आजही धोनीला तो एकच क्षण पुन्हा जगायचाय, तेही फक्त ‘वंदे मातरम’मुळं

तारीख २ एप्रिल २०११. वेळ संध्याकाळची. भारतातल्या प्रत्येक घरात उत्सुकता, काळजी आणि आनंद अशा सगळ्या मिक्स भावना होत्या. २००३ मध्ये थोडक्यात हुकलेलं, २००७ मध्ये बाजार उठलेलं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर होतं. सगळं जग मैदानात डोळे लावून बसलं होतं. मैदानात बॅटिंग करत होती भारताची जोडी. युवराज सिंग आणि महेंद्रसिंह धोनी…

महेंद्रसिंह धोनीचं नुसतं नाव घेतलं, तरी आपल्या डोळ्यांसमोरुन सगळं स्लाईड-शो जातो. खांद्यावर रुळणारे लांब केस घेऊन, एजव्हा धोनी पहिल्यांदा क्रिकेटच्या मैदानात उतरला, तेव्हा लोकांनी त्याची मापं काढली होती. पुढं जाऊन मात्र याच धोनीनं पाकिस्तान आणि श्रीलंकेचा बाजार उठवला. पुढं जेव्हा रथी-महारथींनी टी-२० वर्ल्डकप न खेळायचं ठरवलं, तेव्हा धोनीनं टीमचं नेतृत्व केलं आणि वनडे वर्ल्डकपमुळं खचलेल्या भारताला टी२० वर्ल्डकप जिंकून दिला. सगळा देश पुन्हा एकदा क्रिकेटच्या उत्साहात न्हाऊन निघाला.

धोनीच्या नेतृत्वात भारतानं टेस्ट क्रिकेटमध्येही मोठी झेप घेतली. अनेक नवे खेळाडू तयार झाले. अनेक खमक्या खेळाडूंना सातत्यानं संधीही मिळाली. थोडक्यात काय, तर धोनीनं भारतीय क्रिकेटला अच्छे दिन आणले. पण फक्त खेळाडू म्हणूनच नाय, तर माणूस म्हणूनही धोनी लय जणांचा आवडता. त्याचा शांत स्वभाव, कितीही हार्ड सिच्युएशन आली तरी डोक्यावर बर्फ ठेवणं आणि जग जसा विचारही करु शकत नाही, तसे डेरिंगबाज निर्णय घेणं ही तर धोनीची खासियत.

रिटायर झाल्यावर अनेक खेळाडू कोच बनतात, काही जाहिरातींमध्ये काम करतात, तर काहींच्या वेगळ्याच तऱ्हा सुरु होतात. धोनीला लहानपणापासून भारतीय सैन्याविषयी प्रचंड आवड. अगदी वेड म्हणता येईल इतकी आवड. लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल पद मिळवणाऱ्या धोनीनं पॅराट्रूपर्स घेतात ते प्रशिक्षणही घेतलं आणि अभिमानानं पॅराशूटमधून उडीही मारुन दाखवली. आजही धोनीनं क्रिकेट पूर्णपणे थांबवलं की, तो लष्करात दाखल होईल अशा चर्चा होत असतातच. आता खरंच धोनी लष्करात किंवा सीमेवर जाणार का हे धोनी सोडून कुणालाच माहिती नाही.

कट टू २०११, वानखेडे स्टेडियम मुंबई

भारताला जिंकायला १५-२० रन्स हवे होते. धोनी-युवराज खेळत होते. वानखेडे स्टेडियम खचाखच भरलेलं होतं. पार नेते, अभिनेत्यांपासून सामान्य चाहतेही डोळ्यात प्राण आणून सामना बघत होते. साहजिकच प्रत्यक्ष मैदानावर असणाऱ्या कार्यकर्त्यांवर मजबूत प्रेशर होतं. तेवढ्यात मैदानात अचानक शांतता पसरली आणि ती शांतता भेदत.. सुरात शब्द उमटले.

वंदे मातरम…

पुढची काही मिनिटं मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यातून हा वंदे मातरमचा आवाज घुमला. धोनी एका मुलाखतीत सांगतो, ‘माझ्या अंगावर कधी शहारा येत नाही, मात्र त्या दिवशी तो आवाज ऐकून शहारा आला होता. मी माझ्या सगळ्या आयुष्यात ती काही मिनिटं कधीच विसरु शकत नाही. जर कधी मला संधी मिळाली की आयुष्यातला एखादा क्षण परत जगायला मिळेल. तर मी नक्कीच हा क्षण जगेल, इतका तो आवाज मला प्रभावित करतो.’

फक्त इमॅजिन करा, काही हजार लोकं एकावेळी, एका ठिकाणी जमलीयेत, भारताचा तिरंगा लहरतोय आणि सगळ्या स्टेडियममध्ये आवाज घुमतोय.. वंदे मातरम. धोनीच काय, आपणही तो क्षण हजार वेळा जगायला तयार असू…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.