जिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून ४,००० विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये असतात

जगातली तिसरी आणि भारतातील पहिली “झिरो एनर्जी स्कूल” म्हणून वाबळेवाडीच्या शाळेचा उल्लेख केला जातो. या शाळेला बॅंक ऑफ न्युयार्कचे प्रतिनिधी देणगी देण्यासाठी येवून गेले. हि शाळा जिल्हा परिषदेची शाळा पण या शाळेची वेटिंग लिस्ट लागते. गेल्या वर्षी वेटिंग लिस्टमध्ये चार हजार मुले होती. सध्या शाळेत सहाशे विद्यार्थी आहेत.

कधीकाळी दोन पडक्या खोल्यामध्ये भरवण्यात येणारी हि शाळा आज जिल्हा परिषद शाळांसाठी सर्वात मोठ्ठी रोल मॉडेल ठरलेय. 

आणि यासाठी कारणीभूत ठरलेत ते वारे गुरूजी. 

हि गोष्ट जितकी शाळेच्या विकासाची आहे तितकीच शिक्षणक्षेत्रात आपण काय करु शकतो दे दाखवण्यासाठी डोळ्यात झणझणीत अंजण घालणारी देखील आहे. 

वाबळेवाडी हे गाव शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पासून अडीच किलोमीटरवरच गाव. वाबळेवाडीची लोकसंख्या म्हणजे पन्नास ते साठ घरांच छोटस गाव. गावाची लोकसंख्या साडेतीनशे. सहा वर्षांपुर्वी गावची जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे फक्त दोन गळक्या खोल्या. पडक्या भिंती. याच खोल्यामध्ये मुलं शिकायची.

साल होतं जुलै २०१२.

या वर्षी जानेगाव येथून बदली होवून नवीन शिक्षक आले. पडक्या खोल्या पाहून एखाद्या शिक्षकानं काय केलं असत तर आपल्या सगळे कॉन्टेक्ट वापरून बदलीसाठी प्रयत्न केले असते. पण वारे गुरूजी वेगळे होते. वारे गुरूजी नवीन आव्हानं घेण्यासाठी ओळखले जायचे. 

वारे गुरूजी विद्यार्थांना शिकवण्यास सुरवात केली. दोन छोट्या खोल्या. त्यामध्ये दोन शिक्षक आणि सर्व इयत्तेची मुले एकत्र अस एकंदरित चित्र. हे चित्र बदलण्यासाठी वारे गुरूजींनी १५ ऑगस्ट २०१२ मध्ये वाबळेवाडीच्या ग्रामसभेत एक आराखडा मांडला.

शाळा जागतिक पातळीवर घेवून जाण्यासाठी काय करता येईल हे मांडणारा तो आराखडा. दोन पडक्या खोल्यामधून जागतिक दर्जाची शाळा निर्माण करणं म्हणजे हास्यास्पद गोष्ट होती पण वारे सरांनी ते काम मनावर घेतलं. गावच्या लोकांना यातलं विशेष माहित नव्हतं पण त्यांना एकाच गोष्टीवर ठाम विश्वास होता तो म्हणजे वारे गुरूजी म्हणतायत म्हणजे काहीतरी चांगल होईल. 

संपुर्ण गावाने एकत्र येवून झटायचं असा तो ठराव होता. २०१२ साली गावात एकूण १९ महिला बचत गट होते. या बचत गटांनी एक गोष्ट ठरवली ती म्हणजे पुढची तीन वर्ष आपणाला जो काही नफा होईल तो शाळेला द्यायचा. पै अन् पै गोळा करुन संसार उभा करणाऱ्या महिलांच्या दृष्टीने पाहिलं तर ही गोष्ट खूप क्रांन्तीकारी वाटेल. बचत गटांसोबत गावातले तरुण धावून आले. नवरात्र आणि गणेशोत्सवांसारख्या सणांचा खर्च कमी करून तो पैसा शाळेसाठी उभा करण्याच ठरवण्यात आलं. 

वाबळेवाडीची हि शाळा का उभा राहू शकली याचं मुख्य कारण म्हणजे गाव आणि शाळा एकत्र आली.

शाळेतील शिक्षकांवर गावाने विश्वास दाखवला आणि शिक्षकांनी देखील तो सार्थ करून दाखवला. शिक्षक प्रयोग करत आहेत म्हणल्यानंतर शाळेची विद्यार्थीसंख्या देखील वाढू लागली. गावाची मदत कशी होत गेली याबद्दल सांगायच झालं तर गावात यात्रेनिमित्त तमाशा आयोजित करण्यात आला होता.

