पेशवे १६ लाखांच्या कर्जात होते तेव्हा नाना फडणवीसांकडे ९ कोटी रुपये होते.

पेशवाईतल्या साडेतीन शहाण्यापैकी हा अर्धा शहाणा. जवळपास पाच पेशव्यांची कारकीर्द त्याने पाहिली. त्यातल्या चार पेशव्यांच्या पदरी तो नोकरीला होता. तरी पेशव्यांच्या पेक्षा तो श्रीमंत होता. संकटकाळात आपल्या मुत्सद्देगिरीने त्याने पेशवाई आणि पर्यायाने मराठी सत्ता टिकवली. ब्रिटिशांच्यावर अंकुश ठेवला. एक वेळ अशी होती नाना फडणवीसच्या चातुर्याचे किस्से लंडनमध्ये चर्चिले जायचे आणि त्याच्या रंग ढंगाचे किस्से पुण्याच्या बोळाबोळात.

नेमका होता तरी कोण हा नाना?

नाना फडणवीसच मूळ नाव बाळाजी जनार्दन भानू. हे भानू कुटुंबीय मुळचे कोकणातल्या श्रीवर्धनचे. हबश्यांच्या आक्रमणाला कंटाळून बाळाजी विश्वनाथ भट जेव्हा पळाला तेव्हा याच भानूनी त्याला संकटसमयी साथ दिली. तेव्हा बाळाजीने म्हणे त्यांना आपल्या भाकरीतील चतकोर तुम्हाला देईन असे वचन दिले. पुढे ह्या बाळाजी भटाने आपल्या पराक्रमाने पेशवाई मिळवली. दिलेल्या वचनाला जागून त्याने भानू कुटुंबाला फडणीशीची वस्त्रे दिली.

नानासाहेब पेशवेच्या काळात परंपरेने चालत आलेली फडणीशी बाळाजी जनार्दन उर्फ नाना कडे आली. तेव्हा तो अवघा चौदा वर्षाचा होता. 

त्याचे शिक्षण सदाशिवराव भाऊ पेशव्याच्या निगराणीखाली झाले होते. पण लहानपणापासून प्रकृती तोळामासा असल्यामुळे तो फडावरच जास्त रमायचा. पानिपताच्या युद्धात पालखीत बसून जाणाऱ्या नाना फडणविसची येथेच्छ चेष्टा पुणेकरांनी उडवली होती.

याच पानिपताच्या लढाईत पेशव्यांना न भुतोनभविष्यती असा मोठा पराभव स्वीकारावा लागला. अख्खी एक मराठा पिढी या युद्धात कामी आली. जे काही हाताच्या बोटावर मोजता येतील असे सैनिक परत आले त्यात हा नाना फडणवीससुद्धा होता. युद्धाचा रागरंग ओळखून त्याने जीव वाचवण्यासाठी पाबोरा केला होता.

या युद्धानंतर पेशवाईचे स्थैर्य गेले. माधवराव पेशव्याचे अल्पायुषी कारकीर्द सोडता भारतातील प्रबळ सत्तेपैकी एक असलेल्या या पेशवाईमध्ये कायम गोंधळ राहिला. माधवराव पेशव्यांच्या काळात  नाना फडणवीस दरबारी राजकारणामध्ये एकदम तरबेज झाला होता. नारायणराव पेशव्याच्या खुनानंतर त्याने बारभाईच्या मदतीने सत्ता ताब्यात घेतली. बारा वर्षाच्या सवाई माधवराव पेशव्याला त्याने गादीवर बसवले. 

तलवार चालवता येत नसल्यामुळे अर्धा शहाणा म्हणवल्या जाणाऱ्या नाना फडणवीसाने फक्त लेखणीच्या जोरावर रघुनाथ पेशव्याला सत्तेपासून दूर केले. पेशवाईची घडी बसवली. याच काळात महादजी शिंदेनी दिल्लीमध्ये मराठीशाही पोहचवली. नानाची बुद्धी आणि महादजींचा बळ यामुळे मराठा साम्राज्याला परत वैभवाचे दिवस आले.

याच काळात नानाने पुण्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या. शनिवारवाड्याची डागडुजी केली. पुण्यात पेठा वसवल्या. पाण्याचा प्रश्न सोडवला. अनेक मंदिरे बांधली, त्यांची व्यवस्था लावली. दक्षिणेत हैदर टिपूला काबूत ठेवले. इंग्रजांच्या वाढत्या ताकदीवर त्याची करडी नजर होती. संपूर्ण भारतात इंग्रज जर मराठ्यांना टरकून असायचे ते फक्त महादजी शिंदे आणि नाना यांच्यामुळेच.

