आईस्क्रीम पासून केकपर्यंत सगळ्यातच वापरल्या जाणाऱ्या व्हॅनिलाच्या काड्या अशा घावल्या

जेव्हा केव्हा आईसक्रीम चा विषय निघतो तेव्हा फक्त आणि फक्त व्हॅनिलाचा विषय निघतो. म्हणजे कुठल्याही व्यक्तीने आईसक्रीम खायला सुरुवात केली असेल ती व्हॅनिलानेच….या गोष्टीत कुणाचं दुमत असणार नाही. पण हा व्हॅनिला येतो कुठून याच्याशी कोणाचचं काहीच देणंघेणं नसतं. नाही म्हणायला सगळ्यांना व्हॅनिला इसेन्स तेव्हढा माहीत असतो. आज काल तर हा फ्लेवर इतका कॉमन झालाय सगळीकडेच व्हॅनिला व्हॅनिला असतं. 

 पण शेवटी व्हॅनिला इसेन्स म्हणजे काही साधी सुधी गोष्ट नाही.

व्हॅनिला ह्या स्वादाचा जन्मप्रवास किती अवघड आहे हे जेव्हा कळलं तेव्हा मानवाच्या बुद्धिमत्तेचा, कल्पकतेचा अज्ञात अविष्कार, किती विविध आणि सर्वव्यापी आहे ह्याची पण जाणिव होते.

व्हॅनिला ही फुलवेल असते. इतर फुलझाडांप्रमाणे फुलाचे फळात रुपांतर होण्याची नैसर्गिक प्रक्रिया मात्र ह्या कमनशिबी वेलीत नाही. कोणे एके काळी त्यावरच अवलंबून असल्याने व्हॅनिलाचा प्रसार व उपलब्धता अति मर्यादित होता. अशा या व्हॅनिलाची कुळ, मुळ आणि फुल, फळ कथा हजारो वर्षे मागे जाते.

व्हॅनिलाचा उगम आहे मेक्सिकोमध्ये. मेक्सिको आणि इतर दक्षिण अमेरिकेतल्या देशात जेव्हा अझटेक ही जमात हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात होती तेव्हा त्यांना व्हॅनिला ही रसदार चव माहिती होती. त्या वेलीची ते लागवड करायचे. ती मंडळी ह्या वेलीला तेव्हा काय नांवाने ओळखायचे ! ते एक फक्त त्यांनाच ठाऊक.

अझटेक लोकांचे खास ड्रिंक झोकोलोट्ल हे कोकोच्या बिया, मध आणि व्हॅनिला ह्याच्या मिश्रणातून तयार व्हायचे, कोर्टेझ ह्या स्पॅनिश जगप्रवासी साहसवीराने व्हॅनिलाची रोपे आणि रस हा युरोपात आणला. स्पेन आणि पोर्तुगाल तसे तुलनात्मक उष्ण देश असले तरी व्हॅनिलाची लागवड करण्याचे प्रयत्न जेमतेम ५% च यशस्वी झाले. ते सुद्धा का झाले? हे त्यांना कधीच कळले नाही. त्यामुळे व्हॅनिलाचा अर्क हा तेव्हा महाग असलेला स्वाद होता.

व्हॅनिलाची वेल ही आधार घेऊन वाढत जाणारी वेल आहे. ऑरकिडच्या एका जातीपैकी एक आहे. जाड आणि हिरवी अशी ही मुळ वेल असंख्य नरण्या वाढवून जमेल तसं पकड घेत घेत वाढत जाते. पिवळसर नारंगी रंगाची छटा असणारे फुलांचे गुच्छ साधारण २ महिने टिकतात. परंतु प्रत्येक वेलावर एका दिवशी एकच फुल उमलते. पूर्ण गुच्छ उमलेपर्यंत ही प्रक्रिया चालू असते.

व्हॅनिलाची फुले तर उमलतात पण पराग रोचन (Pollinisation) झाले नाही तर फळं निर्मितीचा टप्पा गाठला जात नाही. हे पराग रोचन करण्याची क्षमता फक्त मेक्सिको मधल्या “चिमण्या आणि मधमाशांच्या” मधेच आहे. कारण परागांना जिथं रोपायचं असतं तिथं जाड आवरण असतं आणि ते भेदण्याची क्षमता फक्त मेक्सिकोमधील चिमण्यांमध्येच होती.

इतर देशातल्या माशा हे काम करू शकत नाहीत हे पहिल्यांदा बेल्जियम मधल्या एका बॉटनिस्टच्या लक्षात आलं. ते साल होतं १८३६ चं. आणि या बॉटनिस्टच नाव होतं चार्ल्स मोरेन. 

शेवटी १८४१ मध्ये एडमंड अलबियस या एका कामगार गुलामाने आपलं डोकं वापरलं. पहाटे-पहाटे त्यान एका बारीक काडीचा उपयोग करून टाकलेले पराग उघडे केले आणि चक्क आपल्या हाताच्या अंगठ्याने ते पसरवले. फलधारणा करण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला. आणि त्यानंतर हीच पद्धत मेक्सिकोच्या बाहेर संपूर्ण जगभर दीडशे वर्षापासून सुरु आहे.

व्हॅनिलाच्या झाडाची फुलं साधारण दोन महिने टिकतात. व्हॅनिलाच्या शेंगा वालाच्या शेंगासारख्या चपट्या असतात. साधारण आठ इंच लांबीच्या एका वेलीला अंदाजे पन्नास ते दीडशे शेंगा येतात. साधारण सहा किलो शेंगा पासून एक किलो बिया मिळतात. हिरव्या शेंगा पिवळ्या व्हायला लागली की शेंगा काढायला तयार होतात.

शेंगा काढल्या तरी आतल्या बिया अजून तयार नसतात. शेंगा उन्हात वाढवण्यासाठी काही दिवस प्रखर सूर्यप्रकाशात उघड्यावर टाकल्या जातात. दिवसा उन्हाने भाजलेल्या या बिया रात्री दवामुळे ओलसर होतात. जेव्हा या बिया तेलकट आणि मऊसर होतात तेव्हा मग त्या सावलीत १२ महिने ठेवण्यात येतात. फुले आल्यापासून बिया तयार होईपर्यंतच्या प्रवासाला अंदाजे नऊ महिने लागतात.

आजही मेक्सिको या व्हॅनिलाची निर्यात करण्यात अग्रक्रमावर आहे. आज-काल कृत्रिम रासायनिक वॅनिला इसेन्स पण बाजारात मिळतो. तुम्हाला आम्हाला सहजासहजी या असली आणि नकली व्हॅनिलातला फरक करणं अवघड असतं. पण इसेन्स कोणता का असेना आपल्या आइस्क्रीमची चव जोवर बदलत नाही तोपर्यंत व्हॅनिला आईस्क्रीम ते व्हॅनिला आईस्क्रीमच!

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.