सुरत हल्ल्यावेळी हजर असणाऱ्या परकीय व्यापाऱ्याने शिवरायांबद्दल बद्दल पहिलं पुस्तक लिहिलं

“एखादे शिकारीचे सावज जसे सदैव जागरूक आणि सावधान असते, तसाच शिवाजीराजा कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यायला सदैव सज्ज असे. या संदर्भात, जे राजांच्या बोटांत होते, ते औरंगजेबाच्या संपूर्ण देहात नव्हते. एक डोळा सदैव उघडा असल्याप्रमाणे त्याची झोप सदैव सावध असे. धाडसाच्या बाबतीत ऑर्मची साक्ष अर्थपूर्ण आहे. एका हातात नागवी तलवार घेऊन घौडदौड करीत शिवाजीराजा शत्रूच्या प्रदेशावर चालून जात असल्याचे प्रसंग आपण आपल्या डोळ्यांनी पाहील्याचे त्याचे सैनिक इतरांना अभिमानाने सांगत असत.”

जेम्स डग्लस याने त्याच्या ‘बुक ऑफ बॉम्बे’ पुस्तकात शिवाजी महाराजांविषयी केलेले वर्णन.

मराठ्यांचा इतिहास एकसलगपणे लिहून काढण्याचा पहिला मान मिळतो, तो जेम्स डग्लसला. साताऱ्याला राहून मराठ्यांच्या इतिहासावर मोठ्या प्रमाणात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न जेम्स डग्लसने केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व प्रचंड आकर्षित करणारे आहे. शिवाजी महाराज हयात असताना अनेक परकीय व्यक्तींनी महाराजांचे वर्णन करून ठेवले आहे. त्यांच्या लिखाणातून शिवाजी महाराजांच्या रूपाची एक झलक आपल्यासमोर उभी राहते. आपला राजा किती पराक्रमी होता, याची जणीवसुद्धा होते. चला तर मग पाहूया, काही परकीय लोकांनी शिवरायांचे केलेले वर्णन..

कॉस्मा दी गार्डा. परकीय प्रवासी. छत्रपती शिवरायांविषयी त्याने लिहून ठेवले आहे,

“राजा कामास जलद आणि त्याच्या चालीत उत्साही होता. राजाचा चेहरा स्वच्छ आणि वर्ण गौर होता. विशेषतः ‘ते’ काळेभोर मोठे मोठे डोळे इतके चैतन्यपूर्ण होते, की त्यातून तेजस्वी किरण बाहेर पडत आहेत असे वाटते. यात त्याची चलाख, स्वच्छ आणि तीव्र बुद्धीमत्ता भरच टाकीत असे.”

केवढे सुरेख वर्णन. शिवरायांच्या उपलब्ध असलेल्या अनेक समकालीन चित्रांमध्ये आपल्याला या वर्णनाची झलकच पाहायला मिळते.

सुरतेच्या स्वारीसमयी एस्केलिऑट नावाचा इंग्रजी व्यक्ती उपस्थित होता. शिवाजी महाराजांचे वर्णन करताना तो म्हणतो,

“मध्यम उंची आणि प्रमाणबद्ध शरीर. राजा कामात क्रियाशील, नजरेत तीक्ष्ण, भेदकपणा आणि वर्णात इतरांपेक्षा उजळ वर्णाचा असून नेहमी स्मीतहास्य करीत बोलतो. त्याची मान व खांद्याचा भाग पुढे झुकलेला दिसतो.”

याच एस्केलिऑटचे अजून एक वर्णन फार प्रसिद्ध आहे. तो म्हणतो,

“५ तारीखेची, मंगळवारची सकाळ कोतवालाने वाजवलेल्या भोंग्याच्या आवाजाने झाली. कोणी मोगल सरदार आपल्या १२ हजार फौजेनिशी शहराजवळ येऊन थडकलाय, अशी बातमी होती. नंतर कळले, ‘तो’ आलाय. दख्खनेतील लोक आणि महामहीम बादशाह त्याला ‘राजा’ म्हणून संबोधतात तो आलाय. ज्याच्या नावाने दक्षिणेतील सुलतानांना घाम फुटतो, तो येतोय.

