या आधीही उत्तर भारतीय असणाऱ्या या नेत्यांनी राज ठाकरेंशी पंगा घेतला होता…पण

१ महिन्यापूर्वी महाराष्ट्रात आणि देशभरात ‘राज ठाकरे’ नावाचं वादळ आलं..आणि या वादळाने देशाच्या राजकारणाची दिशाच बदलली. मशिदीवरच्या भोंग्याचा अन हनुमान चालीसाचा वाद शांत झालाच नाही तोच नेत्यांचे अयोध्या दौरे गाजतायेत.    

उठसुठ सगळे राजकीय नेते अयोध्या दौरा करतायेत…मात्र त्याची सुरुवात करणाऱ्या राज ठाकरेंच्याच अयोध्या दौऱ्याला विरोध होतोय. हा विरोध करण्यात युपीमधील बीजेपीचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह आघाडीवर आहेत… उत्तर भारतीय असलेले ब्रिजभूषण शरण सिंह आणि राज ठाकरे यांच्यातील संघर्ष वाढतच चाललाय. 

पण उत्तर भारतीय नेत्यांमध्ये अन राज ठाकरेंमध्ये एवढ्या टोकाचा संघर्ष पहिल्यांदा घडत नाही…उत्तर भारतीय नेते अन राज ठाकरे यांच्यात कधी जमलंच नाही. जरा डोक्याला ताण देऊन आठवा ते नेते कोणते होते जे थेट राज ठाकरेंना याआधीही नडले…आम्ही तुम्हाला सांगतो…त्यातलं पहिलंच नाव म्हणजे  

१) लालू प्रसाद यादव 

लालूप्रसाद यादव आणि राज ठाकरे यांच्या संघर्षाची २ कारणं ठरलीत.

एक म्हणजे २००८ च्या ऑक्टोबर महिन्यात देशभरात रेल्वे भरतीची चाचणी परीक्षा घेण्यात आली. मुंबई केंद्रावर परीक्षा द्यायला आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यातच राज्यातल्या केंद्रांवर मराठी तरुणांना प्रवेश नाकारल्याचा, तिकीट न मिळाल्याचा आरोप मनसेनं केला. वादाची ठिणगी पडली आणि मनसे कार्यकर्त्यांनी परीक्षा केंद्रांमध्येच घुसून उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण केली. 

हे लोण सगळ्या महाराष्ट्रात पसरलं, वेगवेगळ्या ठिकाणी उत्तर भारतीय लोकांना मारहाण झाली. ठिकठिकाणी बसेसची तोडफोड झाली. राज्यातली परिस्थिती चिघळली आणि राज ठाकरेंना अटक झाली.

उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी मनसेवर बंदी घालण्याची मागणी केली. शिवाय राज ठाकरे हे “मानसिक रोगी” असल्याची टीकाही लालूंप्रसाद यादव यांनी केलेली. 

दुसरा वाद म्हणजे छठ पूजेचा…

२००८ च्या मे महिन्यात आरजेडीने बिहारचा खास सण असणारा छठ पूजा मुंबईत आयोजित केला होता. ज्याची तयारी तब्बल ७-८ महिने आधीपासूनच सुरु होती. मात्र याला मनसेनं जोरदार विरोध केला होता. बिहारींनी मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करू नये असं राज ठाकरेंची भूमिका होती.

पण त्यावर लालू प्रसाद यादव यांनी, राज ठाकरेंच्या विरोधाला झुगारून मी मुंबईत जाऊन छठ करणारच असा हट्ट धरला. मुंबईत परप्रांतीय जिथे तिथे छठ पूजा करू लागले. कारण छठ पूजा हे बिहारी अस्मितेचे प्रतीक होतं. राज ठाकरेंनी लालू प्रसाद यादव यांना आव्हान दिलं कि,

“त्या लालूला म्हणावं, हिंमत असल तर ये अन माझ्या घरासमोर छठपूजा करून दाखव. तो परत जाणार नाही”.. इतकंच नाही तर राज ठाकरेंनी लालूंना उद्देशून ‘साल्या’ अशी शिवी देखील दिली होती. 

शेवटी लालूंनी माघार घेतली अन त्यांनी मुंबईतल्या छठ पूजेला हजेरी लावली नाही.

२) संजय निरुपम 

संजय निरुपम आणि राज ठाकरेंमध्ये देखील वादाचं कारण ही छठ पूजाच ठरली होती. तसं तर १९९३ पासूनच मुंबईच्या जुहू बीचवर या पूजेचं आयोजन केलं जायचं मात्र मुंबईत छठपूजा फेमस केली ते तत्कालीन शिवसेना नेते संजय निरुपम यांनी.

संजय निरुपम यांनी जुहूच्या किनाऱ्यावर ‘बिहारी फ्रंट’ नावाचा एक मंच तयार केला. या मंचाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन, मनोज तिवारी, रवी किशन, तसेच मोठ-मोठे सेलिब्रेटी देखील या पूजेला येऊ लागले. अडचण अशी ठरली कि या पुजमुळे उत्तर भारतीयांचा प्रचंड संख्येने समुदाय जमत होता, त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता होती. बाळासाहेब ठाकरेंनी देखील त्या पूजेला विरोध केला.  

