खांडेकरांच्या ‘ययाती’ चा नरसिंहरावांनी तेलुगु भाषेत अनुवाद केलेला

ययाती..! वि. स. खांडेकरांना ज्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळाला ती कादंबरी. 

प्रत्येकांनी कॉलेजच्या दिवसात वाचलेली कादंबरी. एखाद्या गोष्टीचा अट्टाहास माणसाला कुठल्या कुठे नेऊ शकतो हेच सांगणाऱ्या कादंबरीबाबत आता प्रत्येकांची मतं वेगवेगळी असणार. त्यातली स्वतःचं मनोगत सांगणारी ययाती, शर्मिष्ठा आणि देवयानी ही लक्षात राहणारी पात्रं. ययाती राजाची यौवनात राहण्याची धडपड. त्यातल्या सुंदर असलेल्या देवयानीचा मात्र आपल्याला राग येतो. संयमी असं पात्र म्हणजे कच.

तेच पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून स्वतःच्या सर्वस्वाचा त्याग करून निमूटपणे दासीपण स्वीकारणारी शर्मिष्ठा. शर्मिष्ठाचं पात्र वाचून वाटतं की नशीब म्हणजे हेच असतं का? असो ययाती वाचताना आपण त्यातच हरवून जातो…शेवटी लेखकाची कमालच आहे ती!

मराठी वाचकांना वेड लावणाऱ्या कादंबरीने तेलुगू भाषिकांना देखील वेड लावलंय… इंटरेस्टिंग म्हणजे त्यामागचं श्रेय आपल्या देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना जातं.

आश्चर्य वाटलं ना??  होय तेलुगू भाषिकांना ययाती वाचण्याची संधी मिळाली ते नरसिंह राव यांच्या मुळेच.  

खांडेकरांच्या याच ‘ययाती’ चा नरसिंहरावांनी तेलुगु भाषेत अनुवाद केलेला 

नरसिंह राव यांना इंदिरा गांधींचा चाणक्य म्हणून ओळखलं जायचं. तीक्ष्ण बुद्धी, राजकारणाचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले नरसिंह राव यांचं आणि साहित्याचं काय कनेक्शन असेल? स्व. नरसिंह राव हे एक थोर विचारवंत, कुशल प्रशासक आणि तितकेच सुसंस्कृत आणि संवेदनशील साहित्यिक होते.

तसेच राव यांनी मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो?’ या सामाजिक मराठी कादंबरीचं तेलुगूमध्ये भाषांतर केलं होतं. तर तेलुगू ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विश्वनाथ सत्यनारायण यांच्या वेईपडागालूचं हिंदीमध्ये भाषांतर केलं होतं.

आता हा प्रश्न येतो की, मराठी भाषेचा आणि त्यांचा संबंध कधी आला ? 

राव यांच्याबाबतची कौतुकास्पद गोष्ट म्हणजे ते उत्तम साहित्यिक तर होतेच, शिवाय ते १७ भाषा बोलू शकणारे बहुभाषिकही होते. तेलुगू, हिंदी, ओडिया, बंगाली, गुजराती, कन्नड, संस्कृत, तमिळ, उर्दू आणि मराठी अशा ९ भारतीय भाषा त्यांना यायच्या, तर इंग्रजी, फ्रेंच, अरबी, स्पॅनिश, जर्मन, ग्रीक, लॅटिन आणि पर्शियन अशा ८ परदेशी भाषा देखील त्यांना उत्तम यायच्या. राव हे तेव्हाचे आंध्र प्रदेश आणि सध्याचे तेलंगणा येथील रहिवासी असलेले भारताचे पहिले पंतप्रधान होते.

संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तेलुगू या भाषांवर त्यांचं विशेष प्रभुत्व होतं. राव यांनी तेलुगू अकादमीची स्थापना केली. तसेच त्यांनी त्यांच्या भावाच्या ‘काकतिया’ या वृत्तपत्रात पत्रकार आणि नंतर संपादक म्हणून काम केलं होतं.

राव त्यांच्या द इनसाइडर’ हे आत्मचरित्रात लिहितात की, या साहित्यिक लिखाणाचा प्रभाव त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर देखील पडला. 

त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातल्या नागपूरशी आणि पुण्याशी आपलं खास कनेक्शन आहे…

जेव्हा ते महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आणि बीएस्सी अभ्यासक्रमासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच काळात त्यांचं मराठीवर प्रभुत्व विकसित झालं.

त्यानंतर राव यांनी नागपूरच्या लॉ कॉलेजमधून लॉ ची पदवी घेतली होती. नागपूर विद्यापीठाबरोबर सुद्धा त्यांचा जवळचा संबंध होता. एवढंच नाही तर, त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं, जिथं त्यांनी मराठीत भाषण केलं होतं. त्या पिढीतील नागपूरमधील अनेकांबरोबर त्यांचा अतिशय जवळून परिचय होता. 

त्यांना आधुनिक काळातील चाणक्य म्हणलं जातं कारण..

एक सुसंस्कृत राजनीतीतज्ञ म्हणून देशात त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली होती. तसेच स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. 

ज्यावेळी नरसिंह राव पंतप्रधान होते त्यावेळी देशाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. 

सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की, आज जसा आपला फॉरेन एक्सचेंजचा स्टॉक आहे तसा त्यावेळी नव्हता. तसेच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग रिझर्व बँकेचे गव्हर्नर या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांना नरसिंह राव यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये अर्थमंत्री म्हणून घेतलं होतं. तेव्हा त्यांनी या देशात आर्थिक सुधारणांचा पाया सर्वप्रथम घातला होता. त्यांच्याच प्रखर दूरदृष्टीनं भारताला आर्थिक संकटातून बाहेर पडता आलं.

म्हणूनच त्यांना भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक म्हणलं जातं…आणि त्यांच्या साहित्यातील योगदानामुळे त्यांना एक उत्तम साहित्यिक म्हणूनही गणलं जातं.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.