वर्ष सुरु होऊन ७ दिवस झाले आणि बाबा वेंगाची दोन भाकितं खरी ठरली आहेत…

२०२३ वर्ष सुरू झालंय. अजून तसा आठवडाही उलटला नाही. तितक्यात काही अश्या गोष्टी घडल्या की ज्या एका भाकित करणाऱ्या बाईने १९९७ च्या आधीच सांगून ठेवल्या होत्या. या बाईने २०२३ सालाबद्दल जी भाकितं केलीयेत ती खूपच चिंताजनक आहेत.

तिचं नाव म्हणजे बाबा वेंगा.

२०२३ साठीच्या तिच्या कोणत्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्यात ते बघुया.

तिने पोप बेनिडिक्ट यांच्या निधनाबद्दल भविष्यवाणी केली होती जी नव्या वर्षात खरी ठरली.

दुसरी भविष्यवाणी म्हणजे तिने सुर्याच्या पृष्ठभागावर सौर स्फोट होईल, असं सांगितलं होतं आणि आजच सुर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाल्याची बातमी आली.

त्यामुळे या बाबा वेंगाने २०२३ साठी आणखी काय भविष्यवाणी करून ठेवलीये याबाबत चर्चा सुरू झालीये.

ही बाबा वेंगा कोण हे सांगायचं झालं तर,  बाबा वेंगा या नावावरून तुम्हाला ती कुणी साध्वी असेल असं वाटेल.

पण, तसं नाहीये. बरं असंही नाहीये कि, ती जिवंत आहे, तिला या जगातून जाऊन कित्येक वर्षे झाली आहेत. तिने भविष्य मात्र आधीच सांगून ठेवलीयेत. पाश्चात्य देशांतल्या मीडियानुसार, बल्गेरीयात ३ ऑक्टोबर १९११ रोजी तिचा जन्म झाला. तिचं खरं नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होतं.

या बाबा वेंगाचं वय १२ असावं तेव्हा एका मोठ्या वादळात तिने आपली दृष्टी गमवावी लागली.

परिणामी तिला दिसणं बंद झाले होते. पण याच वेळी तिला भविष्य पाहण्याची शक्ती प्राप्त झाल्याचं म्हणतात. वेंगा यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने डोळ्यांवर उपचार करणे शक्य झाले नाही परिणामी वेंगा आपले संपूर्ण आयुष्य अंधत्वासह जगली.

पण तिचं असं म्हणणं होतं की,

‘तिची दृष्टी गेली असली, तरी ती भविष्यात होणाऱ्या घटना स्पष्टपणे बघू शकते. म्हणजे तिला तसं दिसतं.’

१९८० च्या दशकाच्या शेवटी-शेवटी ती पूर्व युरोपमध्ये तिच्या भविष्य बघण्याच्या शक्तीमुळे, ती करत असलेल्या भाकितांमुळे बाबा वेंगा म्हणून फेमस झाली होती. पण १९९६ मध्येच तिचा मृत्यू झाला. तिच्या जवळच्या लोंकांनी १९९७ मध्ये दावा केला की, लाखो लोकांचा असा विश्वास आहे की तिच्याकडे अलौकिक शक्ती आहेत.

तिने मरण्याआधी तिने ५०७९ सालापर्यंतचं भविष्य सांगून ठेवलं आहे. तिचं असं म्हणणं होतं की, ५०७९ साली जगाचा अंत होणारे.

असा दावा केला जातो कि, तिने केलेली ८५ टक्के भाकितं खरी ठरली आहेत…पण तिचे अनेक दावे फोलसुद्धा गेलेत हे तितकंच खरंय.

जगात भविष्यात काय होणार? काय होऊ शकतं ? याबाबत ती सांगत गेली आणि तिला मानणाऱ्या तिच्या अनुयायांनी ते भविष्य लिहून काढलं असं सांगतात. त्याचनुसार २०२३ हे वर्ष अनपेक्षित घटना आणि शोकांतिकेने भरलेले असेल, असा अंदाज बाबा वेंगाने व्यक्त केलेला.

२०२३ साठी बाबा वेंगाने ५ भविष्यवाण्या केल्या आहेत.

जैविक शस्त्रांनी हल्ला होणार.

एक मोठा देश २०२३ मध्ये जैविक शस्त्रांनी हल्ला करण्याची शक्यता आहे. आश्चर्य म्हणजे रशिया-युक्रेनच्या वादातून नव्हे तर दुसऱ्याच दोन देशांमध्ये तिसरे महायुद्ध होण्याचे संकेत बाबा वेंगाने दिले होते.

सौरवादळ किंवा त्सुनामी येणार.

२०२३ मध्ये सौर वादळ किंवा सौर त्सुनामी येऊ शकते. या सौर वादळांमुळे पृथ्वीच्या वेगात बदल होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

जगभरात अंधार पसरणार.

