किडनॅप करायला आलेल्या अतिरेक्यांना कोल्हापूरच्या खासदारांनी साफ गंडवलं.

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. ईशान्य भारतामध्ये प्रचंड असंतोष धुमसत होता. प्रत्येक राज्यात फुटीरतावादी वेगवेगळ्या मागण्या करत होते. अशातच केंद्रात इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यापासून तिथले वातावरण देखील अस्थिर बनले होते.

राजकारणात अननुभवी राजीव गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारलं. निवडणुकांना ते पहिल्यांदाच सामोरे जात होते. काँग्रेसतर्फे वेगवेगळ्या राज्यांच्या मतदारसंघाची जबाबदारी वेगवेगळ्या लोकांना देण्यात आली होती.

आसाम राज्याच्या निरीक्षकपदी कोल्हापूरचे खासदार माजी मंत्री उदयसिंह गायकवाड यांची निवड झाली होती.

आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अनेक वर्ष तिथे निवडणूक झाल्या नव्हत्या. त्यातच शेजारच्या राज्यांचे बोडो अतिरेकी यांनी उच्छाद मांडला होता. आसाममध्ये काँग्रेस विरोधी वातावरण होतो व फुटीरतावादी तेथे निवडणूक होऊ नये म्हणून प्रयत्न करत होते.

उदयसिंह गायकवाड हे इंदिरा गांधीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. ते अनुभवी होते. यामुळेच राजीव गांधी यांनी त्यांची आसामच्या निवडणुकीची महत्वाची जबाबदारी त्यांच्या  गळ्यात टाकली होती.

जास्तीतजास्त काँग्रेस उमेदवार निवडून यावेत म्हणून उदयसिंह गायकवाड आसामच्या कानाकोपऱ्यात फिरले.

स्थानिक कार्यकतें त्यांच्या सोबत होते मात्र जशीजशी निवडणूक जवळ येत होती तसतसे राज्यातील परिस्थिती अधिक स्फोटक बनत चालली होती. गायकवाड यांचा एक युवराज नावाचा बॉडीगार्ड होता. त्याला स्थानिक आसामी भाषा कळत होती. तो  गायकवाडांना जे काही घडत आहे ते समजावून सांगत होता.

उदयसिंह गायकवाड रोज दैनंदिन रिपोर्ट दिल्लीला पाठवत होते.

एकदा त्यांची भेट असं मध्ये तैनात असलेल्या बीएसएफ जवानांशी झाली. त्यात काहीजण कोल्हापूरचे होते. त्यातला एकजण गायकवाड याना म्हणाला,

“साहेब, इथं वातावरण हे असं आहे. तुम्ही कशाला जीव धोक्यात घालून येथे आलात? हिमंडळी पोलिसांच्या बंदुका काढून त्यांना बाणाने मारतात. मागच्यावेळी एका आमदाराला असच मारलं होतं.”

उदयसिंह गायकवाड यांना जाणीव झाली कि आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. तेजपूर येथे राजीव गांधी यांची सभा होणार होती. तिथे घातपाताची शक्यता ओळखून गायकवाड यांनी रिपोर्ट पाठवला की सभेला गर्दी होणार नाही, राजीव गांधी यांचा दौरा पुढे ढकलावा.

अप्रत्यक्षरीत्या पाठवलेल्या या संदेशातून दिल्लीतल्या श्रेष्ठींनी योग्य तो संदेश घेतला आणि राजीव गांधी यांचा दौरा रद्द केला.

उदयसिंह गायकवाड एकदा प्रचारासाठी फिरत असताना एका छोट्या गावी पोहचले. ब्रम्हपुत्रा नदीपात्रात एक शंकराचे प्राचीन मंदिर होते. या मंदिराला मोठा इतिहास होता, तिथल्या तीर्थाचे पाणी नारळाच्या पाण्याप्रमाणे गोड लागत होते. उदयसिंह गायकवाड याना ते स्थान पचंड आवडले. रोजच्या धकाधकी पासून एक निरव शांतता अनुभवायला मिळत होती. तिथल्या वडाच्या पारावर थोडावेळ ते बसले. त्यांचा बॉडीगार्ड म्हणाला,

“साहेब हि जागा धोकादायक वाटत आहे. लवकर निघू. “

गायकवाड पायात मोजे चढवत होते इतक्यात काही बोडो युवक तिथे निवडणुकीचं पोस्टर चिकटवण्यासाठी आले.

