पेशव्यांनी दडवलेलं सगळ्यात मोठं सिक्रेट ?

पानिपत हे मराठी इतिहासातली भळभळती जखम आहे. १४ जानेवारी १७६१ रोजी पेशवे आणि अब्दाली यांच्या युद्धामध्ये आपल्याला सपाटून पराभव स्वीकारावा लागला. मराठ्यांच्या कित्येक पिढ्या या युद्धात नामशेष झाल्या. खुद्द नानासाहेब पेशव्यांचा चिरंजीव विश्वासराव बंदुकीची गोळी लागून मारला गेला,

आणि मराठ्यांचा सेनापती सदाशिवराव भाऊ युद्धाच्या कोलाहलात गडप झाला.

सदाशिवराव म्हणजे थोरल्या बाजीरावांचा पुतण्या, चिमाजी अप्पांचा लेक. जात्याच हुशार होता . अस म्हणतात की बाजीरावांची मुलं नानासाहेब आणि रघुनाथराव यांच्या पेक्षाही त्याच डोक राजकारभारात जास्त तल्लख होतं. त्याचे आईवडील लवकर गेले त्यामुळे त्याच्या काकूने म्हणजेच बाजीरावाच्या बायकोने त्याचा संभाळ केला.

त्यानं दौलतीचं शिक्षण साताऱ्याच्या शाहू महाराजांच्या निगराणी खाली घेतलं. पुढे सखाराम बापू यांच्या नेतृत्वाखाली लढाईत भाग घेऊ लागले, तिथेही प्राविण्य मिळवल. लोक म्हणू लागले सदाशिवराव भाऊ घराण्याच नाव काढणार.

त्यांना पेशव्यांच कारभारीपण सोपवण्यात आल. तो काळ म्हणजे पेशवाईचा सुवर्णकाळ होता, राघोबादादाच्या नेतृत्वाखाली मराठी घोडे अटकेपार पेशावर पर्यंत धडक मारून आले होते,

शिंदे होळकर ही सरदार घराणी उत्तरेत मराठ्यांचा दबदबा कायम ठेवून होते. दिल्लीच्या बादशाहला देखील कोणते संकट आले, मदत हवी असेल तर मराठ्यांची याद येत असे.

तेव्हा तसेच झाले, अफगाणिस्तानचा क्रूरकर्मा अहमदशहा अब्दाली आपल प्रचंड पठाणी सैन्य घेऊन भारतावर आक्रमण करून आला. सदाशिवराव भाऊवर विश्वास वाढलेल्या नानासाहेब पेशव्यांनी राघोबाच्या ऐवजी भाऊला मोहिमेवर पाठवलं. सोबत होळकरांच सैन्य होतं.हरयाणाच्या पानिपत क्षेत्रात तुंबळ युद्ध झालं.

सुरवातीला मराठे जिंकत होते मात्र विश्वासरावला गोळी लागल्यावर बेभान झालेला सदाशिवराव भाऊ थेट पठाणी सैन्यात घुसला आणि परत आलाच नाही.

सेनापतीच दिसेनासा झाल्यामुळे सैन्याचे धैर्य खचले, पळापळ सुरु झाली, गिल्चानी मराठ्यांना कापून काढले.

अनेक मोठ्या सरदाराना देखील पळून स्वतःचा जीव वाचवावा लागला. सैन्य व बाजारबुणगे धरून ५५ हजार जण मारले गेले, तेवढेच कायमचे जायबंदी झाले. ज्यांनी जीव वाचवून पळ काढला ते कायमचे देशोधडीला लागले.

पानिपत घडत होतं तेव्हा त्यांना रसद पुरवावी म्हणून निघालेले श्रीमंत नानासाहेब पेशवे पराभवाच वृत्त ऐकून देवाघरी गेले. त्यांच्यानंतर पेशवाईची गादी त्यांचा दुसरा मुलगा माधवराव पेशवे याच्याकडे आली. पण तेव्हा तो अवघा १७ वर्षांचा होता.

सुरवातीला त्याची काही वर्षे राज्यकारभार शिकण्यात गेली. पण लवकरच आपल्या सल्लागारांच्या मदतीने त्याने मराठी सत्तेची विस्कटलेली घडी बसवली. हैदराबादच्या निजामाला राक्षसभुवनमध्ये हरवून त्याने दक्षिण भारतात मराठ्यांचा खुंटा मजबूत केला.