राज ठाकरे यांनी तर आधीच छठ पूजेविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली होती. त्या विरोधात संजय निरुपम यांनी दंड थोपटले. मात्र तरीही मनसेने त्या पूजेचं महत्व कमी केलं.

३) जया बच्चन 

सप्टेंबर २००८ मधलं प्रकरण आहे. जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार होत्या. आपला मुलगा अभिषेकच्या ‘द्रोणा’चा प्रोमो लाँच करण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात त्या म्हणाल्या, हम यूपी के लोग हैं, हिंदीमें बात करेंगे। महाराष्ट्र के लोग हम लोगों को माफ करें। त्यावर भडकलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरच्या जाहिरातींमधील अमिताभच्या फोटोना काळे फासले.

त्यावेळी राज ठाकरेंनी, जया बच्चन यांना हिंदीतच बोलायचे असेल तर त्यांनी यूपीत जावं, नाहीतर पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये हिंदी बोलून त्यांचे हिंदीवरील प्रेम दाखवावं असं सुनावलं. 

जया बच्चन यांना माध्यमांनी राज ठाकरेंच्या निषेधाबाबत विचारले असता त्यावर त्या म्हणाल्या की, कोन राज ठाकरे? मैं एक ही ठाकरे को जानती हूँ वो हैं बाळासाहब ठाकरे…त्यावर “गुड्डी बुड्ढी झाली, तरी अक्कल येत नाही! असा टोलाही राज ठाकरेंनी जया बच्चनला लगावला होता.  

४) मायावती 

२०११ चं वर्ष होतं. मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज ठाकरे आणि मायावती यांच्यात शाब्दिक युद्ध पेटलेलं. मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांच्या विरोधात राज ठाकरेंनी काही वक्तव्ये केली होती त्यावर मायावतींनी राज ठाकरेंना कठोर शब्दात सुनावलं. 

राज ठाकरे ज्या प्रकारे उत्तर भारतीयांबद्दल जी विधानं करतात त्यावरून त्यांच्यात आणि दहशतवाद्यांमध्ये काय फरक आहे ? असा सवाल त्यांनी केलेला. 

“राज ठाकरे हे बेताल वक्तव्य करून देशाच्या एकता आणि अखंडतेला धक्का लावतायेत. त्यांच्यामुळे दहशतवाद्यांना प्रोत्साहन मिळू शकते.  ठाकरेंनी हे जाणून घेतले पाहिजे की मुंबई आज भारताची आर्थिक राजधानी असेल तर ती केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लाखो कामगारांमुळे आहे”. असंही मायावतींनी म्हंटलं होतं…

५) अबू आझमी 

अबू आझमी आणि राज ठाकरेंमधला संघर्ष सुरु होण्याला अबू आझमी यांचा शपथविधी कारणीभूत ठरला होता. नोव्हेंबर २००९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या नवीन सदस्यांचा शपथविधी सुरू होता. अबू आझमी हिंदीतून शपथ घेत होते, तितक्यात मनसेच्या आमदारांनी ज्यात राम कदम यांचाही समावेश होता त्यांनी अबू आझमी यांना चापट मारली.

मुंबईत राहून, निवडून येऊन हिंदीत शपथ घेणं हे मनसेच्या मते मराठी भाषेचा अपमान होता. 

मला मराठी बोलता येत नाही, त्यामुळे मी हिंदीतून शपथ घेतली असं अबू आझमी यांचं म्हणणं होतं. पण महाराष्ट्रात राहून ४ ओळीही मराठीत बोलता येऊ नये का म्हणून मनसेने भर विधानसभेतच हा प्रकार केला होता.

त्यानंतर सप्टेंबर २०१२ मध्ये राज ठाकरेंनी अबू आझमी यांच्यावर अशी टीका केलेली कि त्यांच्या भिवंडी या मतदारसंघात लाखो बांगलादेशी आणि पाकिस्तानी मतदार आहेत, ज्यांच्या जिवावर अबू आझमी दरवेळेस निवडून येतात.

त्यावर आझमींनी राज ठाकरेंना आव्हान दिलेलं कि, एक लाख जरी बांगलादेशी अन पाकिस्तानी मतदार शोधून दाखवलेत तर मी तुम्हाला २ कोटी देईन आणि कायमचं राजकारण सोडून देईन. पण जर का राज ठाकरे त्यांचा आरोप सिद्ध करू शकले नाही तर त्यांनी राजकारण सोडावं. 

असो या आरोपांचं पुढं काही झालं नाही..  पण या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष अगदी आजतागायत चालूच आहे. 

अलीकडेच अबू आझमी यांनी, लोकशाहीसाठी धोका निर्मांण झाला आहे त्यामुळे राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी केलीय. इतकंच नाही तर, “एका आमदाराची औकात नसलेले लोकं काहीही बोलतात, मनमानी करतात” अशी गंभीर टीकाही त्यांनी राज ठाकरेंवर केलीय.

तर हे होते ५ उत्तर भारतीय नेते ज्यांनी राज ठाकरेंना कायमच शिंगावर घेण्याचं धाडस दाखवलं…

आत्ता चालू असलेल्या ब्रिजभूषण शरण सिंह आणि राज ठाकरे यांच्यातील चढाओढीच्या राजकारणात काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय..“राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही,” अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतलीये. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये माघार कोण घेईल? राज ठाकरे खरंच उत्तर भारतीयांची माफी मागणार का ? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.