विराट कोहलीला जे जमलं नव्हतं ते या UPSC टॉपरने करून दाखवलय.

लहानपणी बारावीत असताना आम्हाला मित्राच्या मोबाईलवर एक वाॅलपेपर दिसलं. ते होत आपल्या इथल्या सुप्रसिध्द आयपिएस ऑफिसरचं. एकदम कडक युनिफॉर्म, चेहऱ्यावर करारी भाव. दोस्ताला विचारलं हे कोण? त्यान नाव सांगितलं. तो म्हणाला मी पण यांच्या सारखं हुणार हाय. मग म्हटल मी पण झालो तर चालेल?? तर मित्र म्हटला हो की भावा. फक्त एक परीक्षा पास झाली की झालं !!

नंतर आमच्या एका मास्तरनी सांगितलं भारतातली सगळ्यात अवघड परीक्षा असते ही. कोण असं पण म्हणत की या परीक्षेत जगातल्या पाठीवरच्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान लागत. रात्रंदिवस अभ्यास कराव लागत. इतिहास भूगोल सगळ याव लागत. इतिहासाची आवड शाळेत असल्यापासून होती. शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा काढला पासून गांधीबाबाच्या आंदोलनापर्यंत एक पण प्रश्न रिकामा सोडला नव्हता.

आपल्याला वाटलं हे युपीएससी आपण सहज काढतोय. न झेपणाऱ्या सायन्सला टाटाबाय बाय करून आर्ट्सला अॅडमिशन घेतलं. पुण्यात क्लास लावले. अभ्यास सुरु केला. भाषणात सांगितल्याप्रमाणे कुठल्या पोरी कड मान वर करून बघितलं नाही.(हळूच तिरक्या डोळ्यांनी टिपून घेतलं पण बाकी काही नाही) गेली काही वर्ष प्रामाणिक अभ्यास करतोय.

इतक्या वर्षात आमच पण मन झालं नाही असं नाही. झेड ब्रिज, एफसी रोड ची हिरवळ त्यांचे मित्र बगून आमचं पण मन पाघलायचं, सुरवातीच्या काळात अभ्यासिकेत शेजारी बसणारी एक पोरगी हसून बोलायचा प्रयत्न केली पण आपण आपल्या गुरूच्या आदेशाप्रमाणे मनावर कंट्रोल ठेवला. कधी तर फेसबुक वर दिसते. तीच लग्न झालय, तिला एक लेक आहे. आमची तपस्या मात्र आजही चालूच आहे. आमच्या रूममध्ये रुबाबदार पोलिसाच्या फोटो शेजारी आम्ही एक संदेश सुद्धा लिहून ठेवला होता.

“स्त्री नरक का द्वार है.”

नेहमी स्वप्नात आपल्या लाल दिव्याची गाडी,अंगावर सुद्धा कडक युनीफॉर्म आणि शेजारी गोड बायको हे एवढच छोटसं स्वप्न होत. अभ्यासाच्या पद्धतीमध्ये शंभर बदल करून बघितले. काय निकाल आमच्या बाजूने लागेना. दरवर्षी नंबर आलेल्यांचे अनुभव जाऊन ऐकून येतो. युट्युबवर सक्सेस मंत्रा ऐकतो. गहन विचार करतो.

सगळ्या क्लास मध्ये त्याच त्याच मुलांचे सत्काराचे कार्यक्रम होतात. सगळे तेच टिपिकल भाषण देतात,

“मी पहाटे उठायचो. १८-१८ तास अभ्यास केला. आई वडिलांचे आशीर्वाद भावा बहिणींचे प्रेम आणि गुरूंचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाल.”

क्लासवाईज ही गुरूंची नाव फक्त बदलत असतात. पेपरमध्ये फोटो छापून येतात. हलाखीच्या परिस्थितीत यश मिळवणाऱ्याचे  वर्णन करणारे लेख . दरवर्षी हेच.

काल यावर्षीचा निकाल लागला. मेस मध्ये जेवायला गेलो होतो. इच्छा नव्हती तरी नवीन आलेल्या पोरांमुळे टीव्हीवर पहिला नंबर वाल्याची मुलाखत बघितली. राजस्थानचा कनिश्क कटारिया पहिल्या नंबरने पास झाला होता. बोलता बोलता तो म्हणाला

“मेरे सक्सेस का क्रेडीट मै अपने माता पिता बेहेन और अपने गर्लफ्रेंड को देना चाहता हुं.”

काय??? जेवता जेवता घास गळ्यात अडकला. मेसमधले सगळे दीनवाणे चेहरे एकमेकांकडे वळले. गर्लफ्रेंड? विशीतला उत्तरकाळ सुरु झाला पण स्त्रीलिंगी व्यक्तीची झुळूक देखील जवळून गेली नव्हती.  आईशप्पत सांगतो. एवढ्या वर्षात कोण पण एवढ डेरिंग करून बोलल नव्हत.

अहो आपल्या देशात गर्लफ्रेंडबॉयफ्रेंड असणे म्हणजे पाप. तिथ ह्यो गडी अख्ख्या देशासमोर सांगतोय आपल्या गर्लफ्रेंड मूळ आपला पहिला नंबर आलाय. इंडिया बदल रहा है हेच खरं!!

विराट कोहली ते विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अनुष्काला सोबत घेऊन गेला म्हणून शिव्या खाल्ला होता. अहो आमच्या पुराणातल्या कथामध्ये सुद्धा मोठमोठ्या ब्रम्हर्षीची तपस्या अप्सरांमुळे भंग झालेली. त्या दिवशी टाळक्यात तिडीक गेली . खोलीत गेल्या गेल्या आपल्या आदर्शांचे  सगळे फोटो काढून टाकले. स्त्री नर्क का द्वार है फाडून टाकलं.

एवढी वर्ष आपल्याला गंडवण्यात आलेली. अख्खं तारुण्य यांच्या भूल थापापायी वाया घालवली. आज विराट कोहली मस्तपैकी लग्न केलाय. रोज एक सेन्चुरी मारतोय. अगोदर कनिश्क भेटला असता तर आपण पण एक मैत्रीण पटवली असती. सोनाबाबू जेवला काय विचारली असती. आईबाबा जाऊ दे तिच्यासाठी तरी फिरून जिद्दीने अभ्यास केला असता. आम्ही पण कनिश्क झालो असतो.

असो.

आता आमच्या खोलीत कनिश्क चे फोटो आहेत. फेसबुकचं डीअक्टीव्हट केलेलं अकाऊंट परत सुरु केलय. शेजारी पाजारी कोण हसून बोलेल वाट बघतोय. बघू. आता या वाळवंटात सुद्धा पाऊस पडेल. आमची पण पोस्ट निघेल. आम्ही पण भाषणात आमच्या गुरुचं म्हणजेच कनिश्कचं नाव घेऊ.

जाता जाता: कनिश्क कटारिया आयआयटी मुंबईमध्ये शिकलाय. तिथून त्याला दक्षिण कोरिया मध्ये त्याचं पॅकेज १ कोटी रुपयांचं होत. त्याचे वडील आणि काका देखील आयएएस अधिकारी आहेत. त्याची गर्लफ्रेंड काय करते हे अजून कळलेले नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.