उत्तरेतही तिथल्या सरदाराना आवश्यक ते बळ देऊन , वेळप्रसंगी दगाबाजी करणाऱ्यास शिक्षा देऊन आपलं ताकद वाढवलं. मग कधी आप्तस्वकीयांची हयगय केली नाही. माधवराव पेशव्यांची किर्ती ब्रिटीशांच्या पर्यंत पोहचली. त्यांनी आपले वकील त्यांच्या दरबारात पाठवले. मराठी सत्ता भारतात सर्वशक्तिमान म्हणून आकारास येत होती.

तेवढ्यात एक दिवस बातमी आली सदाशिवराव भाऊ परत आले.

पुण्यात सगळ्यांना वाटायच की भाऊंचा पानपतात मृत्यू झाला. उत्तरेतून काही जणांनी पठाणांनी त्यांचा शिरच्छेद केला अशीही बातमी आणली होती पण त्यांचा मृतदेह मिळाला नव्हता. त्यामुळे कधीकधी शंका व्यक्त केली जायची की एखादे वेळेस सदाशिवराव भाऊ जिवंत आहेत, कुठल्यातरी शत्रूमुलखात मंदिराचा आधार घेऊन लपून बसले आहेत,

पण बरेच वर्ष वाट पाहिल्यावर पेशवे कुटुंबाचा भाऊ परत येणार नाही यावरच विश्वास दृढ होत चालला होता, अपवाद फक्त एक भाऊंच्या पत्नी पार्वतीबाई

पानिपतानंतरही त्यांनी कधी आपल्या कपाळावरच कुंकू पुसलं नाही किंवा अंगावरच सौभ्याग्याच लेणं उतरवल नाही. स्वतः माधवराव पेशवे आपल्या काकूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या कुटुंबास शनिवारवाड्यात कधी अंतर दिले नाही.

उत्तरेतून पहिल्यांदा बातमी आली की सदाशिवराव भाऊ जिवंत आहेत आणि फौज घेऊन परत येत आहेत. पुण्यात सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. नर्मदापार अनेकांना वाटलं की तो खरोखर सदाशिवराव आहे. पेशव्यांच्या कारभारयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांचं म्हणण ते खरे सदाशिवराव भाऊ नाहीत तर तो सदाशिवराव पेशव्यांचा तोतया उर्फ ड्युप्लिकेट आहे.

त्याची प्रसिद्धी तोतया म्हणूनच झाली. तो महाराष्ट्रात उतरला तेव्हा पेशव्यांनी सैन्य पाठवून त्याला जेरबंद केलं आणि पुण्याला आणलं. 

पुण्यात त्याची जाहीर चौकशी करण्यात आली. सदाशिवराव भाऊना प्रत्यक्ष पाहिलेल्या अनेक व्यक्ती तेव्हा पुण्यात होत्या. त्यांची साक्ष काढण्यात आली. सर्वात महत्वाची साक्ष बाजीराव पेशव्यांच्या भगिनी, सदाशिवराव भाऊंच्या आत्या अनुसूयाबाई घोरपडे इचलकरंजीकर यांनी त्याची कठोर तपासणी करून हा तोतयाच आहे असे सांगितले.

तोतया तरी निगरगट्ट होता. तो मान्य करायलाच तयार नव्हता. खुद्द माधवराव पेशवे आणि भाऊंच्या पत्नी पार्वती यांनी मात्र तोतयाला पहिले नव्हते. माधवराव पेशवे आपल्या उपस्थितीमुळे कोणावर अन्याय व्हायला नको म्हणून यापासून दूर होते.

तर पार्वतीबाईंना उत्तरेतून दोन गोसाव्यांचे पत्र आले होते की हेच खरे सदाशिवराव पेशवे आहेत यामुळे त्यांचं मन आपला पती जिवंत आहे आणि माधव त्याला तोतया घोषित करू पाहतोय असच बनलं होतं.

अखेर पेशव्यांच्या सदरेवर श्रीमंत माधवरावांच्या उपस्थितीत तोतयाची रामशास्त्री प्रभुणेनी उलटतपासणी घेण्यास सुरवात केली.

त्याला अनेक अवघड प्रश्न विचारले, शनिवारवाड्याशी संबंधित, नातेवाइकांशी संबंधित अवघड प्रश्नांची उत्तरे तोतया आश्चर्यकारकरित्या बरोबर देत होता. तरीही कुठेतरी प्रभुणेनी त्याला पेचात पकडले व तो बोलता झाला,

क्षमा श्रीमंत, मी भाऊ नाही..मी तोतया !!

