एक कारखाना असा होता जो दिवाळी बोनस म्हणून कामगारांना ४ महिन्याचा पगार द्यायचा..

महाराष्ट्राच्या आजवर झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रियता कोणी अनुभवली असेल तर ते होते  सांगलीचे वसंतदादा पाटील. दादा लोकनेते होते. जनमानसाची नस त्यांनी अचूक ओळखली होती. मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या घराची दारे सताड उघडी असायची. कोणीही कधीही त्यांची भेट घेऊ शकायचा आणि अगदी साध्या साध्या मागण्या देखील मांडू शकायचा. दादा अगदी वडीलधाऱ्या व्यक्ती प्रमाणे त्या समस्या सोडवायचे.

वसंतदादा पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेली देणगी म्हणजे सहकारी चळवळ.

पन्नासच्या दशकात महाराष्ट्रात साखर कारखानदारीमध्ये सहकार शिरला आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात विकासाची गंगा वाहू लागली. यात अनेक नेत्यांचा सहभाग होता. पण त्याच खरं नेतृत्व केलेलं वसंतदादा पाटलांनी.

सातवी पास वसंतदादा पाटलांनी अगदी लवकर सहकाराचं महत्व ओळखलं आणि सर्वप्रथम ते आपल्या सांगली जिल्ह्यात रुजवलं. याची सुरवात झाली त्यांनी उभारलेल्या शेतकरी सहकारी साखर कारखान्यापासून.

१९५२ मध्ये केंद्र सरकारने उठविलेल्या साखरेवरील नियंत्रणामुळे साखरेची मागणी वाढली आणि साखरेच्या वाढीव उत्पादनाची गरज देशाला भासू लागली. त्या काळात साखरेची आयात करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नव्हता. या परिस्थितीचा आढावा घेऊन डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना सहकारी साखर कारखानदारीचे महत्त्व पटवून दिले.

त्याच कारणाने पंडित नेहरूंनी भारतात २३ नव्या कारखान्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्यात मुंबई राज्यातील १२ नव्या कारखान्यांचा समावेश होता. त्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यात बिद्री, पंचगंगा आणि वारणा सहकारी साखर कारखाना या तीन, तर सातारा जिल्ह्यात कृष्णा सहकारी साखर कारखान्याला परवानगी मिळाली.

दोन्ही जिल्ह्यांत भाग भांडवल जमा करण्याच्या मोहिमा सुरू झाल्या. शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर्स घ्यावेत, यासाठी साखर कारखान्यांचे प्रवर्तक कामाला लागले. शेतकऱ्यांना सहकारी साखर कारखानदारीचे महत्त्व पटवून सांगू लागले. या सर्व हालचालींचा अपेक्षित परिणाम वसंतदादांवर झाला. सांगली जिल्ह्यात साखर कारखाना उभा केला पाहिजे, या भावनेने उचल खाल्ली.

सांगली जिल्ह्यात कृष्णा, वारणा आणि येराळा या नद्या असूनही जिल्हा कोरडवाहूच होता. उसाचे क्षेत्रही नाममात्र असेच होते. ऊस नसताना साखर कारखाना सुरू करणे हे अव्यवहारी ठरणार होते.

दादांनी दिलेल्या हमी आणि विश्वासामुळे मुंबई सरकारने सांगली जिल्ह्यात नियोजित सहकारी साखर कारखान्यास पाच लाख रुपये भाग भांडवल जमा करण्यास परवानगी दिली. दादांनीही आपल्या सर्व सहकाऱ्याच्या मदतीने साखर कारखान्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मोर्चेबांधणीस सुरुवात केली.

३१ मे १९५६ रोजी जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष स्वामी रामानंद भारतींच्या अध्यक्षतेखाली प्रगतिशील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीत नियोजित साखर कारखान्याच्या वाटचालीची दिशा ठरविली. कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून बॅ. जी. डी. पाटील यांची निवड करण्यात आली. भाग भांडवल जमा करणे हे खूप मोठे आव्हान होते.

वसंतदादांच्या शब्दांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर्स घेतले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचीही कारखान्याच्या भाग भांडवल उभारणीस मदत झाली. शेअर्स खरेदीसाठी शेतकऱ्यांना कर्ज देणे हे जिल्हा बँकेने केलेले बँकिंग क्षेत्रातील खूप मोठे धाडस मानले गेले.

केवळ एक महिन्यात तीन लाखांचे भाग भांडवल जमा करण्यात यश मिळाले. केंद्र सरकारने त्या शिफारशीनुसार सांगलीच्या एक हजार टन गाळप क्षमतेच्या साखर कारखान्यास मंजुरी दिली.

भाग भांडवल, इतर शासकीय तांत्रिक प्रक्रिया आणि कारखाना उभारणी कर्जासाठी पाठपुरावा या बाबी मार्गी लागल्या होत्या. आता कारखानास्थळाचा विषय ऐरणीवर आला होता. स्वामी रामानंद भारती यांना कारखाना तासगाव परिसरात व्हावा असे वाटत होते. आबासाहेब शिंदे यांनी पूर्वी म्हैसाळ परिसरात कारखाना उभा करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे त्यांना कारखाना म्हैसाळ परिसरात व्हावा असे वाटत होते; तर बॅ. जी. डी.पाटील यांना कारखाना सांगलीतच व्हावा असे वाटत होते.