पण इतके असूनही नानाच्या चारित्र्यावर अनेकांचे आरोप होते. नाना फडणवीसाला स्त्रियांचा भरपूर नाद होता. त्याची नऊ लग्ने झाली होती शिवाय त्याच्या दोन रखेली होत्या. त्याच्या स्वतःच्या म्हणण्यानुसार त्याच्यात विषयवासना हा एकमेव दुर्गुण होता. 

खरे तर नानामध्ये आणखीन ही दुर्गुण होते, तो शीघ्रकोपी होता त्यांमुळे त्याने अनेकांना दुखावले होते. सरदारांच्यात माजलेली दुही त्याला सोडवता आली नाही. त्याने सवाई माधवरावाला पूर्णपणे आपल्या कह्यात आणले होते. त्यामुळे मिळालेल्या निर्बंध सत्तेचा वापर त्याने स्वतःची संपत्ती गोळा करण्यासाठी देखील  केला.

यात सर्वात गाजलेला किस्सा म्हणजे घाशीराम कोतवालाचा सांगितला जातो. घाशीराम नावाच्या एका फाटक्या माणसाला त्याने त्याच्या कोवळ्या मुलीच्या बदली कोतवाली दिली. घाशीरामाने पुण्यात माजवलेल्या अनागोंदीकडे दुर्लक्ष केले. याच घाशीरामने काही ब्राह्मणांना तुरुंगात कोंबून जेव्हा ठार मारले तेव्हा मात्र खुद्द पेशव्यांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्याला दगडाने ठेचून मारण्यात आले.

कंजूष नानाने स्वतःसाठी मात्र भरपूर मालमत्ता गोळा केली होती. वाई जवळच्या मेणवली मध्ये स्वतःचा मोठा वाडा बांधला. युद्धाच्या धामधूमीमुळे जेव्हा पेशव्यांवर १६ लाखाचे कर्ज होत तेव्हा त्यांचा कारभारी असलेल्या नाना फडणवीसाकडे ९ कोटीची संपत्ती होती. यामुळेच त्याला नवकोट नाना असे म्हटले जाई.

रॉयल सोसायटी ऑफ ब्रिटन मध्ये  नाना फडणवीसने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले पत्र सापडले. यात नाना स्वतः जवळपास पाच कोटी नव्वद्लाखची संपत्ती असल्याचे मान्य करतो. ज्याची आजच्या काळातली किंमत हजारो कोटीच्या घरात जाते.

याच दरम्यान सवाई माधवरावाने भ्रमिष्ट होऊन आत्महत्या केली. त्यानंतर मात्र नानाचे महत्व कमी होत गेले.

दुसरा बाजीराव याचा नाना फडणवीसवर राग होता. त्याने नानाला अटकेत टाकले. नानाने बाजीरावाला दोन कोटीचा जामीन देऊन स्वतःची सुटका करवली. पुढे काहीच दिवसात नानाचा मृत्यू झाला.

त्याच्या मृत्यूनंतरसुद्धा त्याच्या अंत्ययात्रेवेळी गारद्यांनी पैशासाठी मोठा गोंधळ घातला. त्यांचा पगार मिळाल्यावरच त्याचे शव बाहेर काढण्यात आले. नानाच्या मृत्यूनंतर त्याच्या जिवंत असलेल्या दोन बायकांचे देखील खूप हाल झाले. यातील एक पुढे चौदा दिवसात वारली. जिवंत राहिलेली ९ वर्षाच्या जिऊबाईला पुढे इंग्रजांच सरकार आल्यावर  बऱ्याच खटपटीनंतर स्वतःचा हक्क मिळाला.

त्याच्या मृत्यूनंतर दुसऱ्या बाजीरावाच्या अननुभवी कारभारामुळे पेशवाई वेगाने अस्त झाली आणि भारतात ब्रिटीशांचे राज्य उदयास आले. कुणीतरी लिहून ठेवलंय,

“नाना गेले व त्यांबरोबरच मराठी राज्यांतील शहाणपणा व नेमस्तपणा हीं लयास गेलीं.”

हे ही वाच भिडू.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.