प्रत्येकाच्या हातात स्टेनगन होत्या. मंदिराचे पुजारी वगैरे कधीच आपल्या घरी निघून गेले होते. त्यां तरुणांनी हा परकीय माणूस इथे काय करत आहे याची चौकशी केली. उदयसिंह गायकवाड म्हणाले,

“मी महाराष्ट्रातून आलोय. शंकर -पार्वतीवर संशोधन करून पुस्तक लिहितोय आणि त्यासाठी ती ठिकाणे प्रत्यक्ष पाहावीत माहिती घ्यावी म्हणून आलोय. “

त्यांना विश्वास बसावा म्हणून गायकवाड यांनी मगाशी पुजाऱ्याने त्यांना सांगितलेला मंदिराचा इतिहास तिखटमीठ लावून सांगितला. वरून एका झाडाच्या पानांचं द्रोण बनवलं व प्रत्येकाला तिथलं तीर्थ प्यायला दिलं. हा धार्मिक गडी खरोखर अभ्यासासाठी आलाय यावर त्या तरुणांचा विश्वास बसला.

गंमत म्हणजे ते तरुण उदयसिंह गायकवाड यांच्याच मागावर होते.

त्यांना जबाबदारी दिली होती कि काँग्रेसच्या निरीक्षकाला पकडायचे आणि किडनॅप करायचं. पण त्या भोळ्या अतिरेक्यांना कळालं नाही की आपण ज्याच्याशी बोलत आहे तोच हा निरीक्षक आहे.

उदयसिंह गायकवाड त्यांना म्हणाले,

“आपली भावना चांगली असेल तर काहीही होत नाही. मी इतर जवळच सर्किट हाऊसवर उतरलो आहे. एकदा चहा पिण्यासाठी येऊन जा.”

बोडो अतिरेक्यांनी मान हलवली. गायकवाड व त्यांच्या ड्रायव्हरने त्यांचा निरोप घेतला आणि ऐंशीच्या स्पीडने सर्किट हाऊस गाठले.

दुसऱ्या दिवशी ते एका चहा इस्टेटवर निघाले होते तेव्हा एका क्रॉसिंगवर ते बोडो आंदोलनातील युवक मोटारसायकलवरून तिथे येताना दिसले. त्यांनी गाडी थांबवली.

आत बसलेल्या उदयसिंह गायकवाड यांनी त्यांना ओळखलं आणि विचारलं,

काल तुम्ही चहा ला आला नाही. मी खूप वाट बघितली.”

त्या तरुणांनी गायकवाड यांना कुठे निघाला आहे हि चौकशी केली. त्यांनी टी इस्टेटला निघालो आहे हे सांगताच या रस्ताऐवजी दुसऱ्या रस्त्याने जा असे सांगितले. गायकवाड यांनी देखील त्यांनी सांगितलेल्या रस्त्यावरून जाण्यास ड्रायव्हरला सांगितलं. ते जेव्हा परत आले तेव्हा कळलं की त्या बोडो आंदोलकांनी स्वैर गोळीबार करून त्याच क्रॉसिंगवर सात -आठ जणांनाच खून केला होता.

नशीब बलवत्तर म्हणून उदयसिंग गायकवाड वाचले. त्यांनी या निवडणूक व्यवस्थितपणे पार पाडल्या .

पुढे काही वर्षांनी शरद पवार संरक्षणमंत्री असताना बोडो प्रश्न हाताळण्यासाठी त्यांनी उदयसिंह गायकवाड यांचीच निवड केली. त्यांना आसाम मध्ये काम करण्याचा अनुभव होता. अतिरेक्यांशी चर्चा केली व देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न कोल्हापूरच्या खासदाराच्या बंगल्यावर मार्गी लागला.

हे ही  वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.