भविष्यवाणी खोटी ठरवून उषा उत्थपनं करिअर घडवून दाखवलं…

संशोधन आणि तंत्रज्ञान प्रगतीपथावर असल्यामुळे अलीकडे मुला मुलींची  Aptitude Test घेऊन त्यांचा कल कुठल्या बाजूला आहे हे तपासले जाते. त्यानुसार त्याला त्याचे करिअर घडवताना या टेस्टचा खूप उपयोग होतो. ही पद्धती संपूर्णपणे शास्त्रोक्त असल्यामुळे याचे रिझल्ट देखील चांगले मिळतात. पण पन्नास- साठ वर्षांपूर्वी कुठे होत्या अशा टेस्ट? त्यामुळे घरची वडीलधारी मंडळी.

 शिक्षक वर्ग, मोठी भावंड आणि अन्य शुभचिंतक हेच मुलांचे कल तपासत असत. 

यामुळे बऱ्याचदा रॉंग नंबर देखील लागत असे. कधी कधी मुलं स्वतःच आपल्यातील ‘एक्स फॅक्टर’ ला शोधून काढत आणि त्यावर काम करत. असं करत असताना त्यांना समाजाचा घरच्यांचा पाठिंबा मिळेलच असं नसायचं. पण एकलव्यासारखं शिकत ते आपला मार्ग पुढे नेत असंत. यातलंच एक नाव होतं गायिका उषा उत्थुप! 

आज आपण उषा उत्थुप ला पॉप, जाझ, डिस्को या क्षेत्रातील महासम्राज्ञी समजतो. पण एकेकाळी हाच आवाज तिला उपेक्षितांचे जीणं जगायला लावत होता. त्याचं कारण तिच्या आवाजाला सुरुवातीपासून एक थिक बेस होता. तिचा हेवी आवाज होता. 

तत्कालीन स्त्री गीतांसाठी आवश्यक असणारा नाजूकपणा या आवाजामध्ये अजिबात नव्हता. त्यामुळे प्रसंगी पुरुषी वाटेल असा हा थोडासा जाडा आवाज होता. त्यामुळे उषाला तिच्या मुंबईच्या शाळेतील संगीत शिक्षिकेने,” तू गायिका बनू शकत नाहीस” असं म्हणून तिला वर्गाच्या  बाहेर काढलं होतं! आणि तुला संगीतात आवड असेल तर तू गाण्याच्या ऐवजी वादनात लक्ष घाल असा देखील ‘अनाहूत’ सल्ला दिला होता. 

दुसरी कुणी असती तर अशा अपमानाने नैराश्याच्या वादळात अडकली असती पण असते लहानग्या उषाने हे आव्हान पेलले जिद्दीने तिने गायिका व्हायचे ठरवले. तिला तिच्या तील एक्स फॅक्टर  वर प्रचंड विश्वास होता. 

८ नोव्हेंबर १९४७ रोजी एका तामिळ ब्राह्मण कुटुंबात उषा अय्यरचा जन्म झाला. 

तिचे कुटुंबीय मूलतः तामिळनाडूचे असले तरी आता मुंबईत सेटल झाले होते. तिचे वडील पोलीस मध्ये होते. भायखळाच्या पोलीस क्वार्टर्स मध्ये तिचे लहानपण केले. भायखळ्याच्याच सेंट इग्निस हायस्कूल येथे उषा अय्यर यांचे शिक्षण झाले. तिच्या शाळेतील संगीताच्या शिक्षिका मिस डेविडसन यांनी उषाला ,” तू गायिका बनू शकणार नाहीस तू वादक हो!” असा सल्ला दिला. पण उषाला गायनाच्या क्षेत्रातच करिअर करायचे होते. 

उषाने अफाट कष्ट घेत संगीताची आराधना सुरु केली. तिला  या क्षेत्रात गुरु कुणीच नव्हता. कायम रेडीओ वर गाणी ऐकत ऐकत शिकू लागली. किशोरी अमोणकर, बडे गुलाम अली खान साहेब तसेच  कर्नाटकी संगीत सगळे आत्मसात केले. शाळेत असतानाच ती जिंगल्समध्ये गावू लागली. पुढे तिची भेट अमीन सयानी  यांच्या सोबत झाली. 

अमीन सयानी यांनी दिला एका रेडिओ प्रोग्राम मध्ये गायची संधी दिली. कार्यक्रम होता ‘ओव्हल टाईन म्युझिक आवर’ तिने गाण्याचे करिअर चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये गायला सुरुवात केली. पुढे तिचे उत्थुप यांच्याशी लग्न झाले. 

दिल्लीला ओबेरॉय हॉटेलमध्ये गाताना देव आनंद यांनी तिला पाहिले आणि आपल्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटात तिला गायला संधी दिली. यातील ‘दम मारो दम’ हे गाणं खरंतर उषा उत्थुप आणि आशा भोसले एकत्रित जाणार होत्या पण काही कारणाने शक्य झालं नाही मग याच गाण्याचे इंग्लिश व्हर्शन तिने जोशात गायले. आणि इथून तिने मागे वळून पहिलेच नाही.

आर डी बर्मन आणि बप्पी लाहिरी यांनी उषा उत्थुप आवाजाचा योग्य वापर केला.

उषा उत्थुप यांनी कायम भारतीय संस्कृती जपत संगीताची सेवा केली. प्युअर  सिल्कची चमचमती साडी, अंगावर भरपूर दागिने, चेहऱ्यावर उठून दिसेल अशी मोठी काळी टिकली, केसात टवटवीत फुलांचा गजरा … असे त्याचं रूप! आणि तिने गायला सुरुवात केल्यानंतर ‘दोस्तो से प्यार किया दुशमनो से बदला लिया जो भी किया हमने किया शान से शान से….’ प्रेक्षकांनी या आवाजाला प्रचंड प्रेम दिले.

’सात खून माफ ‘ या चित्रपटातील ‘डार्लिंग…..’ या गाण्याला त्यांना पुरस्कार मिळाला. हरी ओम हरी, वन टू चा चा चा, तू मुझे जान से भी प्यारा है, रंभा हो हो संभा हो हो ,कोई यहां नाचे नाचे हि उषाची भन्नाट गाणी आजही जगभर हिट आहेत.

एकदा दिल्लीला एका कार्यक्रमात  गाताना उषा उत्थुप यांना प्रेक्षकांमध्ये त्याची म्युझिक टीचर डेविडसन दिसल्या. कार्यक्रम झाल्यानंतर ग्रीन रूम बाहेर त्या थांबल्या होत्या. उषा उत्थुप ते बघितले त्यांना आत घेऊन गेल्या तर नमस्कार केला. 

मिस डेविडसन यांना शाळेतील प्रसंग आठवला त्यांचे डोळे पाणावले. कधी कधी आपणच केलेली भविष्यवाणी कशी खोटी ठरते पण ही खोटी ठरलेली भविष्यावाणी  देखील किती आनंद देते याचा प्रत्यय त्यांना आला त्या क्षणी आला.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.