सर्वच भागांत कारखान्याच्या नियोजित जागेचा शोध घेण्यात आला. अखेर सर्वानुमते सांगलीच्या माळावर कारखान्यासाठी जागा घेण्याचा निर्णय झाला. त्यासाठी जमीनमालकाशी वाटाघाटी करून ९० एकर जमीन ८५ हजार रुपयांना खरेदी करण्यात आली.

कारखान्याचा उभारणी काळ हा स्वतः वसंतदादा पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांसाठी एक मंतरलेला असाच काळ होता. स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येकजण झपाटलेला होता.

कामाची सुरुवात झाली तेव्हा बोटांवर मोजण्याएवढाच कर्मचारी वर्ग होता. एक सिव्हिल इंजिनिअर, दोन पर्यवेक्षक, दोन मिस्री, दोन शिफ्ट केमिस्ट, सहा कारकून, चार फिल्ड वर्कर्स, तीन शिपाई, दोन वॉचमन आणि कार्यालयीन अधीक्षक, केमिस्ट, चीफ अकौटंट, चीफ मॅकेनिकल इंजिनिअर असा संघ कारखान्याच्या प्राथमिक उभारणी कामासाठी दादांसोबत काम करीत होता.

दादा अक्षरशः २४ तास कारखाना स्थळावर बैठक मारून बसलेले असायचे. तेथे येणाऱ्या प्रत्येक वस्तू आणि साहित्याची पाहणे करायचे. त्यांची सतत देखरेख असायची. उसाचे क्षेत्र नाही हा मुख्य मुद्दा कारखान्याच्या परवानगीवेळीच चर्चिला गेला होता. त्याच्यावर काम करण्यास दादांनी इमारत उभारणीच्या काळातच सुरुवात केली. कृषी अधिकारी वाय. बी. नलावडे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना परिसरात ५० एकरांत ऊस लागवडीचे काम सुरू केले.

पहिल्या गळीत हंगामाच्या बॉयलरप्रदीपनाचा कार्यक्रम कुठल्या नेत्याच्या हस्ते नाही तर शासकीय अधिकारी पी. डी. कसबेकर यांच्या हस्ते ११ नोव्हेंबर १९५८ रोजी पार पडला. त्या दिवशी दिवाळी होती. पहाटे ३ वाजून ५८ मिनिटांनी कसबेकरांनी कारखान्याच्या बॉयलरचे प्रदीपन केले.

दिवाळीची पहाट आणि दादांचे भावनिक नाते होते. दादांचा जन्म कोल्हापुरात दिवाळीच्या पहाटेच झाला होता. आता कारखान्याचा जन्मही त्या अर्थाने दिवाळीच्या पहाटेच झाला!

कारखान्याला परवानगी मिळाल्यानंतर अनेक अडचणींना तोंड देत कारखाना उभा राहिला. पहिल्याच हंगामात ४९ हजार १७७ मे. टन उसाचे गाळप झाले. ५१ लाख ८०० पोती साखर उत्पादित झाली. एकरी २५ टन सरासरी उसाचे उत्पन्न शेतकऱ्यांनी त्या वेळी घेतले होते; तर कारखान्याचे उत्पादित केलेल्या साखरेलाही १०-७५ टक्के उतारा मिळाला.

सहकार क्षेत्रात वसंतदादांनी सहकारी आणि शेतकऱ्यांच्या साथीने एक विक्रम प्रस्थापित केला. परवानगी मिळाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत कारखाना सुरू झाला. सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रात इतिहास घडविणारा हा साखर कारखाना हा महाराष्ट्रात मानदंड म्हणून ओळखला जाऊ लागला.

सांगली जिल्ह्याचं तर रुपडंच या कारखान्यामुळे पालटलं.

वसंतदादा पाटलांच्या या कारखान्याने शेतकऱ्यांना चांगला भाव तर दिलाच पण कारखान्यात कामाला असणाऱ्या कामगारांना देखील त्याने अच्छे दिन दाखवले. कामगारांना हक्काचा आणि चांगला पगार, कायम स्वरुपी नोकरी हे पथ्य वसंतदादा पाटलांनी अखेर पर्यंत पाळलं.

असं म्हणतात की त्याकाळात सांगलीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील कामगारांना नोकरदारांपेक्षा मोठा मान होता. लग्नासाठी देखील  जास्त प्राधान्य होते. वसंतदादा पाटलांच्या या कारखान्याची महाराष्ट्रभरात गाजलेली गोष्ट म्हणजे कामगारांना दिवाळीत चार पगार बोनस म्हणून मिळायचे. 

सांगलीच्या कापडपेठेत तर व्यापारी देखील कारखान्याच्या कामगारांना बोनस कधी मिळणार याची वाट पाहायचे. हे कामगार अक्षरशः रिक्षा भरून सामान खरेदी करायचे.

आज ‘पद्यभूषण वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना’ या नावाने ओळखला जातो. पण दुर्दैवाने कारखान्याचे पूर्वी जे वैभव होतं ते आता राहिलं नाही. पण या कारखान्याच्या बोनसच्या कथा दंतकथा आजही संपूर्ण महाराष्ट्रात सांगितल्या जातात.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.