सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरेंना या ‘७’ मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं आहे…

महाविकास आघाडी सरकारला सत्तेत आल्यापासून त्यांच्या कामाची कमी आणि वादाची आणि त्यांच्या समोरच्या आव्हानांची चर्चा जास्त आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शपथ घेतल्यानंतर अवघ्या २ महिन्यातच कोरोनाच्या संकटाला सुरुवात झाली होती, तिथं पासून सुरु झालेल्या आव्हानांची मालिका आज परमबीर सिंग आणि अनिल देशमुख यांच्या रूपानं आजतागायत सुरु आहे.

उद्धव ठाकरे सरकारला सामोरं जावं लागलेल्या अशाच ७ मोठ्या आव्हान आणि अडचणींचा घेतलेला आढावा 

कोरोना संकट : 

फेब्रुवारी – मार्च २०२० मध्ये राज्यात कोरोनाला सुरुवात झाली. त्यानंतर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हा वाढत गेला. त्यामुळे सुरुवातीला लॉकडाऊन आणि त्यातून लोकांना येणाऱ्या गैरसोयी दूर करण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर होतं. सोबतच याकाळात स्थलांतरित मजुरांना सुरक्षित ठिकाणी पोहचवणं हे देखील मोठं आव्हान होतं.

दुसऱ्या बाजूला मे ते जूनपर्यंत हा कोरोना रुग्णांचा आकडा इतका वाढला की, बेड मिळणं देखील कठीण झालं होतं. त्यासाठी जम्बो कोविड सेंटर, खाजगी रुग्णालय ताब्यात घेऊन हा आकडा नियंत्रणात आणणं हे देखील महत्वाचं होतं. आता पुन्हा हा आकडा वाढू लागला आहे, त्यामुळे सरकार समोर पुन्हा एकदा उपाययोजना करून ही रुग्णवाढ नियंत्रित करण्याचं आव्हान सरकार समोर आहे. 

सोबतच लॉकडाऊन काळात राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे ती पूर्वपदावर आणणं आणि रोजगार गमावलेल्याना तो पुन्हा मिळवून देणं हे अजूनही मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे.

कोरोनाच्या आव्हानानंतर उद्धव ठाकरे सरकारला संपूर्णपणे राजकीय आव्हानांना समोर जावं लागलं होतं. 

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या :

जून महिन्यांमध्ये अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासावरुन सरकारवर प्रचंड टीका झाली. तसचं यावरुन प्रचंड राजकारण सुरु झालं. हे प्रकरण नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला. संपूर्ण देशभरात या मुद्द्याची चर्चा झाली.

राजकारणादरम्यान आत्महत्या वरून या विषयाला इतके फाटे फुटत गेले की मूळ मुद्दा बाजूला राहिला आणि बॉलिवूडमधील घराणेशाही व त्यांनी बाहेरील अभिनेत्याला संधी नाकारण्याची कथा, बंगाली लोक आणि त्यांची काळी जादू, सिनेअभिनेत्यांकडून वापरण्यात येणारे ड्रग्ज आणि मुंबई पोलीस अकार्यक्षम असल्याचा आरोप केला गेला. 

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करत विरोधकांकडून यावरुन अनेक वेळा राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली. या दरम्यानच कंगना राणावतने देखील प्रचंड प्रमाणात सरकारवर टीका करून मुख्यमंत्री आणि एकूणच मंत्रिमंडळाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.

धनंजय मुंडे प्रकरण :

सुशांतसिंग राजपूत आत्महत्येचे प्रकरण शांत होते तो पर्यंत जानेवारी महिन्यात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.

त्यावर मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत एक फेसबुक पोस्ट देखील लिहिली होती. यात तक्रारदार महिलेची बहिण करुणा शर्मा हिच्याशी सहमतीने माझे संबंध असल्याचं मुंडे यांनी मान्य केलं. पण, बलात्काराचा आरोप पूर्णपणे नाकारला होता. मात्र या प्रकरणात देखील सरकारची प्रतिमा मालिन झाली. त्यावरून बरीच टीका झाली. 

विरोधकांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरलं होतं. त्यामुळे सरकारची प्रचंड अडचण निर्माण झाली होती. मात्र पुढे ४ दिवसांमध्येच संबंधित महिलेने ही तक्रार मागे घेतली होती.

पूजा चव्हाण – संजय राठोड :

पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने काही दिवसांपूर्वी पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात विदर्भातील एका मंत्र्यांसोबत किंवा महाविकास आघाडीतील एका मंत्र्यांसोबत परिचय असल्याची माहिती देण्यात आली.

या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचं माध्यमांमधून पुढे आल्यानंतर ते जवळपास १५ दिवस अज्ञातवासात गेले.

त्यामुळे सरकारवर विरोधकांकडून बरेच टोकाचे आरोप करण्यात आले. अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकारणातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी मंत्री राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला.

मनसुख हिरेन – सचिन वाझे :

मागच्या महिन्यातील २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. त्यानंतर सचिन वाझे यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास सुरु झाला. मात्र अंबानींनी निगडित असलेलं हे प्रकरण मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि त्यात सचिन वाझे यांचं सहभाग असल्याचा संशय इथं पर्यंत येऊन पोहचलं आहे.

विधिमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे आणि हिरेन यांचे फोन रेकॉर्डस् देखील दाखवले.

पुढे हे प्रकरण एनआयएकडे गेल्यानंतर त्यात वाझेंना अटक करण्यात आली आणि त्यांना सरकरांकडून निलंबित देखील करण्यात आलं. सोबतच याच प्रकरणात मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली.

पण सरकारचा पोलिस प्रशासनावर नियंत्रण नाही अशी टीका यात मोठ्या प्रमाणावर झाली.

परमबीर सिंग – अनिल देशमुख :

मनसुख हिरेन – सचिन वाझे प्रकरणाचा दुसरा अंक बघायला मिळाला तो परमबीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोप प्रत्यारोप रूपात. २ दिवसांपूर्वी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले.

यात अनिल देशमुख यांनी वाझेंना मुंबईतील बार चालकांकडून महिना १०० कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिलं असल्याचं सांगितलं. 

या आरोपांनंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. गृहमंत्र्यांनी हे आरोप फेटाळले मात्र ठाकरे सरकारमधील तिसऱ्या मंत्र्यांवर आरोप झाल्यानं सरकाराच्या प्रतिमेवर प्रचंड परिणाम झाला. भाजपकडून देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी राज्यात आंदोलन सुरू असून मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

सरकारमधील नेते मंत्र्यांच्या पाठीमागे आरोप आणि चौकश्यांच्या फेऱ्या :

सरकारमधील मंत्री आणि नेते यांच्यावरील आरोपांमुळे देखील ठाकरे सरकार अनेकदा अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळालं आहे. यात सिंचन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, कथित टॉप सिक्युरीटी घोटाळ्याप्रकरणी आमदार प्रताप सरनाईक, जमीन भूखंडात एकनाथ खडसे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी ५५ लाख प्रकरणात ईडीच्या रडारवर आल्या होत्या.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.