“चिकन 65” मधला “65” हा आकडा नेमका कोणी लावला..?

कोल्हापूर आणि सांगली भागात चौकाचौकात चिकन 65 हा मिळतं. अस्सल गावठी तेलातल्या काळ्याभोर कडईत उबाळा येईपर्यन्त तळलेले चिकनचे खरपूस पीस सगळा गाव खात असतो. चकणा म्हणून अस्सल पिताड्यांकडून याचा मनसोक्त आनंद उपभोगला जातो. पुण्याबद्दल सांगायचं झालं तर पुण्यात चिकन 65 आणि चायनिझ चिकन चिल्ली यात वेगळा फरक नसतो. काहीही मागा एकच येतं. बाकी मराठवाड्याबद्दल आपल्याला विशेष माहिती नाही पण तिकडे कोल्हापूर सारखं चिकन 65 मिळत नाही हे फिक्स आहे. राहता राहिला भारताचा विषय तर कोल्हापूरात मिळतं तसच चिकन 65 दक्षिण भारतात मिळतं.

वरच्या काही काही राज्यात देखील असच मिळत आणि राहिलेल्या भागात चायनिझच्या गाड्यावर चिकन 65 म्हणून चिल्ली देतात. आत्ता हा 65 प्रकार तुम्हाला चायनिझ वाटू शकतो पण तस नाही. हा प्रकार मुळचा दक्षिणेतला. तामिळनाडू हि या पदार्थाची राजधानी मानली जाते.

पण असो, चिकन 65 ची महती सांगण्यासाठी हा लेख नसून त्यातल्या 65 या आकड्याबद्दल सांगण्यासाठी आहे.तर सुरवात करु 65 आकड्याबद्दल लोकांनी लावलेले आकडे. 

तर चिकन 65 मधला हा आकडा, कोणी कसा आणि कधी लावला याबद्दल जे काही गृहितक आहेत ते खाली देत आहोत. मोकळेपणाने त्याचा स्वीकार करावा. 

थेयरी क्रमांक १.  

चैन्नईच्या बुहारी रेस्टारंटच. तर मॅटर असा आहे की चैन्नईत एक बुहारी नावाचं रेस्टारंट होतं. झालं अस की रोजचा इडली, डोसा खावून कंटाळलेल्या ग्राहकांना काहीतरी विशेष द्यायचं म्हणून या रेस्टारंटने एक प्रयोग केला. तो प्रयोग करण्यात आला ते साल होतं 1965. आत्ता आधीच एकामागोमाग, “इटलीसांबारताप्पामसालाडोसासाधाडोसारवाडोसामेदूवाडारस्समइडली” म्हणणाऱ्या वेटर लोकांनी या पदार्थाला सुटसुटीत नाव म्हणून ज्या साली शोध लावला त्या सालच नाव दिलं. नाव अस होतं की चिकन 65, पुढे 1978,1982,1990 साली देखील असेच शोध लागले आणि त्यांना चिकन 78,82,90 अशी नावे पडली. आत्ता हे फक्त गृहितक आहे. किस्सा सांगितला जातो पण रेस्टारंटचा शोध लागत नाही. 

थेअरी क्रमांक २.  

चिकन 65 हा लगेच खाण्याचा पदार्थ नव्हता. माणसं हा पदार्थ लोणचं केल्यासारखा करायची. आणि चांगल मुरलं की ते खायचे. आत्ता हि आंबवून ठेवण्याचा काळ होता तो 65 दिवसाचा होता. म्हणून चिकन 65. पण या थेअरीत काय मज्जा वाटत नाहीत. कारण तस असत तर मग आत्ता जागच्या जागेवर तळून का खाल्ला जातोय. बर मटणाचं लोणचं, चिकनचं लोणचं असा जवळचा शब्द असताना उगीच दिवस मोजून नाव ठेवण्याचा प्रकार अंधविश्वास वाटतोय. आणि तसही आपल्या घरात कोण चिकन, मटण अस जपून ठेवल का? हि विचार करायला लावणारी गोष्ट आहे. 