२०२३ मध्ये संपूर्ण जगात अंधार पसरू शकतो. एलियन्स पृथ्वीवर हल्ला करू शकतात आणि त्यात लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. म्हणूनच दुसरीकडे शास्त्रज्ञ, एलियन हल्ल्याचा अंदाज घेत आहेत.

मानवाचा जन्म प्रयोगशाळेत होईल.

२०२३ पर्यंत मानव प्रयोगशाळेत जन्माला येईल. प्रयोगशाळेत लोकांचे चारित्र्य, त्वचेचा रंग ठरवला जाईल. जर का हे खरं ठरलं तर मनुष्याकडून मुलं जन्म घालण्याची, बाळंतपणाची पारंपारिक पद्धत पूर्णपणे संपूणच जाईल.

आशिया खंड अंधारात बुडेल.

अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे , ज्यामुळे संपूर्ण आशिया खंड गडद अंधारात बुडेल आणि यामुळे गंभीर आजाराने लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

बाबा वेंगाच्या आजवरच्या काही भविष्यवाण्या ठरल्यात

वयाच्या २६ वर्षांपूर्वीच तिने स्वतःच्या मृत्यूच्या तारखेची भविष्यवाणी केली होती, जी पूर्णपणे खरी ठरली.

दुसरं म्हणजे बाबा वेंगाने असे भाकीत केले होते की २०२२ मध्ये आशियाई व ऑस्ट्रेलियन देशांमध्ये पुरामुळे मोठे संकट येईल. हे भाकीत जवळपास खरं ठरलेलं. कारण या वर्षात या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. भारताच्या उत्तर पूर्व भागात तसेच बांग्लादेश, थायलँडमध्ये पूर आलेला.

आणखी एक भाकीत वेंगाने केलेलं कि, काही भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती सुद्धा उद्भवेल. २०२२ च्या वर्षांत युरोपमधली परिस्थिती अशीच काहीशी होती. पोर्तुगाल सरकारने तर आपल्या देशवासियांना कमी पाणी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर इटली मध्ये सुद्धा १९५० नंतर यंदा पहिल्यांदाच दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली.

बाबा वेंगाच्या समर्थकांचा असा दावा आहे की, बाबा वेंगाने ९ नोव्हेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचा अंदाज आधीच वर्तवला होता.

जर त्यांची भविष्यवाणी अमेरिकेने गांभीर्याने घेतली असती तर कदाचित अमेरिकेला इतक्या मोठ्या हल्ल्याला टाळता आलं असतं. तसंच आफ्रिका-अमेरिकन वंशाचे बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील,असा अंदाज देखील बाबा वेंगाने आधीच वर्तवला होता.

इतकंच नाही तर कोरोना साथीच्या आजाराबाबत देखील बाबा वेंगाने भविष्यवाणी केली होती आणि ती खरी ठरली.

यावर काहींचं म्हणणं आहे ही भाकितं आणि वास्तव योगायोग असू शकतो. म्हणूनच आता बाबा वेंगाचे कोणते अन् किती दावे खरे ठरले यापेक्षा महत्वाचं हे आहे की,

बाबा वेंगाने केलेल्या भाकितांबाबत काय आहे तथ्य? यात महत्वाचं हे कि, बाबा वेंगाने सांगितलेली भाकितं कुठे लिहून ठेवलीत हे आजवर कुणालाही नीटसं सांगता आलं नाहीये. न तिने केलेले दावे लिखित स्वरुपात कुणीही पाहिलेले नाहीत.

दुसरा महत्त्वाचा विषय असा की, काही वेबसाईट्स आणि अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार हे भविष्य नाही तर, विज्ञान आहे.

जसं की, ‘पृथ्वीवर जलप्रलय येईल’ हे सांगण्यासाठी काही भविष्य पाहायची गरज नसते. तर जलप्रलय येणं ही निसर्गाचा आणि पर्यायानं विज्ञानाचा भाग आहे. पृथ्वीवर मनुष्यांनी केलेल्या निसर्गाच्या ऱ्हासामुळे भविष्यात नैसर्गिक आपत्ती येणारच आहेत हेही सांगणं म्हणजे काय भविष्य सांगणं नाही. बाकी बाबा वेंगाने भविष्यात लोकं व्हर्च्युअल जगतील हे भाकीत केलेलं. आता वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे, मोबाईलच्या वापरामुळे आपणही हे भाकीत खरं म्हणून शकतो.

आता या भाकितांच्या तथ्यांबाबत बोलताना एक असाही दावा केला जातो कि, ‘एखादी घटना घडून गेल्यानंतर बाबा वेंगाचे अनुयायी असा दावा करतात हे होणार होतं हे आधीच बाबा वेंगाने सांगून ठेवलंय कारण असंही लिखित स्वरूपाचे काही पुरावे नाहीच आहेत.

त्यामुळे तिच्या भाकितांवर विश्वास ठेवणं कठीणच आहे. बाकी प्रत्येकाने आपापली विवेक बुद्धी वापरून या भाकितांवर विश्वास ठेवायचा कि नाही ठेवायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.