आणि कोल्हापूरचं मुख्यमंत्री पद हुकलं ते कायमचंच !

हा किस्सा आहे ऐंशीच्या दशकातला. तेव्हा कथित सिमेंट घोटाळ्यात नाव अडकल्यानंतर बॅरिस्टर ए. आर. अंतुलेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली होती. वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्रिपदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात होते, पण इंदिरा गांधींनी सर्वांना धक्का देत बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री केलं. कारण इंदिरा गांधींना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी मराठा नेताच हवा होता. 

बाबासाहेब भोसले मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यापासून स्वभावानुरूप वागायला सुरुवात केली. भोसले मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या नियंत्रणात राहतील असं बहुतेक नेत्यांना वाटायचं. पण त्यांच्या थेट स्वभावामुळे त्यांचे पक्षातल्याच वरिष्ठ आमदारांशी खटके उडायला लागले.

त्यांच्या अशा वागण्यानं महाराष्ट्राची राजधानीत प्रतिमा डागाळली जाऊ लागली आहे असं बऱ्याच नेत्यांना वाटायचं. त्यातलेच एक होते उदयसिंह गायकवाड, कोल्हापूरचे खासदार.

एकदा दिल्लीच्या सेंट्रल हॉल मध्ये उदयसिंह गायकवाड, अरुण नेहरू, के. पी. सिंगदेव, हरीशास्त्री बोलत असताना गायकवाडांनी अरुण नेहरूंना प्रश्न केला कि, सर्वांचा विरोध असताना तुळशीदास जाधव यांचे जावई असल्यानं तुम्ही त्याना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं. त्यावेळी हायकमांडला सांगून तुम्ही वेळीच दक्षता का घेतली नाही ?

त्यावर अरुण नेहरू म्हणाले कि, महाराष्ट्राला सुशिक्षित मराठा स्वातंत्र्यसैनिक मुख्यमंत्री पाहिजे होते. या तिन्ही गोष्टी बाबासाहेब भोसले यांच्यात होत्या म्हणून त्यांची निवड केली. 

पुढं काही दिवसांनी बाबासाहेब भोसले यांच्या विरोधात तक्रारी येऊ लागल्या. त्यांना बदलून दुसरा मुख्यमंत्री करणार असल्याच्या चर्चा विधानभवनात होऊ लागल्या. त्याच वेळेला यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा या दोघांनी उदयसिंह गायकवाडांना बोलावून सांगितलं की,

आज ना उद्या या पदावरून भोसलेंना जावं लागणार आहे. अशावेळी आम्ही दोघांनी ठरवलं आहे कि तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मुंबईला जाणे आवश्यक आहे. आमचा दोघांचाही तुम्हाला पाठिंबा आहे. तुमचा मित्र परिवार इंदिराजींच्या जवळचा आहे. इंदिराजींनी आम्हाला विचारलं तर आम्ही हे त्यांना सांगतो. तुम्हीही त्यांना भेट.

यावर उदयसिंह गायकवाडांनी इंदिरा गांधींची भेट घेतली. त्यावेळी इंदिरा गांधी म्हणाल्या,

तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना भेटा त्यांचा कल बघा मी परदेश दौऱ्यावर चालले आहे तुम्ही नरसिंहरावांना कल्पना द्या. माझ्या नावाचा मात्र उल्लेख कुठे करू नका. 

त्यांनतर लागलीच गायकवाड मुंबईला आले. रित्झ हॉटेलमध्ये उतरले. त्यांच्याबरोबर त्यांचे कोल्हापूरचे कार्यकर्ते आनंदराव पाटील भेडसगावकर होते. गायकवाडांनी बऱ्यापैकी सर्व आमदारांना भेटीला बोलावलं. फक्त रामराव आदिक सोडले तर उरलेल्या १४० आमदारांनी मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीहून मुख्यमंत्री नेमला तर हरकत नाही अशी मान्यता देऊन सह्या केल्या.

पुढं काही अडचण नको म्हणून स्वतः गायकवाड आदिकांच्या भेटीला गेले, त्या भेटीत आदिक म्हणाले,

दिल्लीहून मुख्यमंत्री नेमण्याचा प्रश्न येतोच कुठं ? आणि तो आला तर आम्ही तो मान्य करणार नाही आम्ही ठरावच करणार आहे कि, महाराष्ट्राच्या आमदारांमधूनच मुख्यमंत्री निवडला जाईल. आणि आमदारच तो निवडतील. 

यावर गायकवाड म्हंटले, कि जर वरून नाव आलंच तर तुम्ही त्याला विरोध करू नये एवढीच विनंती. आणि गायकवाड तिथून निघून गेले. त्यानंतर घडल्या प्रसंगाची माहिती देण्यासाठी गायकवाड पहिल्यांदा नरसिंहरावांना आणि पुढं यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादांना भेटले.

आणि हे सगळं करून ते दिल्लीला निघणार त्याआधीच लोकसभेत ‘गायकवाडांना मुख्यमंत्री होण्याची घाई लागली आहे’ अशा आशयाची पत्रक वाटण्यात आली. एवढं कमी कि काय ती पत्रक इंदिरा गांधींच्या कार्यालयात ही वाटण्यात आली. या पत्रकांमुळे गायकवाड खूप व्यथित झाले. त्यांनी थेट इंदिरा गांधीच कार्यालय गाठलं.

त्यांनी ते पत्रक इंदिरा गांधींना दाखवलं आणि ते म्हणाले,

मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईन म्हणून काही लोकांनी हि पत्रक वाटली. आपण इथं नव्हता. पण त्या पत्रकात लिहिल्याप्रमाणे मी जर खरोखरच एवढा वाईट माणूस असेन तर पार्लमेंट मध्ये खासदार म्हणून राहायला लायक नाही. मी राजीनामा देतो.

त्यावर इंदिराजी शांतपणे उत्तरल्या, 

त्या पत्रकावर कुणाची सही आहे का ? नाही, मग त्याला फार किंमत द्यायची नाही म्हणून त्यांनी ते पत्रक फाडून बास्केटमध्ये टाकून दिलं. आणि समजुतीच्या स्वरात पुन्हा म्हंटल्या, अशी अनेक पत्रक सारखी येत असतात. अशा गोष्टी मनाला लावून घ्यायच कारण नाही. इजिप्तला शिष्टमंडळ जाणार आहे, त्या शिष्टमंडळातून तुम्ही जाऊन या. या विषयावर नंतर बोलू.

आणि हा विषय इथं बारगळला तो कायमचाच. कारण बाबासाहेब भोसलेंनंतर उदयसिंह गायकवाड यांच्या वाट्याला येणारं मुख्यमंत्री पद अलगद वसंतदादांच्या पदरात जाऊन पडलं. आणि कोल्हापूरचं मुख्यमंत्री पद हुकलं ते कायमचंच. 

हे हि वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.