थेअरी क्रमांक ३. 

एका प्लेटमध्ये बरोबर 65 पीस असायचे म्हणून या डिशला चिकन 65 नाव पडलं. हे पण अशक्य वाटणारी गोष्ट आहे. अस पीस मोजून देणारी लोकं निदान भारतात तरी नाहित. मटण, चिकन हि किलोतरी गोष्ट त्यामुऴे  वैचारिक कसोटीच्या पातळीवर हि थेअरी शुन्य मार्काने नापास होते. 

थेअरी क्रमांक ४. 

एक दिवशी काय झाले.. 

अस सांगून किस्सा सांगितला की तो खरा वाटतो. लोकांना पटतो. एक माणूस बाकीचे लोकं आणि एक छान छान वाटणारी गोष्ट यामध्ये गुंतवूण गोष्ट सांगायची असते. 

तर झालं अस की, एके दिवशी चेन्नईतल्या एका माणसाने लोकांना चॅलेंज दिलं. तो म्हणाला मी लयत लय तिखट मिरच्या टाकून चिकनची एक डिश तयार करणार आहे. त्या तूम्ही खावून दाखवा. या मिरच्यांच प्रमाण होतं एका किलोला 65 मिरच्या. लोकांनी तो पदार्थ खाल्ला. पदार्थ तिखट होता पण लोकांना तो आवडला. झालं हा पदार्थ कंट्यून्यू झाला. याच नाव पडलं चिकन 65. पण खर सांगायचं झालं तर त्या आचाऱ्याने चॅलेंज देवून फक्त 65 मिरच्याच टाकल्या हे काही न पटण्यासारखं आहे. बर मार्केटिंग करायचं होतं तरीपण चिकन करताना मिरच्या कोण मोजत बसता का? त्यामुळ हि स्टोरीपण फेल होते.

थेअरी क्रमांक ५. 

हि अस्सल आणि खऱ्याच्या जवळ जाणारी स्टोरी वाटते. 

अस सांगितल जात की, ब्रिटीशांच्या काळात उत्तरेतले सैनिक दक्षिणेत, दक्षिणेतले सैनिक उत्तरेत असा कारभार असायचा. म्हणजे भारतातला कुठलाही सैनिक कुठेही तैनात असायचा. खासकरुन दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात उत्तरेतले सैनिक असायचे. तर व्हायचं अस की तामिळनाडू आत्ता आहे तितकडं भाषेबद्दल कडवं त्या वेळी देखील होतं. कुठ काय लिहलं असेल तर ते तेखील तामिळमध्येच असायचं. मग हे उत्तरेतले हॉटेलमध्ये गेले  की मेन्यू काय सांगायचा या गोंधळात उपाशी रहायचे. अशात एखादा पदार्थ आवडला तर त्यापुढे आकडा टाकला जायचा. साधारण चिकनची हि डिश बऱ्याच हॉटेलमध्ये ६५ नंबरवर असायची. म्हणून सैनिकांनी या प्लेटपुढे 65 लिहायला सुरू केलं आणि या डिशच नाव चिकन 65  अस झालं. 

आत्ता हि थेअरी त्यातल्या त्यात जवळ जाणारी वाटतेय. पण असो हे ग्यान दूसऱ्यांना देताना आपल्या पोटात २०० ग्रॅम तरी चिकन 65 जावं हिच इच्छा. बाकी उत्सुकतेपोटी जे शाकाहारी लोक आले असतील त्यांनी पनीर 65 आपल्या पोटात ढकलून द्यावं. तेवढीच जागा भरुन निघते आणि,

टिप : हिटलर म्हणूनच गेला आहे नावात काय आहे, तसच आकड्यात काय आहे. 

  •  कल्याण ओपनवाला. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.