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे आकडे पाहिले, तर चेन्नई मेट्रोला ७१४ कोटी, बँगलोर मेट्रोला ४९८ कोटी, मुंबई मेट्रोला २३६ कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागत होतं. त्यावर्षी ६ हजार ४६२ कोटी कमवूनही दिल्ली मेट्रोला ७ टक्के नुकसान सोसावं लागलं होतं.

त्यानंतर लॉकडाऊनमुळे या तोट्याच्या आकड्यांमध्ये आणखीनच वाढ झाली. जवळपास ८ महिने ठिकठिकाणची मेट्रो बंद होती. सुरु झाल्यावरही निर्बंधांमुळे मेट्रो पूर्ण क्षमतेनं सुरु करता आली नाही.

केंद्रीय मंत्रालयानं जुलै २०२२ मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, २०१८ मध्ये ६४६२ कोटींचं उत्पन्न मिळवणाऱ्या दिल्ली मेट्रोला २०१९-२० मध्ये फक्त ३३८९.१३ कोटी मिळाले होते. २०२०-२१ मध्ये हा आकडा ६३२.४६ कोटी होता, तर २०२१-२२ मध्ये १५५७.९१ कोटी. सध्या सुरू असलेल्या २०२२ च्या सहा महिन्यात दिल्ली मेट्रोला ६८२.९३ कोटींचंच उत्पन्न मिळालं आहे.

सेलिब्रेशन ऑन व्हील्ससारखा कार्यक्रम घेणाऱ्या नागपूर मेट्रोनं २०१९-२० मध्ये १.४९ कोटींचं उत्पन्न मिळवलं, २०२०-२१ मध्ये १.५२ तर २०२१-२२ मध्ये ४.९४ कोटींचं उत्पन्न मिळवलं. यावर्षीच्या ६ महिन्यात उत्पन्नाचा आकडा २.८९ कोटीपर्यंत पोहोचला आहे. 

या आकडेवारीवरुन लक्षात येतं की भारतातल्या बहुतांश मेट्रो अजूनही तोट्यात सुरु आहेत. मोठ्या प्रमाणावर बांधणीसाठी खर्च येतोय मात्र त्याच्या जवळपासही उत्पन्न मिळत नाही.

फक्त पुणे मेट्रोचं उदाहरण पाहायचं झालं, तर जास्तीत जास्त तिकीट २० रुपये आहे, म्हणजे एकावेळी २०० माणसांनी प्रवास केला तर मेट्रोला ४००० रुपये मिळतात. तेच २०० लोकांसाठी कोच भाड्यानं दिले, तर कमाईचा आकडा तेवढ्याच वेळेत १० हजार रुपये असतो. सोबतच लोकप्रियता मिळते ती वेगळीच. 

त्यामुळं प्रवासी संख्येवर भर देण्यासाठी आणि तोटा भरुन काढण्यासाठी चालत्या मेट्रोत ढोलवादन, मेहंदी स्पर्धा अशा गोष्टी कराव्या लागतात, मग ते पुणे असो की नोएडा. त्यामुळं भिडू लोक मापं काढणं सोपंय, पण जोवर आपली जनता मेट्रोतून प्रवास करत नाही, तोवर मेट्रोचं गणित जुळणं तरी अवघडच आहे.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.