असे म्हणून तो रडू लागला. काही ठिकाणी असंही लिहीलेलं आहे की पार्वतीबाईनी दरबारात चिकाच्या पडद्याआडून तोतयाला काही नवराबायकोच्या दरम्यानचे काही खाजगी प्रश्न विचारले व त्याला त्याची उत्तरे देता आली नाहीत.

तो कनोजी ब्राह्मण सुखलाल होता. बुंदेलखंडच्या तनोल गावचा. घरची परिस्थिती फाटकी होती. कोणी तरी भरीस पाडून त्याला सदाशिवराव बनवलं. त्याची चेहरेपट्टी समानच होती, तो बेरकी होता. पेशव्यांच्या फितुरांकडून त्याने भाऊंची सगळी माहिती गोळा केली व त्या ज्ञानावर कधी आपल डोक वापरून लोकांना फसवत फसवत तो पुण्यापर्यंत आला.

पण पुण्यात त्याची डाळ शिजली नाही.

पुढे त्याला व जनकोजी शिंदेंच्या तोतयाला त्यांनी आपली चूक मान्य केली म्हणून पेशव्यांनी देहांत प्रायश्चित्त दिले नाही. त्यांना नगर, दौलताबाद, मिरज अशा किल्ल्यावर बंदी म्हणून ठेवले. पुढे कर्तबगार पेशवा माधवराव यांचा मृत्यू झाला. रघुनाथराव पेशव्यांनी गारद्याकरवी नारायणरावाचा खून केला.

पेशव्यांच्यामध्येच भाऊबंदकी माजली. कारभार नाणं फडणवीस व बारभाईच्या हाती आला. अजाण सवाई माधवरावाला गाडीवर बसवण्यात आले.

यादरम्यान  इचलकरंजीच्या अनुसूयाबाई घोरपडेनी आपली साक्ष पलटवली व तोतया हाच खरा सदाशिवराव भाऊ पेशवा आहे असे जाहीर केले. तेव्हा तोतया रत्नागिरीच्या किल्ल्यावर होता. मग मात्र तिथल्या सुभेदाराने  सुभेदार रामचंद्र परांजपेने  तोतयाला सोडून दिले.

तोतयाने आपल्या गोड बोलण्याने सैन्य जमवले आणि अख्ख्या कोकणात वर्चस्व दाखवायला सुरवात केली. मराठा साम्राज्याचे सर्व आरमारही त्याच्या अधिपत्याखाली आलें. इंग्रज, हैदर अली सारख्या शत्रूंसोबतच रघुनाथराव पेशव्यांसारखे काही नातेवाईक देखील यात तोतयाला सामील होते.

कोकणावर विजय मिळवल्यावर तोतया देशावर आला, राजमाचीवर विजय मिळवला, त्याचा डोळा सिंहगडावर होता. सिंहगड म्हणजे पुण्याच्या अगदी नाकासमोर असणारा किल्ला. तो गेला म्हणजे पेशव्यांचे नाक कापल्याप्रमाणे होणार होते.

अखेर फडणवीसांनी महादजी शिंदेना बोलवून तोतया चा बंदोबस्त करण्याची जबाबदारी दिली.

महादजीनी राणोबा आग्रेंच्यामदतीने ती चोख बजावली. मुंबईला इंग्रजांच्याआड लपण्यासाठी निघालेल्या तोतया उर्फ सुखरामला जेरबंद करून पुण्याला आणले. त्याची परत चौकशी झाली. यावेळी नाना फडणवीस यांनी त्याला उघड केले, त्याच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता त्याला देहांत प्रायश्चित्त सुनावले.

अखेरीस पुण्यातील तोतया सदाशिवरावाचे प्रकरण शांत झाले. पण तरीही लोक म्हणत राहिले की सत्तेच्या हव्यासापोटी नाना फडणवीसाने पेशव्याला तोतया म्हणून ठार केले.

आजही या प्रकरणाबद्दल पुण्यात अनेक चर्चा असतात. वेगवेगळ्या थिएरिज मांडल्या जातात. वर दिलेली माहिती सुद्धा अशीच कुठे तरी कोणी लिहिलेली, कोणी तरी सांगितलेली अशीच आहे. त्यामुळे खरे खोटे कोणालाच माहित नाही. खरं काय होतं हे पेशव्यांचे एक खास गुपित म्हणून इतिहासाच्या पानात दडून गेल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.