या खास गोष्टीमुळं टिपू सुलतानच्या पोलिलूरच्या लढाईचं पेंटिंग ६.२५ कोटींना विकलं गेलंय…

लहानपणी शाळेत चित्रकलेचा एक तास हमखास असायचा. आठवड्यातून किमान २ वेळा. मात्र आमच्यासाठी हा तास म्हणजे प्रॉपर धिंगामस्तीचा. कधीच त्याला सिरीयस घेतलं नाही.

कसंय चित्र म्हणजे ३ डोंगर, २ घरं , १ नदी  आणि ४ झाडं एवढंच काय ते आपल्याला यायचं. परीक्षेतही तसंच काढायचं आणि निघायचं. आता अचानक हे आठवायचं कारण म्हणजे गिल्ट. तेव्हा जर जरा सिरीयस होऊन काम केलं असतं तर आता करोडोंत खेळता आलं असतं. कसं?

असंच स्टोरी शोधत बसले होते. तेव्हा एक बातमी दिसली.

टिपू सुलतान पेंटिंगची ६.२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विक्री झाली”

हे बघून डोळेच विस्फारले गेले, आणि चक्रावून मी बातमी बघितली. तेव्हा मनात आला वरचा प्रश्न. पण काय आहे… कला सोपी नसती. शाळेतल्या एका तासाने काही होत नसत त्यासाठी पॅशन, डेडिकेशन आणि इच्छा असावी लागतेच. म्हणून म्हटलं हे चित्रकलेसाठी आपल्यामध्ये नाही मात्र यावर स्टोरी करणं हे काम आहे. तेच करूया… 

कारण कलेचा आश्रयदाता म्हणून टिपू सुलतानची ओळख आहे.

सुरुवात केली, शोधलं आणि आणलं तुमच्यासाठी की, असं काय आहे त्या चित्रात आणि कोणत्या घटनेची आहे ते चित्र.

हे चित्र आहे टिपू सुलतानच्या पोलिलूरच्या लढाईचं. म्हैसूरचा तत्कालीन सुलतान हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या ब्रिटिश सैन्याविरुद्ध ही लढाई केली होती. सप्टेंबर १७८० मध्ये  लढाई झाली होती. यात म्हैसूरच्या साम्राज्याच्या सैन्याने कर्नल विल्यम बेलीच्या नेतृत्वाखालील ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांचा नाश केला होता. 

आधुनिक काळातील कांचीपुरमच्या उत्तरेस सुमारे १५ कि.मी. अंतरावर असलेल्या मोठमोठ्या मोनोलिथ्सनी विखुरलेल्या दख्खन भूभागावर ही लढाई लढली गेली. याच लढाईचं चित्र ‘द बॅटल ऑफ पोलिलूर’ या नावाने सोथेबीच्या “आर्ट्स ऑफ द इस्लामिक वर्ल्ड अँड इंडिया” लिलावात ठेवण्यात आलं होतं.

३० मार्च २०२२ ला झालेल्या या लिलावात सुमारे ६,३०,००० पौंड म्हणजेच ६.२८ कोटी रुपयांना ते विकलं गेलं.

इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल यांनी १९ व्या शतकातील या ३२ फुटी चित्राचे वर्णन “वसाहतवादाच्या पराभवाचे सर्वात मोठे भारतीय चित्र” असे केले आहे. “त्या काळातील एक महान उत्कृष्ट नमुना” म्हणून याकडे बघितलं जातं. 

काय आहे या चित्रात नक्की?

WhatsApp Image 2022 04 26 at 9.21.30 PM 1

दुसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धाचा भाग म्हणून पोलिलूर युद्धाकडे बघितलं जातं. या चित्रात याच पोलिलूरच्या लढाईत म्हैसूर सैन्याचा विजय कसा झाला, याचे चित्रण केलेलं आहे. या चित्रात ब्रिटिश सैनिक म्हैसूर सैन्याच्या विरोधात संघर्ष करताना दिसत आहेत.

डॅलरिम्पल सोथेबीच्या संकेतस्थळावरील एका चिठ्ठीत याबद्दल लिहिलं आहे…

“भारतीय इतिहासाच्या महत्त्वपूर्ण वळणांपैकी एक असलेली घटना सादर करणारा पॅनोरमा आहे. त्या काळातील कलेमध्ये असलेल्या प्रतिस्पर्धीमधील विलक्षण चैतन्य आणि उर्जेचा चित्रकार यातून लोकांच्या भेटीला येतो”

समकालीन मुघल इतिहासकार गुलाम हुसेन खान यांच्या मते,

“हे चित्र दहा मोठ्या कागदांच्या पत्र्यांपेक्षा जास्त लांब आहे, सुमारे बत्तीस फूट (९७८.५ सेंमी.) लांबीचे आहे. यामध्ये लढाईतील एका क्षणाचं चित्रण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. ज्या क्षणी कंपनीच्या दारूगोळ्याच्या टम्ब्रिलचा स्फोट होतो, ब्रिटीश चौक तोडतो, तर टिपूचे घोडदळ डाव्या आणि उजव्या बाजूने पुढे सरकते, अगदी ‘रागावलेल्या समुद्राच्या लाटांसारखे’. 

