२ भारतीय सैनिकांच्या भीतीमुळे पाकिस्तानी सैनिक रणगाड्यांना आग लावून पळाले होते

भारत आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच दोन्ही देशांमध्ये युद्ध होत आलेले आहेत. १९४७ मध्ये पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरवर आक्रमण केलं होतं. त्या आक्रमणात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैनिक आणि कबाईली दहशतवाद्यांना मागे पळवून लावलं होतं.

त्यानंतर १९६२ मध्ये भारत आणि चीनचं युद्ध झालं. त्या युद्धात भारतीय सैन्याची मोठी हानी झाली होती. त्यासोबतच भारतीय सैन्याकडे असलेला दारुगोळा सुद्धा संपलेला होता. तेव्हा पाकिस्तानाने नेमक्या त्याच संधीचा फायदा उठवण्यासाठी ६ सप्टेंबर १९६५ रोजी भारतावर आक्रमण केलं.

पाकिस्तानने सगळ्या तयारीनिशी भारतावर आक्रमण केलं. मात्र भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला चांगलीच धूळ चारली होती.

६ सप्टेंबर रोजी पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाची सुरुवात केली. पाकिस्तानी सैनिकांच्या आक्रमणाला भारतीय सैनिकांनी सुद्धा प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. परंतु पाकिस्तानी सैनिकांकडे जास्त आधुनिक हत्यार असल्यामुळे पाकिस्तानी सैनिकांचं पारडं जड मानलं जातं  होतं. भारतीय सैनिक मागे सरकायला लागले होते मात्र त्यादरम्यान असा एक प्रसंग घडला ज्यामुळे पाकिस्तानी सैनिकांना थेट आपल्या टँक्सना आग लावून पळावं लागलं होतं.

तर ६ सप्टेंबरला पाकिस्तानी सैनिकांनी अत्याधुनिक पॅटन टँकच्या आधारे पंजाब राज्याच्या तरणतारण जिल्ह्यातील खेमकरण जवळ भारतीय सीमेवर आक्रमण केलं. पाकिस्तानी सैनिकांनी केलेलं आक्रमण रोखण्यासाठी भारतीय सैनिकांनी सुद्धा आपल्या जुन्या टॅंकच्या आधारे त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली.

पाकिस्तानने सैनिक पूर्ण तयारीनिशी आले होते परंतु भारतीय सैनिक तेवढ्याच ताकदीने पाकिस्तानी सैनिकांवर तोफेचा मारा करत होते. भारतीय सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या अब्दुल हमीद यांनी ६ सप्टेंबरला सुरु झालेलं युद्ध १० सप्टेंबर पर्यंत शर्थीने लढवलं. 

मात्र १० सप्टेंबरला युद्धादरम्यान अब्दुल हमीद शहिद झाले. अब्दुल हमीद यांच्या मृत्यूनंतर भारतीय सैनिकांचं मनोबल तुटलं आणि पाकिस्तानी सैनिक आणखी चेकाळले. अब्दुल हमीदच्या मृत्यूमुळे भारतीय सैनिक हरले होते. त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांनी आपला दारुगोळा आवरला आणि रात्रीच्या अंधारात अमृतसर कडे यायला सुरुवात केली. 

त्यात पाकिस्तानी ब्रिगेडचे कमांडर ए. आर. शमीम आणि फर्स्ट आर्म डिव्हिजन मेजर जनरल नासिर अहमद खान हे आपल्या अमेरिकन जीपमध्ये बसून पाकिस्तानी तुकडीचं नेतृत्व करत होते. तर त्यांच्या जीपच्या मागे पाकिस्तानचे पॅटन टँक्स आणि सैनिक येत होते. 

परंतु भारतीय सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या अब्दुल हमीद यांना या घटनेची पूर्वकल्पना होतीच. त्यामुळे अब्दुल हमीद यांनी पूर्वीच भारतीय सैन्यातील दोन सैनिकांना युद्धाच्या जागेपासून आतल्या मार्गावर तैनात करुन ठेवलं होतं. त्या दोन सैनिकांचं नाव होतं मुहम्मद शफिक आणि मुहम्मद नौशाद.

मुहम्मद शफिक आणि मुहम्मद नौशाद हे दोघेही जिगरी दोस्त होते. दोघेही एकाच वेळी आर्मीत भरती झाले होते. अब्दुल हमीद यांच्या आदेशाप्रमाणे दोघेही आपल्या निश्चित जागेवर मोर्चा सांभाळून बसले होते. 

अमृतसरच्या दिशेने चाललेले असतांना पाकिस्तानचे सैनिक दोघांच्या रेंज मध्ये आले. 

पाकिस्तानी सैनिक आपल्या जवळ आले हे कळल्याबरोबर, दोन्ही मित्रांनी आपल्या एलएमजीने पाकिस्तानी सैनिकांच्या पुढच्या जीपवर फायरिंग करायला सुरुवात केली. रात्रीच्या अंधारात दोघांनी अचानक केलेल्या फायरिंगमुळे भारतीय सैनिक कुठून फायरिंग करत आहेत हे पाकिस्तानी सैनिकांना कळलेच नाही.

या हल्ल्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी इकडे तिकडे पळायला सुरुवात केली. काही शेतात शिरले तर काहींनी पाण्यात उड्या मारल्या. पाकिस्तानी सैनिक पळायला लागले मात्र त्यांचं नेतृत्व करणाऱ्या मेजर जनरल नासिर अहमद खान आणि कमांडर ए. आर. शमीम या दोघांना कुठेच जाता आलं नाही. त्या दोघांचा फायरिंगमध्येच मृत्यू झाला. 

त्यानंतर लवकरच शफिक आणि मुहम्मद दोघांनी आपली फायरिंग थांबवली आणि पाकिस्तानी सैनिकांच्या दोन्ही जीप आपल्या ताब्यात घेतल्या. भारतीय सैनिकांनी जीप ताब्यात घेतल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांचे प्रमुख मारले गेले आहेत याची कल्पना त्यांच्या सैनिकांना आली. त्यानंतर त्यांचे धाबे दणाणले आणि उरलेले  सैनिक सुद्धा जमेल तिकडे पळायला लागले. 

 परंतु युद्ध सोडून पळतांना रणगाडे तसेच सोडले तर भारतीय सैनिक रणगाडे आपल्या ताब्यात घेतील आणि परत आपल्यावरच हल्ला करतील. या भीतीपोटी पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्या सगळ्या टँक्सला आग लावून दिली.    

अशा प्रकारे मुहम्मद शफिक आणि मुहम्मद नौशाद या दोन सैनिकांच्या पराक्रमामुळे पाकिस्तानी सैनिकांची बाजी भारतीय सैनिकांनी मारली आणि पाकिस्तानी सैनिकांना अमृतसरकडे येण्यापासून थांबवलं. दोघांच्या पराक्रमामुळे अमृतसर शहर पाकिस्तनच्या ताब्यात जाण्यापासून वाचले. त्यामुळे दोन्ही सैनिकांच्या पराक्रमाची दाखल घेऊन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दोन्ही सैनिकांचा सत्कार केला. 

हे ही वाच भिडू  

Leave A Reply

Your email address will not be published.