देशाच्या पहिल्या महिला पायलटने केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनसमोर आत्ताचं ऑपरेशन कायच नाय

विमान आणि महिलांचं नाव घेतलं तर आपल्यातील अनेकांना ‘नीरजा’ चित्रपट आठवेल. भारताचं विमान जेव्हा १९८६ मध्ये हायजॅक करण्यात आलं होतं तेव्हा भारताच्या नीरजा नावाच्या बहादूर एअरहोस्टेसने सर्व प्रवाशांना सुखरूप सोडवण्यात स्वतःच्या जीवाची बाजी लावली होती. नारी शक्तीचं, धाडसाचं आणि सामर्थ्यचं दर्शन घडवून देणं आणि नीरजा यांची जगाला ओळख करून देणं हाच या चित्रपटाचा उद्देश्य.

मात्र हवाई जगताशी जोडलेल्या अजून एका महिलेने मोठी कामगिरी करत भारताच्या इतिहासात आपलं नाव कोरलेलं आहे. त्यांची ओळख स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पायलट अशी तर आहेच, मात्र त्यापेक्षा मोठी ओळख म्हणजे त्यांच्यामुळेच अनेक भारतीयांना जीवनदान लाभलं होतं. त्या भारतीयांच्या आयुष्यात तेव्हा मदतीला आल्या जेव्हा भारत त्याच्या सगळ्यात नाजूक काळातून जात होता. तो काळ म्हणजे ‘हिंदुस्थानची फाळणी’

तो काळ म्हणजे ‘हिंदुस्थानची फाळणी’. आणि या हवाई रणरागिणीचं नाव आहे ‘उषा सुंदरम’

वय वर्ष फक्त २० जेव्हा त्यांच्या नावापुढे ‘पायलट’ लागलं. त्यांना विमान चालवण्याचं प्रशिक्षण दिलं ते त्यांचे पती व्ही. सुंदरम यांनी. १९४१ मध्ये उषा यांचं लग्न व्ही.सुंदरम यांच्या सोबत झालं. १९४६ मध्ये ते बंगळुरूला आले. तिथे गार्डन सिटीमध्ये त्यांनी त्यांच्या छोटयाशा संसाराला सुरुवात केली. व्ही. सुंदरम चांगले प्रशिक्षित वैमानिक होते. म्हैसूर संस्थानासाठी नागरी विमान वाहतूक संचालक म्हणून त्यांनी पदभार सांभाळला होता. 

लग्नाच्या काही काळानंतर उषा यांनी देखील वैमानिक होण्याची इच्छा दर्शवली होती. त्यानुसार त्यांच्या पतीने त्यांना साथ दिली आणि स्वतंत्र भारताच्या पहिला महिला पायलट म्हणून त्यांची वाटचाल सुरु झाली होती. 

व्ही.सुंदरम एक कुशल वैमानिक होते, जे मद्रास फ्लाइंग क्लबमध्ये प्रशिक्षक होते. त्या काळात को-पायलट परवाना मिळवणं फार कडक नव्हतं. म्हणून व्ही.सुंदरम यांच्या फ्लाइटमध्ये उषा अनेकदा सह-वैमानिकाची जागा घ्यायच्या. अशाप्रकारे चाळीसच्या दशकात अनेक मोठमोठ्या नेत्यांच्या विदेश वाऱ्या घडवून आणण्यात या जोडप्याचं मोठं योगदान राहीलं.

व्ही. सुंदरम यांनी उषा यांना विमान चालवण्यात चांगलंच पारंगत केलं. लायसन्स मिळायच्या आधीच त्या प्रशिक्षित वैमानिक बनल्या होत्या. कित्येक वाऱ्या त्यांनी एकटीने पूर्ण केल्या होत्या. त्यातही खास गोष्ट म्हणजे पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलम आझाद अशा अनेक बड्या व्यक्तिमत्त्वांच्या महत्वाच्या हवाई वाऱ्या त्यांनीच घडवून आणल्या. 

चाळीसच्या दशकात सरदार वल्लभभाई पटेल यांनी ब्रिटीशांपासून स्वातंत्र्यानंतर भारताचे एकीकरण करण्याच्या त्यांच्या ऐतिहासिक प्रयत्नात देशभर प्रवास केला. तेव्हा विशीतील एक तरुण मुलगी उषा अनेकदा त्याच्या फ्लाइटसाठी वैमानिक होती. आणि विशेष म्हणजे लवकरच ती त्यांची जवळची मैत्रीण बनली. 

जक्कूरमधील फ्लाइंग क्लबची पहिली पदवीधर म्हणून देखील उषा यांना इतिहास ओळखतो.

त्यांच्या अनेक मोठ्या ऑपरेशन्सपैकी एक म्हणजे भारताची फाळणी.

जेव्हा भारताची फाळणी झाली होती तेव्हा खूप भयानक परिस्थिती उभी ठाकली होती. जिकडे तिकडे असंतोष होता. भारत आणि पाकिस्तान असे दोन राष्ट्र तयार होत असताना सामान्य जनतेच्या मनात भीती होती. सगळीकडे हिंसा दिसत होती. अशा स्थितीत अगदी प्रतिकूल वातावरणात आणि हिंसेच्या कचाट्यात अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी उषा पुढे आल्या होत्या.

भले भले पायलट जेव्हा जीवाची पर्वा करत मागे सरकत होते, तेव्हा उषा यांनी धाडसाने पाकिस्तानाच्या दिशेने उड्डाण केलं. पाकिस्थानात अराजकता पसरली होती, कुणावर विश्वास ठेवावा याबद्दल संभ्रम लोकांत होता. अशावेळी तिथे अडकलेल्या लोकांना ज्यांना भारतात यायचं होतं, त्यांना विश्वास देत उषा यांनी विमानाने सुरक्षितपणे भारतीय भूमीत परत आणलं.

भारतीय लोकांसाठी उषा तेव्हा देवदूत बनून अवतरल्या होत्या, असं लोक म्हणत होते.

उषा यांनी अनेक महत्वाच्या कामगिरी फत्ते केल्या आहेत. उषा आणि त्यांचे पती महाराजांच्या वैयक्तिक विमान, डकोटा DC-3 चे पायलट बनले होते. प्रतिकूल हवामानातही अगदी कुशलतेने उड्डाणांचे नेतृत्व करणं, कमी उंचीवर प्रवास करणं, आवश्यक असलेल्या बचाव मोहिमा यशस्वी करणं, अशा अनेक घटनांमध्ये उषा सुंदरम यांचं नाव आजही भारतीय विमान संस्था घेते.

१९५० मध्ये तत्कालीन मद्रास सरकारने राज्यासाठी विमान खरेदी करण्यासाठी सुंदरम यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सुंदरम आणि उषा जहाजाने इंग्लंडला गेले आणि त्यांनी एक नवीन डी हॅविलँड डोव्ह विमान खरेदी केले जे त्यावेळी विमान क्षेत्रातील मोठं आश्चर्य होतं. त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड देखील आहेत.

खूप कमी वयात पायलट बनलेल्या उषा यांनी कमी वेळातच व्यावसायिक उड्डाणातून निवृत्ती घेतली. आपल्या तीन मुलांचा सांभाळ करण्यासाठी हा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र फार कमी वेळात त्यांनी भारताच्या स्त्रीयांसाठी आदर्श उभा केलाय. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.