सुमारे सव्वा लाख रुपये यात्रा कमिटीमार्फत तमाशासाठी गोळा करण्यात आले होते. वारे गुरूजींनी यात्रा कमिटीची भेट घेतली, तेव्हा यात्रा कमिटीने तात्काळ १ लाख २० हजार रुपयांची रक्कम वारे सरांना देण्याच मंजूर केलं. त्या रकमेतून वारे सरांनी विद्यार्थांना टॅब घेतले. 

महाराष्ट्रातील पहिले टॅब स्कूल म्हणून या शाळेचा उल्लेख करावा लागतो. हे पैसै तमाशासाठी गोळा करण्यात आले होते. ते खऱ्या अर्थाने सत्कारणी लागले. 

आज शाळेची जी इमारत आहे ती गावकऱ्यांनी दिलेल्या जागेवर आहे. नवीन खोल्या बांधाव्यात म्हणून वारे सरांनी गावकऱ्यापुढे आपलं म्हणणं मांडल. गावकऱ्यांनी देखील सुमारे दिड एकर शेती बक्षीसपत्र करून शाळेच्या नावावर केली.

तालुक्यातल्या जमिनीचे भाव पाहता दिड एकर जमिनीची किंमत अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिक होते. हळुहळु शाळा रुपडं बदलत असताना गावकऱ्यांनी पुन्हा नजीकची दिड एकर जमीन शाळेसाठी देवू केली. 

शाळेमध्ये सुमारे दोनशे विद्यार्थी झाले. तरिही खैरे सर आणि वारे सर असे दोनच शिक्षक विद्यार्थांना शिकवण्याच काम करत होते. सर्व इयत्तेच्या विद्यार्थांना शिकवण्यासाठी दोघांनी मिळून अभिनव अशा संकल्पना सुरू केल्या. दहा दहा विद्यार्थांचे गट तयार करुन त्यांना वरच्या वर्गातील एक विद्यार्थी विषय मित्र म्हणून देण्यात आले. छोटे प्रयोग करुन विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थांमध्ये रुजवण्यात आल्या. 

शाळेची किर्ती सर्वदूर पोहचू लागल्यानंतर एक दिवस बॅंक ऑफ न्यूयार्कचे काही अधिकारी शाळेला भेट देण्यासाठी आले. त्यांनी शाळेला देणगी देण्याची भावना बोलून दाखवली. नक्की कोणत्या प्रकारची शाळा हवी असे विचारल्यानंतर वारे सरांनी त्यांना शाळेचे डिझाइन दाखवले. ते डिझाइन पसंत पडले. नव्याने शाळेची रचना करण्यात आली. आतराष्ट्रीय दर्जाची मिळतीजुळती अशी झिरो एनर्जी स्कुलची निर्मीती करण्यात आली.

जपान आणि आयर्लेंड सोडल्यानंतर जगातली हि तिसरी शाळा ठरली. 

अनुभवातून शिक्षण देण्याच सुत्र शाळेने स्वीकारलं. दिवाळीच्या सुट्टीत मुलांना पोहायला शिकवण्याची जबाबदारी देखील शाळेने घेतली. संगीत, नाटक अशा प्रत्येक गोष्टीत विद्यार्थांची रुची वाढवण्यात आली. मुलांनी श्रमसंस्कार मिळावेत म्हणून पंचक्रोशीत झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. त्यातूनच परिसरात सुमारे एक लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. 

शाळेची यशस्वी घौडदौड पाहून राज्यसरकारकडून दहा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. आज शाळेत बारा शिक्षक आहेत. ओजस च्या उपक्रमातून शाळेत आठवीपर्यन्तचे वर्ग निर्माण करण्यात आले. आज शाळेत नववी प्रर्यन्तचे वर्ग आहेत. तर भविष्यात १२ वी पर्यन्तचे शिक्षण देण्यात येणार आहे. १२ वी पर्यन्तचे शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा असण्याचा सन्मान वाबळेवाडीच्या शाळेला मिळणार आहे. आज शाळेची विद्यार्थीसंख्या सुमारे सहाशे असून चार हजार विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत. आणि विशेष म्हणजे हि शाळा आजही मराठी माध्यमच आहे. 

दत्ता वारे सरांचा फोन नंबर : 08668515224 

इमेल आयडी : dattajiware@gmail.com 

हे हि  वाच भिडू. 

1 Comment
  1. Tushar says

    Khup chan….asach pratyek mahanagar palikechya shalanchya shiskshanach darja quality vadvali pahije…jene karun private school cha jo ha dhanda mandlay to kami hoil.

    Well done ware sir. Proud of you.

Leave A Reply

Your email address will not be published.