WhatsApp Image 2022 04 26 at 9.30.50 PM

गुलाबी गालाचे आणि त्याऐवजी अशक्त दिसणारे कंपनीचे सैनिक अगदी भिलेल्या अवस्थेत म्हैसूरच्या  अटॅकच्या परिणामाची वाट पाहत आहेत, कारण शूर आणि जाडजूड मिशांचे म्हैसूरचे सैनिक  मारण्यासाठी जवळ आले होते. 

याच क्षणाला त्या चित्रात हुबेहूब टिपलं गेलं आहे. 

चित्राच्या डाव्या बाजूला हैदर आणि टिपू त्यांच्या विजयाकडे भव्यतेने आणि निर्विकारपणे पहात असल्याचे दाखविले आहे. तर टिपू लाल गुलाबाचा वास घेताना दिसतो जणू काही आपल्या फुलांची तपासणी करण्यासाठी बागेत आनंदाने तो फिरतोय. तर चित्राच्या दुसऱ्या टोकाला म्हैसूरचे सैन्य दोन्ही बाजूंनी कंपनीच्या सैन्यावर हल्ला करताना दाखवण्यात आले आहे.

WhatsApp Image 2022 04 26 at 9.30.45 PM

हे चित्र इतकं महत्त्वाचं का आहे?

या लढाईचा व्हिजुअल रेकॉर्ड म्हणून आणि त्याच्या विजयाची आठवण म्हणून टिपू सुलतानने १७८४ मध्ये सेरिंगापट्टम इथे नव्याने बांधलेल्या डारिया दौलत बागेसाठी एका मोठ्या भित्तीचित्राचा भाग म्हणून पोलिलूरच्या लढाईचे चित्र तयार केले होतं. 

या चित्रावरील काही दृश्ये शाई आणि गोचे रंगद्रव्यांचा (gouache pigments) वापर करून कागदावर कमीतकमी दोनदा रंगविली गेली होती.

१७९९ मध्ये टिपूच्या पराभवानंतर श्रीरंगपट्टणममध्ये असलेले कर्नल जॉन विल्यम फ्रीसे यांनी हे चित्र इंग्लंडमध्ये आणले होते. फ्रीसेच्या कुटुंबीयांनी १९७८ मध्ये ते एका खासगी कलेक्टरकडे विकण्यापूर्वी पिढ्यानपिढ्या सुपूर्द केले, ज्याने नंतर २०१० मध्ये ते विकले. 

मूळ पोलिलूर चित्राच्या तीन विद्यमान प्रती ज्ञात आहेत. त्यापैकी एक चित्र २०१० मध्ये सोथेबीच्या लिलावात ७,६९,२५० पौंडांना विकले गेले होते आणि कतारमधील इस्लामिक आर्ट संग्रहालयाने ते विकत घेतले होते. 

सोथेबीच्या “आर्ट्स ऑफ द इस्लामिक वर्ल्ड अँड इंडिया” लिलावात लिलाव करण्यात आलेले हे काम ब्रिटनमधील एका खासगी संग्रहाचा भाग असून, यापूर्वी लंडनमधील १९९० चे प्रदर्शन आणि एडिनबर्गमधील १९९९ च्या प्रदर्शनासह अनेक प्रदर्शनांमध्ये प्रदर्शित केले गेले होतं.

WhatsApp Image 2022 04 26 at 9.46.41 PM

अलिकडच्या वर्षांत टिपू सुलतान यांच्या इतर कोणत्या गोष्टींचा लिलाव करण्यात आला आहे?

नोव्हेंबर २०२१ मध्ये टिपू सुलतानच्या सिंहासनाला शोभित करणाऱ्या आठ वाघांपैकी एक वाघ १.५ दशलक्ष पौंड किंमतीला लिलावासाठी आला होता. मात्र ब्रिटनच्या डिजिटल, कल्चर, मीडिया अँड स्पोर्ट  विभागाने या वाघाचा ब्रिटिश इतिहासाशी जवळचा संबंध आहे आणि ब्रिटनमध्ये खरेदीदार मिळू शकेल, अशी आशा व्यक्त करत त्याची निर्यात तात्पुरती रोखली होती.

टिपू सुलतानच्या शस्त्रागारातील वस्तूंचा मार्च २०१९ मध्ये सुमारे १,०७,००० पौंडांना लिलाव करण्यात आला होता. त्यात चांदीने मढवलेली २० बोअरची फ्लिंटलॉक गन आणि ६०,००० पौंडांच्या मोबदल्यात हातोडीखाली गेलेली बायोनेट यांचा समावेश होता. याच वर्षी जूनमध्ये क्रिस्टीजने टिपू सुलतानचा “मॅजिक बॉक्स” ४,९५,००० डॉलरला विकला होता.

तर २०१५ मध्ये, टिपूच्या शस्त्रास्त्रांचा आणि चिलखतांचा संग्रह बोनहॅम्स इस्लामिक आणि भारतीय कला विक्रीमध्ये एकूण ६० लाख पौंडांपेक्षा जास्त किंमतीला विकला गेला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.