त्याच्याबद्दल सांगायचे झाल्यास तो उंचीने माझ्यापेक्षा थोडा लहान, पण ताठ आणि उत्कृष्ट बांध्याचा आहे. रोज व्यायाम करून कमावलेले शरीर आहे. प्रसन्न चेहरा आहे, बोलताना मंद स्मित करतो. त्याच्या लोकांमध्ये तो सर्वात गोरा आहे. डोळे भेदक आणि बोलके आहेत. कठोर, शांत, क्रूर, विचारी, दयाळू अशी परस्परविरोधी विशेषणे त्याला देता येतील.

त्याच्या लोकांमध्ये तो अतिशय लोकप्रिय आहे आणि लोक त्यासाठी काहीही करायला तयार होतात. गद्दारी व चूक करणाऱ्याला तो भयानक शिक्षा करतो. बादशाहने त्याच्या रयतेचा केलेला छळ आणि नासधूस याचा बदला घेण्यासाठी, औरंगजेबाला अद्दल शिकवण्यासाठी तो येथे आला असावा.”

थेवनॉट म्हणतो,

“शिवाजीराजा उंचीला कमी, पिवळट तपकिरी रंगाचा होता. शिवाजीराजाचे डोळे अतिशय तेजस्वी आणि तीक्ष्ण असून, त्यामधून राजाची तीक्ष्ण बुद्धीमत्ता जाणवते. हा राजा नेहमी दिवसातून एकदाच जेवण घेतो. त्याचे आरोग्य चांगले आहे.”

थेवनॉट परकीय प्रवासी. सुरतेच्या बंदरावर राहून तो व्यापार करीत असे. त्याने शिवाजी महाराजांवर जगातील सर्वात पहिले (संक्षिप्त रुपात) पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या नोंदीमधून शिवाजी महाराजांच्या आहाराविषयी विश्वसनिय माहिती मिळते.

हेन्री ओक्झेंडन. शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहून त्यांचे वर्णन करणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये हेन्री आघाडीवर आहे. शिवाजी महाराजांना, त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्याने अगदी जवळून पाहीले. शिवरायांच्या राज्यभिषेकासमयी रायगडावर उपस्थित असणारा इंग्रज अधिकारी म्हणजेच हेन्री ओक्झेंडन.

“शिवाजी ४७ वर्षांचा असून देखणा होता. त्याच्या चर्येवरून त्याची बुद्धीमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येई. त्याचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळच गौर होता. त्याची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व टोकाशी बाकदार होते. त्याच्या दाढीस निमुळतेपणा असून बारीक मिशी (म्हणजे विरळ) होती. त्याचे भाषण निश्चयात्मक, स्पष्ट पण जलद होते.”

काही इंग्रज इतिहासकार तर महाराजांची तुलना सिकंदर, हनीबल, सीझर यांच्याशी करतात. एका इंग्रजी पत्रात शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘The greatest diplomatist of eastern part’ म्हणजेच, ‘पूर्वेकडील देशांतील सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी’ म्हणून आला आहे.

पोर्तुगीजांच्या समकालीन नोंदीसुधा याला साक्षी आहेत. या सर्व गोष्टी ध्यानात घेतल्यास शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व आपल्या नजरेसमोर ठळकपणे उभे राहते. मध्यम उंची, भरीव बांधा, काळेभोर विशाल, भेदक डोळे, उजळ रंगाचे आणि चेहऱ्यावर सतत स्मितहास्य या बाह्यरूपांबरोबरच शिवाजी महाराजांच्या तीक्ष्ण बुद्धी, निर्णय घेण्याची क्षमता, कमालीचे साहस व शौर्य, विलक्षण विचार करण्याची पद्धत अशा अनेक व्यक्तिमत्व गुणांचे वर्णन या प्रवाशांनी करून ठेवले आहे.

असे हे शिवरायांचे रूप..

ज्याची भुरळ आज साडेतीनशे वर्ष झाले तरीही समस्त मराठी माणसांच्या मनावर कायम आहे. म्हणूनच, छत्रपती शिवराय साऱ्या जगात सर्वार्थाने वेगळे ठरतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.