टॉयलेट सलमानच्या घरापाशी बांधायचं की शाहरुखच्या, या वादात आशिष शेलारांचं सॅण्डविच झालं

मुंबई. हे असं शहर आहे जिथं भव्य दिव्य अँटीलियाही थाटात उभं आहे आणि धारावीची अजस्त्र झोपडपट्टीही पसरली आहे. इथं लोकलच्या टायमिंगवर शहर धावतं, मोठमोठे धक्के पचवून पुन्हा उभंही राहतं. इथं भारतातला सर्वात श्रीमंत माणूसही राहतो आणि कदाचित सर्वात गरीबही. म्हणूनच या शहरात असे अनेक किस्से घडतात ते या दोन टोकांमधली दरी दाखवून देतात.

मुंबईतल्या राजकारणात मोठं प्रस्थ असणारे नेते म्हणजे आशिष शेलार. गिरणगावातल्या चाळीपासून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली. पालीहिलमधून ते दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले. मुंबई पालिकेत त्यांनी भापचे गटनेते म्हणूनही काम पाहिलं. त्यानंतर ते आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. शेलारांना सरकारच्या अखेरच्या सहा महिन्यांत कॅबिनेट मंत्रीपदही मिळाली.

शेलारांच्या पालीहिल मतदार संघांची विशेष ओळख म्हणजे या मतदारसंघात बॉलिवूडमधले सितारे आणि सामान्य नागरिक असे दोघेही राहतात. त्यामुळं आशिष शेलारांकडे वेगवेगळ्या तक्रारी कायम येत असतात. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवताना सेलिब्रेटींच्या कोड्यात टाकणाऱ्या प्रश्नांनाही आपल्याला तोंड द्यावं लागतं, असं शेलार सांगतात.

अशीच एक अजब तक्रार एकदा आशिष शेलारांकडे पोहोचली, ती तक्रार होती सलमान खानची.

सलमान खान राहतो ती गॅलेक्सी अपार्टमेंट याच मतदारसंघात आहे. सलमानचं घर फेमस आहे, ते सी व्ह्यूमुळं. त्याची ही बिल्डिंग अगदी समुद्रकिनाऱ्याला लागून आहे. आता सलमान खान एका कार्यक्रमात म्हणाला, मी माझ्या गॅलरीमधून बाहेर बघतो तेव्हा समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांमध्ये माणसं शौचास बसलेली असतात. ते दृश्य पाहणं फार त्रासदायक असतं.

आता साहजिकच आहे, त्या भागाचा नेता म्हणून तिथं सावर्जनिक शौचालय बांधण्याची जबाबदारी आशिष शेलारांकडे होती. त्यांनीही लगोलग पावलं उचलली आणि तिथं शौचालय बांधण्याचा आराखडा तयार केला. बांधकाम होईपर्यंत तात्पुरती सोय म्हणून त्यांनी तिथं इको फ्रेंडली टॉयलेट बांधलं. त्यातून ना दुर्गंधी येत होती, ना परिसरात अस्वच्छता पसरत होती.

मात्र सलमान खाननं यावर आक्षेप घेतला. त्याचं म्हणणं होतं शेलार माझ्याघरासमोर टॉयलेट का बांधतायत. हे टॉयलेट हटवा म्हणून सलमाननं शेलारांकडे आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली. शेलारांचं म्हणणं एकदम सिम्पल होतं. ‘माणसं तुमच्या घरासमोर शौचास बसतायत, त्यांच्यासाठी जवळ म्हणून तिथंच टॉयलेट बांधलं.’ मात्र सलमानला काही हा युक्तिवाद पटला नाही.

सलमानच्या एका कर्मचाऱ्यानं हे टॉयलेट हटवण्याची आणि याच रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला नेण्याची मागणी केली. आता तसं पाहायला गेलं तर हा तोडगा निघाला असता की! पण नाय, खरा विषय तर इथंच आहे.

ज्या रस्त्यावर सलमानची गॅलेक्सी अपार्टमेंट आहे, त्या रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला शाहरुख खानचा मन्नत बंगला आहे. त्यामुळं शेलारांची परिस्थिती इकडं आड, तिकडं विहीर अशी झाली. आणि दोन्ही अभिनेत्यांना समजवून सामान्य नागरिकांची सोय पाहण्यात आशिष शेलारांचं चांगलंच सँडविच झालं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.