रुपया कमजोर होत नाहीये तर डॉलर वधारतोय, या अर्थमंत्र्यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ?

“रुपयाची घसरण होत नाहीये तर डॉलर सतत मजबूत होत आहे… इतर सर्व चलनांची देखील डॉलरच्या तुलनेत अशीच स्तिथी आहे “

असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना वक्तव्य केलं आणि त्यांच्या या वक्तव्याची देशभर जोरदार चर्चा झाली. अर्थमंत्र्यांना चौफेर ट्रोल केलं जातंय. कोण म्हणतेय अर्थमंत्र्यांचं हे वक्तव्य म्हणजे पोरगा मोठा होत नाही तर कपडे लहान होत असल्यासारखं आहे तर कोण म्हणतंय भारतात बेरोजगारी नाही वाढलेत तर बेरोजगार वाढल्यागतच हे वक्तव्य आहे.

त्यात पुढं जाऊन अर्थमंत्री म्हणाले आहेत की यातही भारतीय रुपयाने इतर कोणत्याही उदयोन्मुख बाजारातील चलनांपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. 

पण आता अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका करताना असे क्रिएटिव्ह रिप्लाय जरी चांगले वाटत असले तरी हे काय अर्थशास्त्राचे जाणकार असणाऱ्यांचं म्हणणं नाहीये आणि त्यामुळे अर्थमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय आणि  अर्थशास्त्रीय भाषेत याचा काय सेन्स होतो का हेच बघूया.

तर अर्थमंत्री जे म्हणतायेत त्याचा अजून सोपा करून घ्यायचा ठरवलं तर या वक्तव्याचा अर्थ होतो आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची किंमत जास्त वाढत आणि रुपयाला मात्र तेवढी मागणी नाहीये त्यामुळे दोघांमधील अंतर वाढत आहे आणि यामुळेच एका डॉलरची किंमत आज ८२ रुपये ३२ पैसे झालेत.

अजून पण काय वेगळा सेन्स झाला नसेल तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF साठी लिहलेल्या लेखात IMFच्या डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर गीता गोपीनाथन यांनी काय म्हटलंय ते बघूया. तर विषय असा आहे की अमेरिकेत गेल्या काही महिन्यांपासून महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेनं म्हणजेच फेडरल बँकेनं व्याज दरात वाढ केली आहे. जेव्हा व्याजदरात वाढ केली जाते तेव्हा चलनाचा बाजारातील पुरवठा कमी होतो.

हेच सध्या डॉलरच्या बाबतीत झालं आहे. यामुळे डॉलरची मागणी वाढलेय किंवा तितकीच राहत आहे मात्र त्याचा बाजारातील पुरवठा मात्र कमी होत आहे.  

डॉलरची मागणी वाढण्याचं अजून एक कारण समोर येत आहे ते म्हणजे रशिया-युक्रेन युद्ध. युक्रेनवरील रशियन आक्रमणामुळे अचानक वाढलेली जिओ-पोलिटिकल म्हणजेच भू-राजकीय अनिश्चितता वाढली आहे. आणि अशावेळी ”FIGHT FOR QUALITY” हा सिद्धांत ऍक्टिव्हेट होतो.

यामध्ये होतं काय तर समजा रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अधिकच घनघोर युद्ध झालं आणि त्यात इतरही देश सामील झाल्याने एका महायुद्धाची परिस्तिथी निर्माण झाली तर अतुलनीय लष्करी सामर्थ्याने अमेरिका या युद्धात क्लियर विनर असं शकतोय असा अंदाज बांधला जातोय. त्याचवेळी अमेरिकेवर असणारा हा विश्वास अमेरिकेच्या चलनावर म्हणजेच डॉलरवर देखील दाखवला जात आहे.

अशामुळे डॉलर आपल्याकडे राखून ठेवण्यास लोकांचा आणि आर्थिक संस्थांचा कल आहे. यामुळे देखील डॉलरची डीमांड वाढली आहे.

त्यामुळे वधरणाऱ्या डॉलरच्या पुढे इतर जगभरातील सर्वच करन्सी ढासळत आहेत. यामध्ये युरोपियन युनियनच्या युरोचा देखील समावेश आहे. त्यानुसार युरो त्याच्या २० वर्षातील डॉलरच्या तुलनेत सगळ्यात खालच्या पातळीवर गेला आहे. युरो जेव्हा पहिल्यांदा बाजरात आणला गेला होता तेव्हा १ युरोची किंमत १.१८ डॉलर इतकी होती ती नंतर डॉलरपेक्षा जास्तच राहत हायेस्ट एका युरोसाठी १.६० डॉलरपर्यंत गेली होती. मात्र आता एक युरोची किंमत एका डॉलरपेक्षासुद्धा कमी झाली आहे.

सध्या एका युरोची किंमत ९७ सेन्ट्स म्हणजे ०.९७ डॉलर झाली आहे. 

त्यामुळे जगभरातील अर्थतज्ञांकडून डॉलरची किंमत वाढणं हेच इतर करंसीच्या पाडण्यामागचं महत्वाचं कारण असल्याचं सांगण्यात सुरवात केली आहे आणि यामुळेच भारताचा रुपयाही ढासळला आहे आणि तो एका डॉलरच्या मागे ८२ रुपयांच्या पलीकडे गेला आहे. मात्र इतर करन्सीच्या तुलनेत भारताच्या करंसीची कमी पडझड झाली आहे. डॉलर रुपयाच्या तुलनेत ७.७% नी वधारला आहे.

चीनच्या ५% च्या अपवादच सोडला तर इतर महत्वाच्या करंसी भारतापेक्षा जास्तच घसरल्याचा IMF चा अहवाल सांगतो.

मात्र रुपयाच्या तुलनेनं कमी घसरणं यासाठी भारताने मोठी किंमतही चुकवली आहे. जागतिक बाजारात अमेरिकन डॉलरच्या पुढे आपल्या करंन्सीची पडझड थांबवण्यासाठी  जगभरातील रिझर्व बँका त्यांच्या फॉरेक्स रिझर्व्हमधून मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री करत आहेत. यामुळे डॉलरचा बाजारामधील साठा  वाढून स्वतःच्या चलनांच्या तुलनेत त्याची किंमत कमी होईल असं लॉजिक असतं.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं देखील आपल्या परकीय चलनाच्या साठ्यातून मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री केली आहे.

भारताने जवळपास त्यासाठी ८० बिलियन डॉलरचं परकीय चलन आंतराराष्ट्रीय बाजरात विकलं आहे. ते जवळपास भारताच्या एकूण परकीय गंगाजळीच्या १३% आहे. तर रुपया पडण्याचं संपूर्ण अर्थकारण असं आहे आणि ह्याच फॅक्ट्सच्या जोरावर निर्मला सीतारमन यांनी हे वक्तव्य केलं असावं.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.